অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पार्स्ले

पार्स्ले

पार्स्ले

(पार्स्ली; लॅ. पेट्रोसेलिनम क्रिस्पम ; कुल-अंबेलिफेरी). ही द्विवर्षायू (दोन वर्षांपर्यंत जगणारी), काटक, सुगंधी ⇨ ओषधी मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरची (पेट्रोसेलिनम हा लॅटिन शब्द पेट्रोसेलिनॉन या ग्रीक शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ खडकावरील पार्स्ले असा आहे) असून भारतात व इतरत्र बागेत किंवा बागाईत जमिनीत लागवडीत आहे, मोठ्या प्रमाणावरही पिकवितात. हिला पहिल्या वर्षी दोनदा किंवा तीनदा पिसासारखी विभागलेली अनेक मूलज (मुळावरील संक्षिप्त खोडापासून आलेली), गर्द हिरवी पाने व दुसऱ्या वर्षी सु. एक मी. उंच व अनेक संयुक्त चामरकल्प (चवरीसारखे) फुलोरे असणारा दांडा येतो. नंतरची पाने त्रिदली असतात.

फळे लहान, पिवळट हिरवी किंवा पिवळी असतात. फळे [आंदोलिपाली; → फळ] २-३ मिमी. लांब, अर्धचंद्राकृती व रेषांकित असून ती पूर्ण पक्व झाल्यावर मांसल मुळांसकट खणून काढतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी कुलात [चामर गणात; → अंबेलेलीझ] वर्णिल्याप्रमाणे असतात. कुरळ्या व कुरकुरीत पानांची व ⇨ सलगम किंवा मुळ्यासारख्या लठ्ठ असे दोन प्रकार थंड हवामानात ओलसर जमिनीत चांगले येतात. पहिला प्रकार भारतात उंच टेकड्यांवर व दुसरा प्रकार यूरोपात पिकवितात. डोंगरावर मार्च ते मेमध्ये व मैदानी प्रदेशात ऑगस्ट ते नोव्हेंबरात पेरणी करतात, पंधरा दिवसांत अंकुर फुटतात; परंतु प्रथम गरम पाण्यात बी चांगले भिजविलेले असल्यास लवकर अंकुरण होते. लागवडीनंतर सु. तीन महिन्यांनी पाने काढण्यासारखी होतात व दोन-तीन वेळा काढता येतात. ह्या वनस्पतीच्या सर्वच भागांना तीव्र वास येतो.

पाने व मुळे खाद्य आहेत. कच्ची पाने सार, भाज्या व कोशिंबिरी यांत घालतात व मुळे सारात शिजवून खातात. त्यात क जीवनसत्त्व भरपूर असते. ताज्या पानांचा उपयोग अन्नपदार्थ मांडलेल्या बश्यांमध्ये शोभेकरिता ठेवण्यासाठी करतात. सुकी पाने व फुले मसाल्यात घालतात. ताज्या पानांत लोह, कॅल्शियम, कॅरोटीन आणि क जीवनसत्त्व असतात. ह्या वनस्पतींतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल (पार्स्ले तेल) ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेने) फळांपासून काढतात, ते अन्नपदार्थ स्वादिष्ट करण्यास व औषधाकरिता उपयुक्त असल्याने व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे असते. ही ओषधी मूत्रल (लघवी साफ करणारी), वायुनाशी, आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी), ज्वरनाशक, कीटकनाशक व उत्तेजक असते. पाने चुरगळून कीटकदंशावर लावतात. फळे उवा मारण्यास व कातडीवर उपजीविका करणाऱ्या इतर काही जीवांचा नाश करण्यास वापरतात.

 

 

लेखक -जमदाडे, ज.वि

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate