অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिस्ता

पिस्ता

(क. गोनु हण्णु; सं. मकलक, निकोचक; इं. पिस्टाशिओ; लॅ. पिस्टाशिया वेरा; कुल-अ‍ॅनाकार्डिएसी). सु. दहा मी. उंचीचा हा पानझडी व पसरट फाद्यांचा वृक्ष मूळचा मध्य आशियातील रुक्ष प्रदेशातील असावा असे मानतात. अफगाणिस्तान, इराण, सिरिया, दमास्कस, मेसोपोटेमिया, खोरासान इ. प्रदेशांत तो आढळतो. लेबानन, सिरिया, तुर्कस्तान, पाकिस्तान, इटली व कॅलिफोर्निया येथे लहान-मोठ्या प्रमाणावर तो लागवडीत आहे. भारतात काश्मीर व श्रीनगर येथे फळबागांतून तो लावलेला आढळतो. अफगाणिस्तान व इराण येथून भारतात फळांची आयात होते (१९६५-६६ मध्ये सु. १,३१,५९८ किग्रॅ. आयात केली होती). भिन्न देशांतील भिन्न प्रकार त्या त्या देशाच्या नावाने ओळखतात. अलेप, ट्युनिस, सिसिली इ. नावे प्रचारात आहेत. पिस्ता या इराणी नावावरुन पिस्टाशिया हे वंशानाम दिले आहे. पिस्त्याच्या वंशात (पिस्टाशियात) एकूण दहा जाती असून भारतात फक्त दोनच आढळतात. ⇨ कक्कटशिंगी (पि. इंटेजेरिमा ) हिमालयी भागात (सिंधु ते कुमाऊँ या प्रदेशात) आढळते. ⇨ रुमा मस्तकीचे झाड (पि. लेंटिस्कस ) भूमध्यसामुद्रीक प्रदेशातील असून चघळण्याच्या गोंदाकरिता त्यातील रेझीन वापरतात; पिस्त्याप्रमाणे त्याची आयात होते. त्याऐवजी ज्या रेझिनाचा उपयोग करतात तो खिंजक वृक्षापासून (पिखिंजुक ) काढतात. हा लहान वृक्ष प. आशिया ते काश्मीरातील गिलगिटपर्यंत आढळतो व त्याची पाने गुरांना (उंट, म्हशी व रेडे यांना) चारण्यास, पानांवरील गाठी रंगविण्यास आणि कातड़े कमविण्यास आणि लाकूड शोभेच्या वस्तूंकरिता वापरतात.

चरकसंहितेत निकोचक या नावाने पिस्त्याचा अंतर्भाव फलवर्गात व सुश्रुतसंहितेत ताल वर्गात केला आहे. तसेच मदनपाल निघंटु ह्या वैद्यकिय ग्रंथात व आईन-इ-अकबरीत पिस्त्याचा उल्लेख आला आहे. पिस्ता पर्शियातून भारतात आणला असून त्याची लागवडही झाल्याचे नमूद आहे व त्याचे महत्त्वही सांगितलेले आहे.

पिस्त्याच्या वृक्षाला संयुक्त, विषमदली, पिच्छाकृती(पिसासारखी), एकाआड एक, प्रथम लवदार व नंतर गुळगुळीत पाने येतात; दले १-५ जोड्या असून प्रत्येक दल ५-१० x ३-६ सेंमी., भाल्यासारखे, अंडाकृती, बोथट टोकाचे,बिनदेठाचे व चिवट असते. फुले लहान व एकलिंगी असून ती स्वतंत्र झाडावर परिमंजरीवर [→ पुष्पबंध] येतात. फुलात ४-५ किंजदलांचा संयुक्त किंजपुट असून बीजक एकच असते. पुष्पस्थलीपासून किंजपुट मुक्त असतो [→ फूल]. तुर्कस्तानातील काही झाडांवर व्दिलिंगी फुले आढळतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ अ‍ॅनाकार्डिएसी कुलात (आम्रकुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पिस्त्याची आठळी फळे [अश्मगर्भी; → फळ] लंबगोल (१-२ x ०.६-१.२ सेंमी.) काहीशी चपटी, लालसर किंवा विविध रंगांची व सुरकुतलेली असून आतील आठळीपासून साल सहज अलग करता येते; ती आठळी फिकट पिवळी असून तिचे कवच कठीण असते. ती पुढे तडकते व आतील तांबूस बीजावरण दिसते. व्यापारात यांनाच ‘पिस्ते’ म्हणतात; ते बदाम-बीप्रमाणे उत्तम खाद्य आहे. मगज (गर) हिरवा किंवा पिवळट असतो. मिठाई, आइसक्रीम, पक्वान्ने यांमध्ये पिस्ते घालतात; खारवून व भाजून मुखशुध्दीकरिता खातात; बियांत ५०% स्निग्ध, सुगंधी, न सुकणारे व मधुर तेल असते. ते स्तंभक (आकुंचन करणारे), पाचक व शामक (शांत करणारे) असून पोटातील विकारांवर गुणकारी असते. पिस्ते पौष्टिक, स्वादिष्ट, पाचक व हितकर असतात. इराणात पक्व फळांच्या सालींचा मुरंबा करतात. सालीपासून खतही बनते. पानांवर येणाऱ्या गाठी (बोखारा गॉल्स) रंगविण्यास व कातडी कमाविण्यास वापरतात; त्यांमध्ये रेझीन, ५०% टॅनीन व गॅलिक अम्ल असते. बियांत शेकडा ५.६ पाणी, १९.८ प्रथिने, ५३.५ चरबी, १६.२ कार्बोहायड्रेटे, २.१ तंतू, २.८ खनिजे, ०.१४ कॅल्शियम, ०.४३ फॉस्फरस, १३.७ मिग्रॅ. लोह,कॅरोटीन (अ जीवनसत्त्व) २४० आंतरराष्ट्रीय एकके, थायमीन ०.६७, रिबोफ्लाविन ०.०३, निकोटिनीक अम्ल १.४ मिग्रॅ. इ.असतात. उष्णतामूल्य ६२६ / १०० ग्रॅ.; क जीवनसत्त्व नसते; आठळ्या आणि बिया यांमध्ये पेप्टीन ३.५३% असते.

लागवड, मशागत इत्यादी : पिस्त्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या लागवडीकडे हल्ली विशेष लक्ष दिले जात आहे. सुधारलेल्या जाती व कलमे उपलब्ध झाली आहेत. हा वृक्ष विभक्तलिंगी असल्याने नर-व स्त्री-वृक्ष साधारणपणे १:६ या प्रमाणात गटाने लावतात. ⇨ परागण वाऱ्याने होते किंवा हाताने करतात. निसर्गतः बिया पडून उगवलेली पिस्त्याची किंवा त्याच्या वंशातील इतर काही जातींची रोपे खुटांसारखी उपयोगात आणतात. आणि त्यावर इच्छित प्रकारच्या पिस्त्याच्या झाडाचे डोळे (कळ्या) किंवा तुकडे बसवून कलम करतात. या प्रकारे अभिवृध्दी करतात. सात-आठ वर्षांनी चांगला बहर येतो. फळे पक्व झाल्यावर झोडपून त्यांचे झुबके खाली अंथरलेल्या कापडावर पाडतात व ती फळे लागलीच सोलून आठळ्या उन्हात सुकवितात व साठवितात अथवा फळे तशीच सुकवून पुढे योग्य वेळी पाण्यात मुरवून आठळ्या सुट्या करतात व सुकवितात; काही तडकतात व काही तशाच राहतात. नंतर त्यावर लालसर रंग चढवून त्यांचे पुडे बांधतात. कधीकधी तत्पूर्वी त्या भाजून खारवतात; न तडकलेल्या आठळ्या फोडून बिया मिठाई, बेकरी पदार्थ व आइसक्रीम तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना विकतात. भाजणे व खारवणे ह्या प्रक्रियाही किरकोळ व्यापारी नंतर करतात.

 

लेखक: वैद्य, प्र. भ.;

परांडेकर, शं. आ

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate