অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पांचुदा

पांचुदा

(कौंतेल, कातर्णी; हिं., गु. धुती; क. तोरटे, रेवपी; सं. पत्तर, कुंतल; लॅ. कॅपॅरिस ग्रँडिस कुल-कॅपॅरिडेसी). हा सु. ४.५ मी. उंच पानझड़ी वृक्ष भारतातील डोंगराळ भागात, विशेषतः प. घाट व जवळचा दक्षिण पठाराचा भाग, राजस्थान, श्रीलंका व ब्रह्मदेश येथे आढळतो. कोवळ्या फांद्या व पाने यांवर पिवळट लव आणि जून खोडावर जा़ड भेगाळ साल असते. पाने साधी व लांबट (२.५-५ x  २.५-३.५ सेंमी.;) उपपर्णी काटे असल्यास वाकडे; फुलोरे गुलुच्छ किंवा मंजरी [⟶ पुष्पबंध] ; फुले पांढरी (२.५ सेंमी. व्यासाची) व सच्छद असून एप्रिल ते मेमध्ये येतात. संदले ४ व सुटी; पाकळ्या ४, परिहित; केसरदले अनेक व लहान आखूड दांड्यावर (किंजधरावर), लंबगोल व टोकदार [⟶ फूल] ; मृदुफळ जायफळाएवढे, गोल, जांभळे व गुळगुळीत असून बिया २-६ असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे कॅपॅरिडेसी कुलात (वरुण कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड पांढरे अगर करडे, मध्यम कठीण, जड आणि टिकाऊ असून कातीव कामास चांगले असते; नांगराचे फाळ व छपराचे वासे यांकरिता वापरतात. साल व पाने यांता फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) सूज व फोड यांवर पोटात देतात.

 

लेखक: धवधवे, व.ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate