অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिंड्रा

पिंड्रा

पिंड्रा

 

(पांढरी, पेंडारी, पनेला; हिं. पिंडार, पिंडालू; क. कारे, पांड्री; गु. गांगेडा कौरिया; सं. गंगती, पिंडालू; इं. ग्रे एमेटिक नट; लॅ. रँडिया अलिगिनोजा; कुल-रूबिएसी). या लहान (४.५-६ मी. उंच) पानझडी वृक्षाचा प्रसार उत्तरेखेरीज भारताच्या इतर भागांत व महाराष्ट्रातील पडीत भात-खाचरांत व पानझडी जंगलात सामान्यपणे आढळतो; शिवाय तो श्रीलंकेत व ब्रह्मदेशातही आढळतो; उपहिमालयाच्या पट्ट्यात यमुनेपासून पूर्वेस व बंगालमध्येही तुरळकपणे आढळतो. याची सर्वसाधारणपणे लक्षणे त्याच्याच कुल-वंशातील ⇨गेळ्याप्रमाणे आहेत. साल तांबुस भुरी व पातळ खवल्यांनी सोलून जाणारी; काटे आखूड व सरळ. पाने साधी, समोरासमोर, गेळ्यापेक्षा मोठी पण साधारण तशीच; उपपर्ण त्रिकोणी; फेब्रुवारीत पाने गळतात व व नवी पालवी एप्रिलात येते. फुले एकाकी (एकेकटी), पांढरी किंवा मलईच्या रंगाची, सुवासिक, मोठी व ती मे-जूनमध्ये येतात. मृदूफळे लंबगोल, पिवळी व त्यावर संवर्ताचा दीर्घस्थायी अवशेष असतो. ती डिसेंबर-फेब्रुवारीत येतात. बिया अनेक, चपट्या आणि गुळगुळात असतात. पाने शिजवून खातात; ती हरिणे व गुरे यांना चारा म्हणून देतात. कच्ची फळे निखार्‍यावर भाजून (बिया व मधला भाग टाकून) आमांशावर व अतिसारावर देतात; ते स्तंभक (आकुंचन करणारे) असते. फळे भाजून किंवा शिजवून खातात. मूळ तूपात उकळून आमांश आणि अतिसारावर देतात. ते मूत्रल (लघवी साफ करणारे), शीतक (थंडावा देणारे) व पौष्टीक असते. लाकूड पाढरट करडे, घट्ट व कठीण ्सून कोरीव कामासाठी वापरतात. रंग गर्द करण्याकरिता फळ वापरतात. कच्चे फळ मत्स्यविष आहे.

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate