অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फायकॉइडी

फायकॉइडी

फायकॉइडी

(वालुक कुल). फुलझाडांपैकी[→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एक कुल. याचा अंतर्भाव जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी फायकॉइडी या नावाने फायकॉइडेलीझ या गणात केला असून जे. हचिन्सन यांनी फायकॉइडेसी या नावाने कॅरिओफायलेलीझ गणात केला आहे; ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी दिलेले ऐझोएसी हेच नाव हल्ली वापरले जाते. या कुलात एकूण सु. १३० वंश व सु. १,२०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते. १०० वंश व ६०० जाती; ए. बी. रेंडेल यांच्या मते २३ वंश व १,१०० जाती) असून त्यांचा प्रसार विशेषतः द. अफ्रिकेत झाला आहे. तथापि आफ्रिकेतील व आशियातील उष्ण भाग, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया व द. अमेरिका इ. प्रदेशांतही यांतील वनस्पती आढळतात. फायटोलॅकेसी (पाटलपुष्प कुल) किंवा ⇨ कॅरिओफायलेसी आणि ⇨ कॅक्टेसी (नागफणा कुल) या कुलांशी या कुलाचे आप्तभाव असून ⇨ रॅनेलीझ (मोरवेल गण) पासून कॅक्टेलीझ (नागफणा गण) मार्गे याचा उगम झाला असावा, असे मानतात. यांशिवाय याचे ⇨पोर्चुलॅकेसी (लोणी कुल), ⇨ निक्टॅजिनेसी (पुनर्नवा कुल), ⇨अँमरँटेसी (आघाडा कुल), ⇨ बॅसेलेसी (मायाळ कुल) व ⇨ चिनोपोडिएसी (चाकवत कुल) यांच्याशीही आप्तभाव आहेत.

फायकॉइडी कुलातील बहुतेक वनस्पती उष्ण व कोरड्या हवामानातील असल्याने त्यांचे ⇨ मरुवनस्पतींशी साम्य असते. त्या वर्षायू (एका हंगामात क्रम पूर्ण करणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे किंवा ओषधी [→ ओषधी] असून त्यांची पाने साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, अरूंद व कधीकधी मांसल किंवा खवल्यासारखी असतात; क्वचित उपपर्णे असतात; खोडावर शेंड्याकडे किंवा पानांच्या बगलेत वल्लरीवर[→ पुष्पबंध] नियमित, द्विलिंगी फुले येतात.

फुलांत फक्त संवर्त असून संदले ४-५, सुटी किंवा जुळलेली; व कधी संख्येने अधिक आणि किंजपुटास चिकटलेली किंवा त्यापासून सुटी; केसरदले ३, ५ किंवा अनेक, अंशतः किंवा पूर्णपणे जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुट २, ५ किंवा अनेक किंजदलांपासून बनलेला व त्यात एक किंवा अनेक कप्पे; किंजल्क २-२० व बीजके प्रत्येक कप्प्यात एक ते अनेक असून मांडणी विविध प्रकारची असते [→ फूल]. बोंड (फळ) आडवे फुटते किंवा त्यातील पडदे तुटून फुटते; बिया बहुधा अनेक आणि त्यांत पिठूळ पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) व त्याला वेढणारा मोठा गर्भ असतो. मृदुफळ क्वचित आढळते व फुलात बाहेरील केसरदले पाकळ्यांसारखी असतात. किंजदलांचे स्थान व बीजकांची मांडणी यांवर आधारित उपकुले बनविली आहेत. कित्येक जाती बागेत नवलपूर्णतेकरिता लावतात. न्यूझीलंड स्पिनॅक हे जेवताना कच्च्या भाजीप्रमाणे घेतात.भारतात माल्युगो, गिसेकिया, ट्रायँथेमा व सेसूव्हियम या चार वंशांतील काही जाती औषधांकरिता उपयुक्त आहेत.

(१) झरस (मॉल्युगो स्पर्ग्युला अथवा मॉ. ऑपोझिटिफोलिया) : हे मांसल क्षुप (झुडूप) कडू द्रव्ययुक्त असून बांळतपणात याची भाजी खाल्ल्यास शरीरक्रिया सुधारतात; त्वचारोगात लेप लावतात. कानदुखीत कानशिलावर लेप देतात.
(२) खरस (मॉ. स्ट्रिक्टा किंवा मॉ. पेंटॅफिला) : वीतभर उंचीची ओषधी; याची भाजी विषमज्वरात देतात. दीपक (भूक वाढविणारी), पूतिरोधक व सौम्य विरेचक; पानांचा फांट [ विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा; → औषधिकल्प] आर्तवजनक (ऋतुस्त्राव सुरू करणारा) ; पाने कडू व पाळीच्या तापावर उपयुक्त.
(३) पड (मॉ. सर्वियाना): दलदलीत वाढणारी वर्षायू ओषधी; ताप कमी करण्यास व परम्यावर उपयुक्त.
(४) सिरू सेरूपदी (मॉ. हिर्टा किंवा मॉ. लोटाइडिस): खार जमिनीत वाढणारी ओषधी; अतिसारात, पित्तविकारात आणि गळवे, जखमा व वेदना यांकरिता सुकी वनस्पती देतात.
(५) वळू (गिसेकिया फानेंसिऑइडिस, सं. वालुक): या पसरट ओषधीला वळूची भाजी असेही म्हणतात; तिची भाजी करतात. ही सुगंधी, कृमिनाशक व सौम्य विरेचक आहे.
(६) वसू (ट्रायँथेमा पोर्चुलॅकॅस्ट्रम): हिला बिशकोप्रा, वसुक अशीही नावे आहेत; गुणधर्म ⇨ वसूमध्ये वर्णिल्याप्रमाणे असतात.

(७) धाप (सेसूव्हियम पोर्चुलॅकॅस्ट्रम) : मांसल, सरपटत वाढणारी ओषधी; समुद्रकिनाऱ्यावर वाळूत सामान्यतः आढळते. चांगली शिजवून व लवणांश काढून टाकून हिची भाजी करतात.

 


संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Rendle. A. B. The Classification of Flowering Plants, London, 1963.

३. देसाई, वा. ग. औषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

लेखक-चिन्मुळगुंद, वासंती रा.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate