অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पामी

पामी

पामी-(अँरेकेसी; पामेसी; ताल कुल). फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील नारळ,सुपारी, खजूर, तेल माड इ. ताल वृक्षांचा समावेश असलेल्या या वनस्पतिकुलास तालादि-कुल असेही म्हणतात. याचा अंतर्भाव ताल गणात (पामेलीझमध्ये) करतात. यामध्ये सु. २२७ वंश व २,६०० जाती (काहींच्या मते सु. २१० वंश व ३-४ हजार जाती) असून त्यांचा प्रसार बव्हंशी उष्ण कटिबंधात आहे. काही थोड्या जाती थंड प्रदेशात आढळतात. ताल वृक्ष बहुधा १,२०० मी. उंचीपलीकडील प्रदेशात आढळत नाहीत; परंतु काही जाती (उदा., सेरोझायलॉन = वॅक्स पाम) उ. अँडीज पर्वतावर ३,९०० मी. पर्यंत किंवा थोड्या अधिक उंचीवरही आढळतात. भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील व्हेजिटेबल हेअर पाम (केश-ताल)हा युरोपातील एकमेव देशी ताल होय; तेथेच आढळणारा खजूर-ताल हा खरा आफ्रिकीच आहे. आफ्रिकेत इतर अनेक तालांच्या जाती आढळतात. पूर्व आशियात तालांचा प्रसार समुद्रकिनार्‍यावर असून त्यांचा पल्ला कोरिया व द. जपानपर्यंत जातो; प. आशियात उत्तरेस अफगाणिस्तानापर्यंत त्यांचा प्रसार आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडीलसंस्थानांत अनेक वंशांतील जाती असून द. अमेरिकेत चिलीतील ‘सिरप-मद्य-पाम’ (ज्युबिया स्पेक्टॅबिलिस) हा तालांची दक्षिण मर्यादा दर्शवितो. पुर्व गोलार्धातील तालांच्या प्रसारांची दक्षिणेकडील मर्यादा न्यूझीलंड ही आहे. ताल कुलातील वंशांच्या तीन जमाती केल्या असून त्यांमध्ये त्यांच्या पानांचे प्रकार, फुलांतील लैंगिक भेद, बियांची लक्षणे, संधिरेषा, वनस्पतीचे वृद्धिस्वरूप, महाछदाचे स्थान, फुलाच्या कळीची संरचना, फळ, किंजपुट व किंजल्क [→फ़ूल]इ. लक्षणे विचारात घेतली जातात. ह्या वनस्पती सर्वसाधारणपणे मोठ्या ,सरळ व उंच वृक्षाप्रमाणे [→ नारळ ], काही लहान झुडपाप्रमाणे [→पाम] तर काही वेली [→वेत] आहेत. खोडावर पानांचे किण (वण) किंवा देठांचे अवशेष [→शिंदी] असतात. खोड बहुधा शाखाहीन [अपवाद :डूम पाम; → पाम] असतेच काहींचे खोड फार लहान किंवा भूमिस्थित [जमिनीतच सदैव राहणारे; उदा.,→गुलगा] असते.पाने एकाआड एक, बहुधा मोठी, साधी किंवा संयुक्त, पिसासारखी किंवा पंजासारखी (हस्ताकृती), सवृंत (देठ असलेली) व चूणित (घड्या पडलेली) असून बहुधा खोडाच्या टोकास त्यांचा झुबका असतो. पर्णतल आवरक (खोडास वेढणारा) व बळकट असून कधी देठ, मध्यशीर व खोड यांवर काटे असतात. काहींच्या जीवनात एकदाच फुले येऊन जातात, तर काहींना अनेक वेळा येतात. फुले लहान, असंख्य, एकलिंगी किंवा द्विलिंगी व बव्हंशी वायुपरागित (वार्‍याच्या साहाय्याने परागांचा किंजल्काशी संपर्क करविणारी) असतात; ती मंजरी, परिमंजरी किंवा स्थूलकणिश [→पुष्पबंध] प्रकारच्या फुलोर्‍यावर येतात वा तो फुलोरा एक किंवा अनेक मोठ्या व कठीण महाछदांनी (तळातील उपांगांनी) सुसंरक्षित असतो. प्रत्येक फुलात बाहेरची तीन परिदले कठीण व आतील तीन नरम, बहुधा सुटी, धारास्पर्शी [परस्परांच्या किनारिंना कळीमध्ये स्पर्श करणारी ) किंवा परिहित [ परस्परांना अंशतः झाकणारी; →पुष्पदलसंबंध]; केसरदले सहा, क्वचित तीन किंवा अधिक, किंजदले तीन, सुटी किंवा जुळलेली असून ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक ते तीन कप्पे आणि प्रत्येक कप्प्यात एकच बीजक असते [→फुल]. फळ अश्मगर्भी (आठळी फळ) किंवा मृदुफळ असून त्याचे बाह्यकवच चिवट असते. बी सपुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश असलेले) व गर्भ लहान असतो.

तालवृक्षांपैकी बहुतेक फार उपयुक्त आहेत व त्यांचा मनुष्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. अन्न, आसरा, कपडा, पंखे, चटया,टोपल्या, इमारती लाकूड, जळण, तंतू (धागे), काथ्या, कागद, तेल, स्टार्च, साबुदाणा, साखर, मेण, नीरा, मद्य, टॅनीन, रंग सामान, रेझीन इ. विविध वस्तू प्रत्यक्ष किंवा कच्च्या स्वरूपात त्यांच्यापासून मिळविल्या जातात [→पाम]. कित्येक जातींची झाडे बागेत व रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता लावतात (उदा., बॉटल पाम, टेबल पाम, केन पाम, ताड इ.)

पुरातनत्व ताल कुलातील वनस्पती ह्या फार प्राचीन असून त्यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) भूस्तरात सर्वत्र सापडतात.पहिला ताल जीवाश्मांचा वृत्तांत पानांसंबंधी असून त्यांपैकी एकाच्या पात्याचा तळभाग (प्रोपामोफायलम लियासिनम) ओ.लिग्नियर यांनी १९०८ साली वर्णन केलेला आहे. त्या जीवाश्माचा काल फ्रान्समधील पूर्व जुरासिक (सु. १८.५० कोटी वर्षांपूर्वीचा) आहे. दुसरा जीवाश्म-वृत्तांत रॉबर्ट ब्राउन यांनी १९५६ मध्ये वर्णिलेला असून त्यांच्या जीवाश्मांचा काल कोलोरॅडो येथील उ. ट्रायसिक (सु. २१.५ ते २० कोटी वर्षांपूर्वीचा) आहे; हे जीवाश्म साध्या पूर्ण पानांचे असून त्यांचे आकारमान ४० X २५सेंमी. आहे; ती धारण करणार्‍या वनस्पतींच्या (सॅनमिग्वेलिया लेविसी) जलद निमुळत्या होत गेलेल्या खोडावर एकाआड एक पाने होती. यापुढील तृतीय कल्पातील (सु. ६.५ – १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या) तालांचे अस्तित्व स्पिट्सबर्गेन येथील परागकणांमुळे सिद्ध झाले आहे. त्या वेळी असलेल्या सौम्य हवामानाची कल्पना अलास्कातील एका तालाच्या (फ्लॅबेलॅरिया फ्लोरिसँटी) अस्तित्वामुळे येते. उ. क्रिटेशस (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात पामोझायलॉनची एक जाती न्यू जर्सीतील मॅगॉथी शैलसमूहात (खडकांत) आणि फ्लॅबेलॅरियाची एक जाती डाकोटा शैलसमूहात आढळते. उ. अमेरिकेत इओसीन कल्पातील (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील) तालांचे जीवाश्म भरपूर आढळतात; त्यांत खोड व पाने (उदा.,साबल) विशेष असून इंग्लंडमधील खडकांत फळे [उदा., निपा; →गुलगा] विपुल सापडली आहेत. ऑलिगोसीन (सु. ३.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि मायोसीन (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात मध्य यूरोपात ताल कुलातील अनेक जाती होत्या आणि त्यांचा प्रसार उत्तरेकडे ग्रीनलंडपर्यंत होता. टेम्स नदीच्या मुखाजवळ (लंडन क्ले) व द. किनार्‍यावरील तत्सम ठिकाणी,तसेच फ्रान्स, बेल्जियम आणि इटली येथे ‘निपॅडाइट्स’ नावाचे फळांचे विविध आकार-प्रकारांचे जीवाश्म आढळतात. ते सर्व विद्यमान व वर उल्लेख केलेल्या निपाशी संबंधित असून त्या वंशातील जातींचा भौगोलिक प्रसार किती विस्तृत होता व त्यामध्ये विविधता किती होती याची कल्पना येते. हल्ली निपाचे अस्तित्व फक्त इंडोमलायातील नदीमुख-खाड्यांतील चिखलांनी भरलेल्या प्रदेशात आहे भारताच्या अंतरा-ट्रॅपी श्रेणीत (सु. ९-५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील खडकांत) सु. ३३ किंवा अधिक तालांच्या जातींचे जीवाश्म आढळतात. ते बहुतेक सर्व खोडांचे, देठांचे किंवा मुळांचे आहेत; पाने व फळे यांचे जीवाश्म फार क्वचित सापडतात. –हायझोफायलम सुंदरम आणि पामोझायलॉन सुंदरम यांचा (खोडाच्या जीवाश्मांचा) उल्लेख येथे करणे आवश्यक आहे.पहिल्याचे वर्णन पुणे विद्यापीठातील त्र्यं. शं. महाबळे यांनी व दुसर्‍याचे लखनौ येथील प्रसिद्ध पुरावनस्पतितज्ञ बिरबल साहनी यांनी तत्पूर्वी केले आहे. हा जीवाश्म कोकॉस सुंदरम (नारळाच्या वंशातील एका जातीचा) आहे.

ताल वृक्षांच्या शरीरातील वाहक-घटकांची लक्षणे विचारात घेऊन महाबळे यांनी पामोझायलॉन या जीवाश्म वंशाचे विभेदन केले आहे. पामोकारपॉन इन्सायने या नावाचा सपुष्क फळाचा जीवाश्म (लहान फळ) त्यांना आढळला व तो नारळाच्या जमातीतील असल्याचे त्यांनी सिद्ध केले. तसेच नारळाच्या कोकॉस वंशातील काही जीवाश्मरूप जाती बव्हंशी लहान फळांच्या होत्या. त्यावरून व काही विद्यमान लहान फळांच्या कोकॉसच्या जाती लक्षात घेऊन कोकॉस वंशाचा क्रमविकास (उत्क्रांती) त्यांनी विशद केला आहे.

फीनिक्स ह्या नावाच्या खजूर, शिंदी, शेवरा इत्यादींच्या वंशातील एक जाती जीवाश्मरूपात त्यांना सापडली असून तिचे फिनिक्स रोबस्टा या विद्यमान जातीशी साम्यही दर्शविले आहे. तसेच पामोकॉलॉन व पामोस्ट्रॉबस या दोन नवीन (अंतरा-ट्रॅपी चर्टातील) जीवाश्म-वंशांचा शोध त्यांना लागला असून ताल कुलाचा क्रमविकास समजून घेण्यास या माहितीचा उपयोग केला आहे. अंतरा-ट्रॅपी श्रेणीतील खडकांत जल नेचांचे (मार्सिलिया, सालव्हिनिया, अँझोला इ.) काही जीवाश्म आढळले आहेत;साहनी, महाबळे, व्ही. एस्. राव इत्यादींनी त्यांसंबंधी व काही फुलझाडांच्या जीवाश्मांसंबंधी संशोधन केले आहे आणि त्यामुळे प्राचीन वनस्पती व विद्यमान वनस्पती यांचे आप्तसंबंध कळून आले आहेत.

 


पहा : जल नेचे; ताड; तेल माड; नारळ; पाम; पामेलीझ; पुरावनस्पतिविज्ञान; भेर्ली माड; शेवरा.

संदर्भ : 1. Andrew, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1961.

2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.

3. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

4. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

5. Secretary, Satkar Samiti, Life and Work of Dr. T. S. Mahabale, Poona, 1975.

लेखक: पाटील, शा. दा.

परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate