অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पांढरकळी

पांढरकळी

(कोदरसी; हि. डालमे; सं. भूरी, धूसरा, फली; गु. शीनवी; क. इबत्ती गिड; लॅ. सेक्युरेनेगा व्हिरोजा, फ्ल्युजिया मायक्रोकार्पा; कुल-युफोर्बिएसी). ह्या मोठ्या झुडपाचा प्रासर सिंधूच्या आणि काश्मीरच्या पूर्वेस, आसामपर्यंत, हिमालयात (२,००० मी. उंचीपर्यंत) व भारतात इतरत्र पानझडी जंगलांत आहे; शिवाय चीन, ऑस्ट्रेलिया, कार निकोबार बेट, मलेशिया, उष्ण आफ्रिका इ. प्रदेशांतही ते आढळते. हे झुडूप सु. ८ मी. उंच, बिनकाटेरी व द्विभक्त लिंगी असून खोडावरील साल पातळ, गुळगुळीत, लालसर करडी असते व तीवर⇨ वल्करंध्रांचे (बारीक छिद्रांचे) ठिपके असतात.

फांद्या लहान व कोनीय (धारदार); पाने साधी, एकाआड एक, पातळ, दीर्घवृत्ताकृती-गोलसर, २.५-७.५ × १.५-४.५ सेंमी., भिन्न लांबी-रुंदीची; फुले हिरवट पिवळी, सुगंधी, एकलिंगी, फार लहान व सूक्ष्म छदांनी वेढलेल्या झुबक्यांनी, पानांच्या बगलेत मे-जूनमध्ये येतात. पुं-पुष्पे अनेक व स्त्री-पुष्पे १-५; केसरदले ३-५, किंजदले ३ व किंजले विभागलेली व भिन्न झाडांवर येतात [⟶ फूल]; फळे दोन प्रकारची : लहान व शुष्क अथवा मोठी (८ मिमी. व्यास), पांढरी व मांसल आणि खाद्य असतात. सामान्य लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळात बिया ३-६ असतात.

परम्यावर मुळांचा उपयोग करतात. पानांचा रस वा चुरा तंबाखूत मिसळून जखमांतील कृमी (किडे) मारण्यास लावतात. पाने पाण्यात उकळून तो काढा बुद्धकोष्ठतेवर सारक म्हणून देतात व जखमा धुण्यास वापरतात. साल मत्स्यविष असून तीत १०% टॅनीनअसते; ती कातडी कमाविण्यासाठी वापरतात. मूळ वेदना कमी करम्यास उपयुक्त असून शिवाय ते स्तंभक (आकुंचन करणारे), रेचक व कामोत्तेजक असते. सालही स्तंभक म्हणून अतिसारात व न्यूमोनियात देतात. याचे लाकूड पिवळट तांबडे, तांबडे किंवा पांढरे, कठीण, बळकट व टिकाऊ असून त्यापासून शेतीची अवजारे, साध्या छपराचे सांगाडे, वासे व काठ्या तयार करतात.

सेक्युरिनेगा ल्यूकोपायरस (फ्ल्युजिया ल्यूकोपायरस) या जातीलाही ‘पांढरफळी’ म्हणतात.तिला लहान पाने व तीक्ष्ण काटे असतात. हिच्या फुलाचे वर दिलेल्या जातीशी साम्य असून स्त्री-पुष्पे लाल, पुं-पुष्पे हिरवट पिवळी आणि मृदुफळे लहान (६ मिमी. व्यास) गोलसर, पांढरी व गुळगुळीत आणि खाद्य असतात. लाकूड कठीण व वरच्याप्रमाणे, शिवाय जळणासही उपयुक्त असते. पानांचा औषधी उपयोग वरीलप्रमाणे करतात. मुळांचा काढा झोप येण्यास व तापावर देतात. खोडातून पाझरणारा डिंक चिकटविण्यास वापरतात. पाला बोकड व मेंढ्या खातात. लाकूड विशेषेकरून तंबूच्या खुंट्या, खुर्च्यांचे पाय, हातात धरावयाच्या काठ्या इत्यादींसाठी वापरतात. झाडे उत्तम शोभिवंत कुंपणाकरिता लावतात.

 

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate