অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाइन

पाइन

(लॅ पायनस; कुल पायनेसी). काही असामान्य वृक्षांचे इंग्रजी नाव. प्रकटबीज वनस्पतींपैकी [⟶वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] शंकुधारी अथवा शंकुमंत [⟶ कॉनिफेरेलीझ] गणात पायनेसी (ॲबिटेसी) हे सर्वांत मोठे कुल असून पाइन वृक्षांचा समावेश असलेले पायनस हे त्यातील प्रमुख वंशाचे शास्त्रीय नाव आहे. या वंशाशिवाय सीड्रस [⟶ सीडर ], लॅरिक्स [⟶लार्च], ॲबिस, पिसिया इ. दहा वंश त्याच कुलात अंतर्भत केलेले असून त्यांच्या एकूण सु. २५० जाती आहेत. पायनस वंशात सु. ७५-१०५ जाती असून त्यांचा प्रसार बव्हुंशी उ. गोलार्धातच आहे. भारतात त्यांपैकी फक्त चार किंवा पाच जाती नैसर्गिक अवस्थेत आढळतातः पायनस जिरार्डियाना (चीड, चिलगोझा), पा. इन्सुलॅरिस अथवापा.खासिया; पा.लाँगिफोलिया अथवा पा.रॉक्सबर्षाय (चिर, चिल), पा.एक्सेल्सा अथवा पा.ग्रिफिथाय वापा. वालिचियाना (कैल, ब्ल्यू पाइन). मध्य व प. हिमालयात सु. १,५५० मी. किंवा अधिक उंचीवर यांचे नैसर्गिक वसतिस्थान आहे. यांशिवाय पा. नायग्रा (ऑस्ट्रियन पाइन) व पा.सिल्व्हेस्ट्रस (स्कॉच पाइन) या परकीय जातीही भारतात सामान्यपणे दिसतात. कुलू, निलगिरी, श्रीनगर, मनाली, डेहराडून, समुंदर इ. ठिकाणी सु. १०-१२ आयात जाती शोभेकरिता व विशेष उपयोगाकरिता लावलेल्या आढळतात.

पाइनची बहुतेक झाडे मोठे सदापर्णी वृक्ष असून काही झुडपेही आहेत. वृक्षांचे खोड सु. २५-६० मी. उंच आणि गोलसर खांबाप्रमाणे सरळ असून त्यावर साधारण जाड खवल्यांनी सोलून जाणारी साल असते. खोड व लांब फांद्यांवर (दीर्घ प्ररोहांवर) फक्त खवल्यासारखी पाने (शल्कपर्णे) असून खोडाच्या टोकाजवळ खवल्यांच्या बगलेतून नवीन लांब फांद्या दरवर्षी येतात. त्यांच्या मंडलाकार मांडणीमुळे व खालून वर लांबी कमी होत गेल्याने लहान वृक्ष त्रिकोनी व आकर्षक दिसतात. पुढे पुढे खालच्या फांद्यांच्या नाशामुळे फक्त वरच्या फांद्या राहतात. व वृक्षाला छत्रासारखा आकार येतो. या फांद्यांच्या झुबक्यातून खोडाची टोकावरची (अग्रस्थ) कळी अनिर्बंधपणे वाढत राहिल्याने खोड सलगपणे सरळ (एकपद) वाढत राहते. लांब फांद्यांवर मर्यादित वाढीच्या आखूड फांद्या (ऱ्हस्व प्ररोह) खवल्यांच्या बगलेत येतात. त्यावर हिरव्या, लांब आणि बारीक जाडसर सुईप्रमाणे (सूच्याकृती) २-५ (क्वचित एक) पानांचा झुबका येतो; तथापि त्यांची मांडणी एकाआड एक असते (आ. १). सर्वच पाने एकदम गळून पडत नाहीत; परंतु अनियमितपणे सर्वच ऱ्हस्व प्ररोह मात्र गळून पडतात. बीज रुजल्यावर आरंभापासून वाढत आलेले प्रधानमूळ सतत वाढत राहते व त्यावरच्या अनेक शाखा व उपशाखा यांमुळे सामान्य द्विदलिकित फुलझाडांतल्या प्रमाणे प्रधानमूल तंत्र (प्रमुख जाड मूळ आणि त्याच्या फांद्या यांनी बनलेला मुळांचा विस्तार) बनते; मात्र मुळे फार खोल जात नाहीत.

शरीर

पाइनच्या झाडांची शारीरिक अंतर्रचना सामान्यपणे फुलझाडांपैकी द्विदलिकित गटातील वनस्पतींत आढळते त्याच प्रकारची असते; परंतु काही महत्त्वाचे फरकही आढळतात. मुळांचा व कवकतंतूंचा निकट संपर्क [संकवक; ⟶ शवोपजीवन] आल्यामुळे व मुळांवरील केसांचे कार्य कवकतंतूंनी केल्यामुळे मूलकेशांचा अभाव असतो. खोडांत मूळ प्रारंभिक वाढ पूर्ण झाल्यावर नवीन द्वितीयक वाढ होते व त्यांची जाडी वाढते. खोडातील वार्षिक वाढ वलयांच्या स्वरूपात होते [⟶ शारीर, वनस्पतींचे]; मध्यत्वचेत रेझिनाने भरलेल्या नलिका, प्रकाष्ठात (पाण्याची ने-आण करणाऱ्या घटकांत) काष्ठ-सूत्रे (लांबट, कठीण तंतूसारख्या मृत घन कोशिका म्हणजे पेशी) आणि वाहिकांवर (लांबट, कठीण व मृत पण वाहक कोशिकांवर) अनुल्प्त खाचा (वर्तुळाने वेढलेले कोशिकावरणाचे पातळ ठिपक्यासारखे भाग) असतात. मुळातील ⇨ अंतस्त्वचेत टॅनीन व प्रकाष्ठाभोवती रेझीन-नलिका असतात. पानावर जाड ⇨ अपित्वचा (सर्वांत बाहेरचे आवरण) आणि त्यावरील खाचांत असणारी ⇨ त्वगंघ्रे (छिद्रे), ⇨ अभित्वचेचे (अपित्वचेखालील कोशिकांच्या थरांचे) दोन-तीन थर, विशेष प्रकारच्या मध्योतकात (दोन अपित्वचांच्या थरांमधील सर्व कोशिकांच्या थरात)फारच पोकळ्या, दोन मध्यावर्ती वाहक वृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारे जुडगे), रेझीन-नलिका इ. लक्षणे आढळतात; ⇨ सायकसच्या झाडाप्रमाणे येथेही पाणी व अन्नरसाची ने-आण करणारे विशेष प्रकारचे कोशिकांचे समूह (संचरणोतक) पानात असून त्याभोवती अंतस्त्वचेचे वर्तुळ असते. (आ.२).


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate