অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पित्तपापडा

पित्तपापडा

(हिं. पित्तपापडा; क. कल्लुसब्बसिगे; गु. पित्तपापडो; सं. पर्पट, पर्पटक, अतिसारघ्‍न; इं. फ्यूमिटोरी; लॅ.फ्यूमॅरिया पार्व्हिफ्लोरा, उपजाती व्हायलॅन्टाय, फ्यू. इंडिका कुल-फ्यूमॅरिएसी). ही पसरट वाढणारी लहान क्षुपीय (झुडपासारखी) वनस्पती शेतात तणासारखी वाढते आणि दख्खन, खानदेश, गंगेचे मैदान ते नेपाळ व येथून निलगिरी पर्वतापर्यंत, सिंध व बलुचिस्तान इ. प्रदेशांत आढळते. हिच्या वंशातील (फ्यूमॅरिया) एकूण ५० जातींपैकी भारतात फक्त २ आढळतात. प्रधान मूळ जाडजूड; खोड सु. १५-६० सेंमी. उंच आणि फांद्या गुळगुळीत किंवा काहीशा लवदार; पाने साधी, अतिखंडित, आतील (फिकट हिरव्या-करड्या मेणचट पदार्थाचे आवरण असलेली). खंड पसरट, रेषाकृती व सूच्याग्र (सुईसारखे अग्र असलेस्या); फुले द्विलिंगी, लहान, पांढरी किंवा फिकट गुलाबी व टोकास किरमिजी असून विरळ मंजरीत जानेवारीत येतात. संदले फार बारीक व शीघ्रपाती (लवकर गळणारी); छदे पातळ व भाजल्यासारखी; पाकळ्या चार व सुट्या; केसरदले सहा; किंजले दोन, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एकच कप्पा. एका पाकळीस शुंडिका असते [ ⟶ फूल ]. फळ (बोंड) गोलसर व चकाकीत; बी एकच. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ फ्यूमॅरिएसी कुलात (पर्पट कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वनस्पतीत फ्यूमेरिक अम्‍ल व फ्यूमारीन अल्कलॉइड असते. ती शक्तिवर्धक, कडू, कृमिनाशक, सौम्य रेचक व घाम आणणारी आहे. पानांचा फांट [⟶ औषधिकल्प ] शक्तिवर्धक व मूत्रल (लघवी साफ करणारा) असतो. काळ्या मिरीबरोबर हिवतापावर व काविळीवर या वनस्पतीचा काढा किंवा फांट देतात; तसेच त्वचाविकारात रक्तशुद्धीकरिताही तो देतात. शातेरा (फ्यूमॅरिया ऑफिसिनॅलिस; इं. कॉमन फ्यूमिटोरी; सं. यवनपर्पट) या समवांशिक जातीचा औषधी उपयोग सर्दी, पित्तज्वर, यकृतदोष, गंडमाळा ह्या विकारांत व काही त्वचारोगांत करतात; ती मूलत्र व सारक आहे. काहींच्या मते ही व फ्यू. पार्व्हिफ्लोरा या दोन्ही जाती भारतीय नाहीत. प्रथम वर्णन केलेली जाती भारतीय असून तिचे नाव फ्यूमॅरिया व्हायलॅन्टाय असेही आहे; बाजारात मिळणारा पित्तपापडा इराणमधून आलेल्या विदेशी (फ्यू. ऑफिसिनॅलिस व फ्यू. पार्व्हिफ्लोरा) सुक्या वनस्पतींचे भाग असतात. भारतीय वनस्पतीपासून मिळणारा माल त्याऐवजी उपयोगात आहे. चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या दोन्ही जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांत पर्पटक या नावे ह्या वनस्पतींचा उल्लेख आला आहे.

जमदाडे, ज.वि.;

परांडेकर, शं.आ.

घाटी पित्तपापडा

 

(हिं. खारमोर; गु. खटसळिओ; सं. परपथ; लॅ.रंजिया रेपेन्सकुल-अकँथेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ही औषधी वनस्पती अंशत: जमिनीसरपट वाढून तिच्या काही पेर्‍यांपासून फूटलेली मुळे जमिनीत जातात व उरलेला भाग सरळ वाढतो; एकूण खोडांची व फांद्यांची उंची एक मी. पेक्षा जास्त नसते. भारतातील सर्व उष्ण भागांत व श्रीलंकेत ती आढळते. महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषत: शेतात व कुंपणाकडेने, तणासारखी पावसाळ्यात भरपूर वाढते. फांद्या खोडाच्या तळभागांपासून निघाल्याने वनस्पती पसरट होते. पाने साधी, २.५-५ x १.५ सेंमी. लहान देठाची, भाल्यासारखी, टाकदार व लहान असून त्यांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास सरळ, २.५-६ सेंमी. लांबीचे (कणिश) फुलोरे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये येतात. फुले सच्छद व सच्छदक [⟶ फूल ], लहान, १.२ सेंमी. लांब, पांढरी, गुलाबी, पिवळट किंवा निळसर छटांची असून त्यावर ठिपके असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨अकँथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. केसरदले फक्त दोन; बोंडे आयत-लंबगोल, फार लहान, चपटी; बी गोलसर, फिकट तपकिरी व फार लहान असते. वनस्पतीचे चुर्ण ताप, खोकला व कृमी यांवर गुणकारी असून ताजी पाने चुरगळून एरंडेलातून डोक्यास लावल्यास खवडे नाहीसे होतात.

 

 

लेखक: पाटिल, शा.दा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate