অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिशा

पिशा

(पिसा, पिचली; क. हग्गोदिमर, तुडगेनसू; लॅ. अ‍ॅक्टिनोडॅफ्ने हूकेरी; कुल-लॉरेसी). फूलझाडांपैकी मध्यम आकारमानाचा सदापर्णी वृक्ष (आवृतबीज, व्दिदलिकित); याच्या वंशात (अ‍ॅक्टिनोडॅफ्ने ) एकूण ७० जाती असून त्यांपैकी सु. १५ जाती भारतात आढळतात. पिशाचा प्रसार द. भारताचा पू. व प. घाटमाथा, उ. कारवार, ओरिसा व सिक्कीम येथील दाट जंगले आणि महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर, माथेरान, आंबा घाट इ. प्रदेशात आहे.

खोडावरची साल भुरी व गुळगुळीत असून कोवळी पांढरट लवदार पाने झुबक्यांनी लोंबतात; इतर कोवळे भाग तांबूस व लवदार; पाने साधी, चिवट, काहीशी मंडलित, वरुन चकचकीत, दीर्घवृत्ताकृती-कुंतसम (भाल्यासारखी), तळाशी गोलसर व टोकाकडे लघुकोनी असून फांद्यांच्या टोकास ५-८ च्या झुबक्यांनी येतात; पानांतील शिरांची मांडणी पिसासारखी असते.

पानांच्या बगलेत एकलिंगी, पिवळट, लहान फुले स्वतंत्र झाडावरच्या पर्णहीन फांद्यांवर येतात; ती परस्परांवर अंशत: झाकून राहणाऱ्या (परिहित) सोनेरी खवल्यांनी झाकलेली असतात. पुं-पुष्पे ऑक्टोबर ते नोव्हेंबरात आठाच्या झुबक्यांनी येतात; स्त्रीपा-पुष्पे तशीच पण चामरकल्प (चवरीसारख्या) फुलोऱ्यात असतात. केसरदले पुं-पुष्पात नऊ व जननक्षम आणि स्त्रीहे-पुष्पात सपाट व वंध्य असतात, तंतूवर पांढरट विपुल केस आणि आतील तीन केसरदलांच्या तळाशी प्रत्येकी दोन-दोन प्रपिंडे (ग्रंथी) असून परागकोशात चार कप्पे आणि प्रत्येक कप्पा झडपेने उघडणारा असतो; किंजपुटात एक कप्पा, किंजल जाडसर, किंजल्क मोठा व छत्राकृती आणि बीजक एकच असते [→ फूल]; इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लॉरेसी कुलात (तमाल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ सु. १.५ सेंमी., लंबगोल, लाल व ⇨ ओकच्या वंजुफळाप्रमाणे परिदलाच्या पेल्यात आधारलेले असून फेब्रुवारी ते मार्चमध्येफळांचा बहर येतो.

पिशाचे लाकूड फिकट तपकिरी, मध्यम कठीण व उत्तम प्रतीचे असते. पाने गुरांना खाऊ घालतात. पानांचा फांट [→ औषधिकल्प] बुळबुळीत असून मूत्रविकार व मधुमेह यांवर गुणकारी असतो. बियांचे तेल मुरगळलेल्या अवयवांवर चोळतात. ⇨ तेल माडातील तेल व खोबरेल यांपेक्षा पिशाच्या बियांतील तेल लॉरिक अम्लाकरिता अधिक चांगले व उपयुक्त असते. लॉरिक अम्लाचा अनेक उद्योगांत मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. साबणापेक्षा प्रक्षालनाचे (स्वच्छ करण्याचे) कार्य अधिक चांगले करणारे सोडियम लॉरी सल्फेट बनविण्यास हे अम्ल उपयुक्त असते.

बियांत ४८% घन मेद (स्निग्ध पदार्थ) व त्यामध्ये ९६% ट्रायलॉरीन असते. खोडाच्या सालीत अ‍ॅक्टिनोडॅफ्नीन हे अल्कलॉइड असते. पिशाच्या वंशातील दुसरी जाती अ‍ॅ.अंगुस्तिफोलियाबिहार, ओरिसा व प. भारत येथे आढळते; तिच्या बियांत ३७% घन मेद व त्यात ९०% ट्रायलॉरीन असते; हिची फुलेही पिवळट असतात. ह्या दोन्ही जाती एकच असाव्यात असे पूर्वी मानीत व अद्यापही कोणी मानतात. अ‍ॅ.लॅनॅटा आणि अ‍ॅ. रेटिक्युलॅटा या अन्य जातीही भारतीयच आहेत; पहिली प. घाट व निलगिरीत आणि दुसरी खासी टेकडयांत आढळते.पहा : पिसी. जमदाडे, ज. वि.;

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate