অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फेस्कू गवत

फेस्कू गवत

फेस्कू गवत : (इं. फेस्कू ग्रास; लॅ. फेस्टूका; कुल- ग्रॅमिनी). कुरणे व सुका चारा यांकरिता विशेषेकरून लागवडीत असलेल्या वर्षायू  (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) गवतांच्या गवते एका वंशाचे नाव. याचा प्रसार मुख्यतः समशीतोष्ण व आल्प्ससारख्या थंड प्रदेशात झालेला असून भिन्न देशांत याच्या एकूण सु. ८० जाती लागवडीत किंवा वन्य अवस्थेत आढळतात. अनेक प्रकारच्या जमिनीत व फार कडक थंडी नसल्या स हिवाळ्यात हे गवत चांगले वाढते व उन्हाळ्यातही त्याची मर्यादित वाढ चालू असते. हे भरपूर पीक देणारे व लागवडीस सोयीचे आहे. भारतात याच्या सु. १५ जाती आढळतात.  बहुतेक जाती हिमालयातील १,५०० - ४,५०० मी. उंचीवर व काही आसामातील खासी टेकड्यांत १,५०० –१,८०० मी. उंचीवर आढळतात. शोभेकरिता व चराऊ रानाकरिता याच्या कित्येक जाती लावतात. अमेरिकेत फेस्टूका आरूंडिनॅशिया या जातीचा लागवडीतील क्रमांक पहिला असून ‘आल्टा’ व ‘केंटकी –३१’ हे त्याचे संकरित वाण उपयोगात आहेत. त्यांची उंची सु. १ मी असते.

मेंढीचे फेस्कू गवत : (१) फुलोऱ्यांसह वनस्पती, (२) पानाचा छेद (मोठा करून दाखविलेला आहे).

भारतात ‘महाफेस्कू’ (फे. जाय गँशिया; जायंट फेस्कू) व ‘लाल फेस्कू’ (फे.रुब्रा; रेड फेस्कू) हिमालयात आढळतात. द. भारतात मेंढ्यांना खाद्य असे ‘मेंढीचे फेस्कू’ (फे. ओव्हिना, शीप्स फेस्कू)  आणि  ‘मेडो फेस्कू’ ( फे. इलॅटियर )  लागवडीत आहेत. मेडो फेस्कू ( ०·५ –१ ·५ मी. उंच )  ही जाती सर्वोत्कृष्ट असून यूरोप, आशिया, अमेरिका व कॅनडा या प्रदेशांत लागवडीत आहे .  महा फेस्कू सर्वांत उंच ( सु. १·७५ मी.) असून त्यात १७ ·३७ टक्के प्रथिन, १ ·२८ टक्के स्‍निग्ध पदार्थ,  ३४ ·०९ टक्के तूलीर ( सेल्युलोज ) आणि १० ·७९ टक्के राख असते. फे. ग्लॉका ही निळसर चंदेरी जाती बागेत शो भे करिता विशेष लोकप्रिय आहे, तिला  ‘ब्ल्यू फेस्कू’ म्हणतात .

फे स्टूका या वंशातील वनस्पतींना अरुंद व सपाट किंवा गुंडाळणारी पाने असून त्यांवर ताठर केस असतात. शुष्क हवेत स्टायपा मरु वनस्पति गवताच्या पानांप्रमाणे ती गुंडाळतात.  फुलांची कणिशके परिमंजरीसारख्या पुष्पबंध तुऱ्यावर येतात. कणिशके त्रिशाखी किंवा अनेक शाखी असून प्रत्येकात एक ते अनेक फुले येतात. सर्वांत वरची फुले अपूर्ण; तुसे पाच किंवा अधिक; परितुषावर फक्त टोक किंवा प्रशूक; लघुतुषे २; केसरदले ३; किंजपुट गुळगुळीत; किंजल अग्रस्थ व किंजल्क शिखालू ( केसाळ ) असते फूल. फळ खाली खोलगट किंवा त्यावर खोबण असून ते गुळगुळीत किंवा टोकास केसाळ असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ग्रॅमिनी  कुलात ( तृण कुलात )  वर्णिल्याप्रमाणे असतात .

 

संदर्भ  : C. S. I. R.  The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, Newl Delhi, 1956.

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate