অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पादपजात

पादपजात

(फ्लोरा). एखाद्या लहान किंवा मोठ्या प्रदेशात निसर्गतः आढळणार्या सर्वच वनस्पतींविषयी सामूहिक दृष्ट्या बोलले जाते तेव्हा त्यास ‘वनश्री’ (व्हेजिटेशन) असे म्हणतात. जंगल, कुरण, खुरटी झाडी इ. वनश्रीचे सामान्य प्रकार आहेत; अशा वनश्रीतील (विशिष्ट परिस्थितीत किंवा प्रदेशात असलेल्या वनश्रीतील) वनस्पतींची ओळख फक्त त्यांच्या नामनिर्देशाने केली जाते. तेव्हा त्यास ‘पादपजात’ असे समूहवाचक नाव देतात. ‘पादप’ याचा अर्थ पायांनी (पाणी) पिणारे, म्हणजे झाड असा दिलेला आढळतो. त्यावरून वरील पादपजात ही संज्ञा आली आहे. ‘फ्लोरा’ ही शास्त्रीय संज्ञा रोमन लोकांनी वसंत ऋतूची देवता, फुलांची देवता व तारूण्यपुष्प देवता या अर्थाने वापरली होती. वनस्पतींच्या व फुलांच्या संबंधावरून हीं संज्ञा ‘पादपजात’ या अर्थी आली आहे. वनश्रीच्या वर्णनातील पादपजात हा भाग त्यातल्या व्यक्तींची मानावली असा होतो. अंदमान बेटातील जंगलतील (वनश्रीतील) सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या नावाची यादी म्हणजेच ‘अंदमानची पादपजात’ होय. विशिष्ट प्रदेशातील फक्त वनस्पतींच्या नावांच्या यादीऐवजी त्याखेरीज प्रत्येक वनस्पतीचे पूर्ण अधिकृत वर्णन (आंतरराष्ट्रीय परिषदेन निश्चित केलेल्या नियमांनुसार व संकेतांनुसार) असलेला एक ग्रंथ बनविला जातो, त्यालाही ‘पादपजात’ म्हणतात. असे ग्रंथ भिन्न प्रकारच्या वनस्पतींविषयी (उदा., शैवल, शेवाळी, नेचे, बीजी वनस्पती इ.) लिहिले जातात. एखाद्या प्रदेशातील फक्त जीवाश्म (शिळारूप अवशेष) वनस्पतींच्या वर्णनाचा किंवा प्राचीन कालातील एखाद्या युगातील वनस्पतींच्या वर्णनाचा ग्रंथ लिहिलेला आढळतो. भारतातील बहुतेक सर्व राज्यांतील बीजी वनस्पतींच्या वर्णनाचे ग्रंथ आज उपलब्ध आहेत : उदा., जे. एस्. व सी. ई. सी. फिशर यांनी संपादिलेला मद्रासचा फ्लोरा, एच्, एम्. हेन्स यांचा बिहार व ओरिसाचा फ्लोरा, थीओडोर कुक यांचा फ्लोरा ऑफ द प्रेसिडेन्सी ऑफ बॉम्बे , जे. डी. हुकर यांचा जुन्या ब्रिटिश इंडियाचा फ्लोरा इत्यादी. तसेच विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या स्थानिक पादपजातीसंबंधीचे ग्रंथही उपलब्ध असून (उदा., ई. ब्लॅटर व चे. एफ. आर्. द’ आल्मेईद यांचा फर्न्स ऑफ बॉम्बे, आर्. एच्. बेडोम यांचा फर्न्स् ऑफ साऊथ हंडिया; ई. जे. बटलर आणि जी. आर्. विस्बी यांचा फंजाय ऑफ इंडिया) कित्येक नवीन बनविले जात आहेत. मोठ्या देशातील (किंवा प्रदेशातील) अनेक लहान व भिन्न प्रदेशांतील वनस्पतींच्या याद्या एकत्रित करून किंवा वर्णनांसह व नकाशांसह एकत्र करून मोठे पादपजातीय ग्रंथ प्रसिद्ध केले जातात; त्यावरून तेथील वनश्रीची व पादपजातीची चांगली कल्पना येते. एखाद्याला आढळलेली एखादी वनस्पती पूर्वी नमूद केलेली आहे किंवा नाही , याचा शोध या ग्रंथाद्वारे घेता येतो व नसल्यास ती नवी असे मानून तिचा अभ्यास करात येतो. यावरून पादपजात हा उत्तम संदर्भग्रंथ ठरतो. अनेकदा या ग्रंथात वनस्पतींच्या कुलांची व गणांची वर्णने व प्रत्येक कुलातील वंश व जातीतील फरक लक्षात घेऊन बनविलेल्या ‘किल्ल्या’ दिलेल्या असतात. त्यांचा उपयोग नवीन वनस्पतीच्या लक्षणांवरून तिचे स्थान निश्चित करून ती ओळखण्यास फार होतो [ → वनस्पती - अभिज्ञान]; अर्थात याकरिता तेथे वर्गीकरणाची विशिष्ट पद्धतही अमलात आणावी लागते [→ वनस्पतींचे वर्गीकरण].

वस्पतिवर्ण

पादपजातीवरील ग्रंथात उल्लेख केलेल्या वनस्पतीच्या वर्णनात तिची शारीरिक लक्षणे तपशीलवार, विशिष्ट व सर्वमान्य तांत्रिक लॅटिन संज्ञांचा उपयोग करून देण्याची आंतरराष्ट्रीय प्रथा आहे. भारतातील प्रदेशिक भाषांत वर्णन करण्यास जरूर ते पर्याय, पारिभाषिक संज्ञा बनवून त्या रूढ होत आहेत. वनस्पतींची कुले, वंश व जाती यांची विशेषनामे खेरीज करून शारीरिक लक्षणांबाबत वर्णनात्मक अधिकृत संज्ञा वापरण्याने कोणत्याही वनस्पतीची माहिती अचूकपणे व सुटसुटीतपणे थोडक्यात देता येणे शक्य आहे. सामान्यांना ही वर्णने सकृद्दर्शनी दुर्बोध व रुक्ष वाटली, तरी ती सोयीची व संज्ञांच्या परिचयाने सुबोध होतील. बीजी वनस्पतींच्या वर्णनात खालील मुद्दे महत्त्वाचे ठरले आहेत; त्यांचा उपयोग करून वनस्पतींची पूर्ण माहिती दिल्यास वनस्पतींची ओळख पटण्यास अडचण पडत नाही : (१) नैसर्गिक स्थान, अधिवास, (२) स्परूप, (३) मूळ, (४) खोड, (५) पाने वा त्यांचा प्रकार आणि मांडणी (पर्ण-विन्यास), (६) पुष्पबंध, (७) फूल, (८) परागण, (९) फळ, (१०) बीज, (११) फले व बीजांचे विकिरण इत्यादी.

काहींच्या मते, वनस्पतींच्या प्रजोत्पादनाच्या साधनाचा प्रकार (कलम, कंद, बी, पाने इ.), तसेच संरचनेतील वैशिष्ट्ये ही वर्णनात नमूद असावीत. वरील वर्णनाबरोबर पुढील बाबी अंतर्भूत केलेली आकृती देण्याचीही पद्धत आहे. (१) कमीत कमी तीन पेरी व फुलोरा असलेली फांदी, (२) शिरांची मांडपी (सिराविन्यास) स्पष्ट दर्शविणारे पान, (३) सर्व भाग सुटे व स्पष्ट केलेले फूल, (४) फुलाचा उभा छेद, (५) किंजपुटाच्या आडव्या छेदाने बीजकविन्यास, (६) शरीराच्या कोणत्याही भागाचे विशेषत्व दर्शविणारी आकृती, (७) पुष्पचित्र व पुष्पसूत्र [→फूल ].

फुलझाडांना लागू पडणारे वनस्पतिवर्णनाचे वरील विवेचन अबीजी वनस्पतींच्या वर्णनाला लागू पडत नसले, तरी त्यांच्या वर्णनांमध्येही शरीराच्या अंगोपांगांचा तपशील तत्त्वतः याच क्रमाने व निश्चित अधिकृत संज्ञांचा उपयोग करून देण्याची पद्धत रूढ आहे. या वनस्पतींच्या भिन्न वर्गातील किंवा उपवर्गातील वनस्पतींत सर्वसाधारणपणे आढळणार्या अवयवांचे स्वरूप व संरचना लक्षात घेऊन हा तपशील व क्रम निश्चित केला गेला आहे.

वनस्पतिवर्णनाचे ग्रंथ (पादपजात) बहुधा भिन्न देशांत तेथील संशोधन संस्था, विशेषतः शास्त्रीय उद्याने, विद्यापीठे, ग्रंथालये, समृद्ध महाविद्यालये, सरकारी सर्वेक्षणालये व संग्रहालये इ. ठिकाणी ठेवलेले असतात.

 

संदर्भ : 1. Dutta, S. C. Handbook of Systematic Botany, Calcutta, 1965.

2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular lants, New York, 1965.

लेखक: परंडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate