অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिनी

पिनी

(क. एण्णे, येण्णेमर; हिं. संप्रणी; इं. मलबार मॅहॉगनी, लॅ.किंगिओडेंड्रॉन पिनॅटम, हार्डविकिया पिनॅटा; कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी). एका मोठया फुलझाडाचे (व्दिदलिकित आवृतबीज वनस्पतीचे) इंग्रजी नाव.

यांच्या किंगिओडेंड्रॉन वंशातील चार जातींपैकी एक भारतात, एक फिलिपीन्समध्ये, एक सॉलोमन बेटात व एक फिजी बेटात असा प्रसार आढळतो. हा एक सदापर्णी, भव्य, सु. ३० मी. उंची व सु. ४.२० मी. घेर असलेला वृक्ष असून भारतातील सह्याद्रीच्या जंगलात, त्रावणकोर, कर्नाटक,द. कारवार ते केरळ या भागांत आढळतो.

साल गर्द तपकिरी किंवा हिरवट व चिवट असते. पाने संयुक्त व एकांतरित (एकाआड एक) असून त्यांवर ५-१० सेंमी. लांब, संवृत (देठ असलेली), चिवट, आयत-अंडाकृती व टोकदार अशी ५-६ दले एकाआड एक असतात. फुले फार लहान व पांढरी असून त्यांच्या दाट मंजऱ्या मोठ्या परिमंजरीवर [→ पुष्पगंध] येतात. संदले पाच;संवर्त घंटाकृती; पाकळ्या नसतात.

केसरदले दहा; किंजपुटात एकच बीजक असते [→ फूल]. शिंबा (शेंग) लांबट, चिवट, टोकदार, २.५०-५ सेंमी. लांब व एका बीने पूर्ण भरलेली असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

या वृक्षाचे रसकाष्ठ पांढरे मळकट; मध्यकाष्ठ तांबूस व अधिक टिकाऊ, बळकट, जड व कठीण असून त्याला उत्तम झिलाई करता येते. पाण्याशी संपर्क आल्यास ते कुजत नाही; त्याचा उपयोग तुळ्या, पट्ट्या, वासे, छताच्या फळ्या, फरशी, सजावटी सामान, बिलियर्डची टेबले, कपाटे, तक्ते, जहाजबांधणी, प्लायवुड इ. कापीव व कातीव कामास केला जातो. खोडावर जमिनीपासून सु. एक मी. उंचीवर सु. २ सेंमी. व्यासाचे भोक पाडून त्यातून पाझरणारा रस जमा करतात; त्यापासून तांबूस किंवा तपकिरी ओलिओरेझीन (कोपेब बाल्समसारखे बाल्सम) मिळते.

रस पाझरणे थांबल्यानंतर भोकात पाचर मारुन ते सु.दहा वर्षे बंद ठेवतात व नंतर पुन्हा भोक पाडून रस जमा करतात. सु. २.६० मी. घेराच्या निरोगी वृक्षापासून सु. ५५ लि.ओलिओरेझीन मिळते. जास्तीत जास्त १८० लि. चा विक्रम आढळला आहे; त्याचा उपयोग टर्पेंटाइन मिसळून लाकडासलावण्यास व्हार्निशप्रमाणे करतात. त्यापासून (ओलिओरेझिनापासून) ऊर्ध्वपातनाने (उष्णतेने वाफ करुन व मग ती थंड करुनघटक अलग करण्याच्या क्रियेने) मिळणाऱ्या बाष्पनशील (बाष्परुपाने उडून जाणाऱ्या) व रंगहीन तेलाचा उपयोग लवंग-तेलाऐवजी होतो; हे तेल तिखट-कडवट असून त्याला राळेसारखा वास येतो. तेल साबणाकरिता वापरतात. तेल काढूनघेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग अल्कोहॉलामध्ये विरघळून त्याचा उपयोग व्हार्निश बनविण्यास करतात. या वृक्षाच्या ओलिओरेझिनाचा उपयोग प्रमेहावर (परम्यावर) करतात; हत्तींच्या जखमांना लावण्यासही ते वापरतात. या वृक्षाला ‘केरळी-अंजन’ हे नाव दिलेले आढळते [→ अंजन-२].

 

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate