অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पित्तकारी

पित्तकारी

पित्तकारी-(पित्तमारी, अंतमूळ, खडकी रास्‍ना हिं. अंतमूल, जंगली पीकवान; क. किरूमंजि; लॅ. टायलोफोरा इंडिका किंवा टा. अस्थमॅटिका; कुल-अस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वलयिनी (वेल) कुंपणावर आणि उघड्या जंगलात तसेच खोल व रेताड जागी वाढते; भारतात (१,००० मी. उंचीपर्यंत) बहुतेक सर्वत्र तसेच श्रीलंका, थायलंड, मलेशिया इ.ठिकाणी आढळते. मुळे अनेक, लांब व मांसल; पाने साधी, समोरासमोर, ५-१० सेंमी., अंडाकृती किंवा दीर्घवृत्ताकृती, लांबट आणि तळाशी हृदयाकृती; फुले मोठी, हिरवट पिवळी, चवरीसारख्या वल्लरीवर ऑगस्ट ते नोव्हेंबरात येतात. फुलांत केसरमंडल आणि किंजमंडल यांच्यापासून बनलेली संरचना (किंजकेसराक्ष) आढळते [ ⟶ फूल ]. पेटिकाफळांची जोडी असून प्रत्येक फळ ७-१० सेंमी. लांब, रेषांकित व टोकदार असते; बियांवर केसांचा झुबका असतो. [ ⟶ अस्क्लेपीएडेसी ].

या वनस्पतीचा ⇨इपेकॅकऐवजी अतिसाकावर उपयोग करतात. पाने वांतिकारक (ओकारी काढणारी), स्वेदकारक (घाम आणणारी) व कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) असतात. फार खाल्ल्याने पोट भरल्यास व इतर वेळी वांतीसाठी देतात. नूतन व रक्ती आवेत याची मात्रा देताना अफू व सुंठ देतात, म्हणजे उलटी न होता विकार कमी होतो. ताज्या मुळाची साल पाण्यात उगाळून दिल्यास उलटी व जुलाब होतात. पित्तप्रकोपातही हेच देतात. अंगदुखीत व संधिवातात मुळे स्वेदजनक व मूलत्र (लघवी साफ करणार्‍या द्रव्याबरोबर देतात. मुळाचा फांट [ ⟶औषधिकल्प ] दम्यावर देतात. या वनस्पतीत टायलोफोरिनीन ही अल्कलॉइडे असतात.हवेत वाळविलेल्या मुळापासून ०.१८ % रंगहीन स्फटिकी घन पदार्थ मिळतो; बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल ०.२६ % असते. पानांचा काढा आणि मुळांच्या सालीचा फांट अतिसार, दमा आणि श्वासनलिकादाह यांवर गुणकारी असल्याचे आढळले आहे.

 

लेखक: जमदाडे, ज.वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate