অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बकव्हीट

बकव्हीट

बकव्हीट

(हिं.कोटू.फाफ्रा, ओग्ला; इं. ब्रँक; लॅ. फॅगोपायरम एक्यक्युलेंटम ,फॅ. सॅजिटेटम, पॉलिगोनम फॅगोपायरम ; कुल-पॉलिगोनेसी). या वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्या) औषधीचे [⟶ओषधि]. मध्य आशिया हे मूलस्थान असून अनेक देशांत तिची अन्नधान्याचे व चार्याषचे पीक म्हणून लागवड केली जाते. भारतात हिमालयात ६१०–३,६५० मी. उंचीपर्यंत काश्मीर ते सिक्कीम,खासी टेकड्या व मणिपूर आणि दक्षिणेस निलगिरी येथे बकव्हीटची अन्नधान्याचे कमी महत्त्वाचे पीक म्हणून लागवड केली जाते. पर्वताच्या खालच्या प्रदेशात अन्नधान्यापेक्षा त्याची भाजी म्हणूनच जास्त प्रमाणात लागवड होते. इतरत्र ते बागांतून आपोआप वाढलेले आढळते.

 

बकव्हीटची उंची ९०-१५० सेंमी. असते आणि पाने २.५-७.५ सेंमी. लांब,एकाआड एक, प्रशराकृती [बाणाच्या टोकासारखी व तळाची टोके बाहेर वळलेली आहेत अशा आकाराची; ⟶ पान] व लघुकोनी असतात. फुले फिकट गुलाबी पांढरी, सुवारिक, द्विरूपी व अगदी स्वयंवंघ्य (वांझ) [⟶फूल] असून बगलेतील किंवा टोकाच्या (शेंड्याला) वल्लरींवर [⟶पुष्पगंध] येतात. कृत्स्नफल तिकोनी, बारीक, त्याच्या कडा आडेयुक्त असून त्याचा रंग रूपेरी करडा ते तपकिरी किंवा काळा असतो.

दाण्याचा आकार, आकारमान व रंग यावरून बकव्हीटचे असंख्य प्रकार ओळखले जातात. दार्जिलिंग व चिनी या प्रकारांपैकी चिनी प्रकार हलका असल्याचे आढळून आले आहे. बकव्हीटच्या १००ग्रॅम दाण्यांमध्ये ६५ ग्रॅम कार्बोहायड्रेटे व १०.३ ग्रॅम प्रथिने हे प्रमुख घटक असतात.

बकव्हीट हे जोमाने वाढणारे पीक आहे व त्यास दमट थंड हवामान व उत्तम निचऱ्याची रेताड जमीन लागते. उत्तर भारतात याचे खरीपात पीक घेतात व निलगिरी येथे एप्रिलमध्ये पेरणी करतात. काही भागांत याचे वर्षभर पीक घेतात. हेक्टरी ४०-६० किग्रॅ. बी पेरतात व आच्छादन पीक म्हणून घेतल्यास ७० किग्रॅ. बी पेरतात. निलगिरी येथे हेक्टरी ५०० किग्रॅ. दाण्यांचे उत्पन्न येते. श्रीलंकेत १२०० किग्रॅ. उत्पन्नाची नोंद आहे.

बकव्हीटच्या पिठापासून पाव, भाकरी व लापशी हे पदार्थ बनवितात. कोवळी पाने व कोंब पालकाच्या भाजीप्रमाणे उकडून खातात. अमेरिकेत व रशियात याचे दाणे मुख्यतः पशुखाद्यात व कोंबड्याच्या खाद्यामध्ये वापरतात. भारतातही बकव्होटचे दाणे व त्याचे उपपदार्थ पाळीव जनावरांना खाऊ घालतात. याकरिता ते मका, ओट व सातू यांमध्ये २ : १ याप्रमाणात मिसळून व भरडून घेतात. कोवळ्या पिकाचा जनावरांसाठी पूरक चारा म्हणून उपयोग करतात. मेंढ्यांना ते अपायकारक असल्याचे समजतात. यांशिवाय ते शेतात पसरून वाढत असल्यामुळे व त्याच्या जोमदार वाढीमुळे त्याचे शेतजमिनीवर उत्तम आच्छादन तयार होते आणि त्यामुळे मुसळधार पावसाने होणारी जमिनीची धूप ते थांबविते. तसेच त्यापासून हेक्टरी १०,०००-१५,००० किग्रॅ. हिरवा पाला मिळतो. तो जमिनीत गाडून हिरवळीचे खत बनविता येते. विशेषतः नव्याने लागवडीखाली आणलेल्या जमिनी सुधारण्यासाठी हे फार उपयुक्त पीक समजले जाते.


लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate