অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्लंबॅजिनेसी

प्लंबॅजिनेसी

प्लंबॅजिनेसी

(चित्रक कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ह्या कुलाचा समावेश आडोल्फ एंग्लर व कार्ल फोन प्रांट्‌ल यांच्या पद्धतीत प्लंबॅजिनेलीझ गणात आणि जॉर्ज बेंथॅम व जे. डी. हूकर आणि जॉन हचिन्सन यांच्या पद्धतीत ⇨प्रिम्युलेलीझ गणात केलेला आढळतो. ह्या कुलातील वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ⇨औषधी, क्षुपे (झुडपे) अथवा वेली असतात. एकूण सु. १० वंश व ३०० जाती (जे.सी. विलिस यांच्या मते ५०० जाती); प्रसार-जगभर मध्यम रूक्ष प्रदेशात, लवणयुक्त गवताळ प्रदेशात व समुद्रकिनाऱ्यावर, पाने एकाआड एक, साधी; फुले द्विलिंगी, सच्छद, अरसमात्र, पंचभागी व अवकिंज असून ती विविध प्रकारच्या फुलोऱ्यात येतात; संदले जुळून वाढल्याने संवर्त नळीसारखा होतो;त्याचे पापुद्र्याप्रमाणे फळावर सतत आवरण राहते. पाकळ्या जुळलेल्या किंवा तळापासून बराच भाग सुटा; केसरदले पाकळ्यांसमोर, बहुधा अपिप्रदललग्न; परागकोश द्विपुटक व अंतर्मुख असून उभ्या रेषेवर तडकतात; बिंब नसते. किंजले पाच व संदलासमोर; किंजपुट ऊर्ध्वस्थ, त्यात एकच कप्पा व एकाकी, तलस्थ व लांब देठाचे लोंबते बीजक [→ फूल]. फळ क्लोम (फुग्यासारखे) किंवा आडवे फुटणारे बोंड; बी सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले). ह्या कुलातील वनस्पतींना फारसे व्यावहारिक महत्त्व नाही. ⇨ चित्रक व तत्सम इतर वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात. चित्रक औषधी व विषारी वनस्पती आहे.

ह्या कुलातील कित्येक जातींवर श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव किंवा चुन्याच्या निवळीसारखा द्रव स्त्रवणारे प्रपिंड (ग्रंथी) असतात. भेंडात व ⇨ मध्यत्वचेत ⇨ वाहक वृंद आणि अंतर्वेशी ⇨ परिकाष्ठ आढळते.

 

 

संदर्भ : Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate