অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाडळ

पाडळ

(पाद्री, पाटल; हिं. पांडरी, पदेर, पोदल; गु. पडेली; क. पादरिगिड; सं. पाटला; इं. ट्रंपेट फ्लॉवर; लॅ. स्टेरिओस्पर्मम चेलोनॉइडिस, स्टे. टेट्रागोनम; कुल-बिग्नोनिएसी). सु. १२-१८ मी. उंच आणि १-१.५ मी. घेर असलेला हा पानझडी वृक्ष भारतात दमट हवेतील जंगलात, महाराष्ट्रात विशेषतः कोकणात, कर्नाटकात, कारवार व कुमठ्याच्या जंगलात आणि श्रीलंकेत आढळतो. याच्या शाखा पसरट असून साल जाड व पिवळट असते. पाने मोठी, संयुक्त व पिसासारखी; दले ३-५ जोड्या व शिवाय एक दल टोकावर; दल २.५.-५ सेंमी.

लांब दीर्घवृत्ताकृती, गुळगुळीत, तळाशी असमान व टोकाशी निमुळते; फेब्रुवारी ते मार्चच्या सुमारास पाने गळतात आणि एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. त्याच सुमारास (एप्रिल ते जूनमध्ये) फांद्यांच्या टोकांस लोंबत्या परिमांजऱ्यावर तुतारीसारखी सुवासिक पिवळी फुले येतात; त्या वेळी हा वृक्ष शोभिवंत दिसतो.

फुलाचा संवर्त ५ संदलांचा, जांभळट घंटेसारखा असतो. पुष्पमुकुट बाहेरून व आतून लवदार, २ सेंमी. लांब व द्वयोष्टक (दोन ओठांसारखा) ; पाकळ्या काहीशा सुरकुतलेल्या, बाहेर वाकलेल्या व पिवळ्या असून त्यांवर तांबूस जांभळट रेषा असतात. केसरदले चार व एक वंध्य, तळाशी केसाळ. दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट [⟶ फूल]. बोंडे ०.३-०.६ मी. लांब व १.३ सेमी. रुंद, साधारण चौकोनी, टोकदार व बाकदार असून त्यावर पांढरट ठिपके व आतल्या पिंगट पडद्यांवर खाचा असतात.

फळ तडकून त्याची दोन शकले होतात. बिया लांबट, सपक्ष (पंख्यासारखा विस्तार असलेल्या), २-३ सेंमी. लांब असून त्यांवर खाली आडवी खाच असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ बिग्नोनिएसी कुलात (टेटू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पाटल या नावाच्या वनस्पतीचा उल्लेख जुन्या संस्कृत ग्रंथांत व आयुर्वेद ग्रंथात आला आहे.

या झाडाची पाने गुरांना चारा म्हणून घालतात. लाकूड तपकिरी, कठीण, मध्यम टिकाऊ व लवचिक असून सुतारकामास सोपे असते; धरबांधणी, सजावटी सामान, चहाची खोकी, शेतीची काही अवजारे, पडाव, वल्ही इत्यादींसाठी वापरतात. ही वनस्पती शीतल (थंड), वातहर (वायुनाशी) व ज्वरघ्न आहे. मुळे, पाने व फुले यांचा काढा तापावर देतात; पानांचा रस लिंबाच्या रसाबरोबर उन्माद विकारावर उपयुक्त असतो. मुळांची साल मधुर असते; मुळांचा फांट [⟶ औषधिकल्प] ज्वरात देतात.


लेखक: देशपांडे, सुधाकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate