অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बडीशेप

बडीशेप

बडीशेप

(बडीशेप, हिं. सौंफ, सोंप; क. बडिसोप्पू; गु. वरियाली;सुं. मधुरिका, शतपुष्पा; इं. फेनेल, लॅ. फीनिक्युलम व्हल्गेर; कुल-अंबेलिफेरी) ह्या वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या) सुंगधी ओषधीचे [⟶ओषधि] मूलस्थान द.यूरोप आणि आशिया असून हल्ली तिचे अनेक प्रकार व वाण लागवडीत आहेत. समशीतोष्ण व उपोष्ण कटिबंधात फळांकरिता बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिचे पीक काढतात. हीसु. १ मी. पेक्षा कमी उंच असून हिला अनेक व गर्द हिरव्या शाखा असतात. हिची पाने संयुक्त,बहुदली, असून अंतिम दलके रेषाकृती व देठ संवेष्टी (खोडात वेढणारे) असतात. फुले लहान, पिवळी, मोठ्या संयुक्त चवरीसारख्या फुलोऱ्यावर [⟶पुष्पबंध] शाखांच्या टोकांस ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये येतात. छदे व छदके नसतात [⟶फूल]. लहान हिरवट ते पिवळट रंगाची, ६-७ मिमी. लांबीची, लांबट, टोकदार,शुष्क फळे फुटून द्विभक्त फलधरावर त्याचे दोन भाग (फलांश) लोंबतात व ह्या प्रत्येकावर पाच कंगोरे व खोबणीत तैल-नलिका असतात [⟶फळ]. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी [⟶अंबेलेलीझ] कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

बडीशेपेच्या फळांपासून सुगंधी बाष्पनशील (बाष्प रूपात उडून जाणारे) तेल मिळते. व्यापारी दृष्ट्या फायदेशीर असे तेलकँपिलेशियम या उपजातीपासून मिळते. या उपजातीचे व्हल्गेर व डुल्से हे दोन प्रमुख प्रकार असून व्हल्गेरपासून कडू व डुल्सेपासून गोडे तेल काढतात. रशिया, रूमानिया, हंगेरी, जर्मनी, फ्रान्स, जपान, भारत, इटली, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अर्जेंटिना इ. देशांतव्हल्गेरपासून तेल उत्पादन करतात. तर फ्रान्स, इटली व द.यूरोपातील मॅसिडोनिया येथे डुल्से प्रकारापासून तेलाचे उत्पादन होते. भारतीय बडीशेप हा एक स्वतंत्र प्रकार (पॅन्मोरियम; फी .पॅन्मोरियम) मानला जातो.

भारतात सर्वत्र (१,८०० मी. उंचीपर्यंत) बडीशेप बागायती पीक म्हणून लागवडीत आहे. सौम्य हवा तिला मानवते. उ. भारतात रब्बी पिकाकरिता हिची हिवाळ्यात लागवड करतात. बडीशेप गुजरातेत खेडा, बडोदे व अहमदाबाद जिल्हे आणि कर्नाटकात बेळगाव आणि धारवाड जिल्हे येथे लागवडीत आहे. यांशिवाय पंजाब व राजस्थान येथेही हिची लागवड होते. हे पीक सकस, निचऱ्याच्या दुमट जमिनीत किंवा काळ्या रेतीयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत चांगले येते. उत्तरे-तील मैदानी भागांत ऑक्टोबर-नोव्हेंबरात आणि डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये हेक्टरी सु. ११ किग्रॅ. बिया हाताने फेरून प्रथम पेरणी करतात, रोपे ७-१० सेंमी. उंच झाली म्हणजे परस्परांत ३० सेंमी अंतर ठेवून लावणी करतात. कोरड्या हवेत दर आठवड्यास एकदा पाणी देतात. तण काढतात. फळे पूर्ण पिकण्यापूर्वी कापणी करतात. ४-५ दिवस उन्हात वाळल्यानंतर बडवून फळे सुटी करतात; दर हेक्टरी सु. ३५०-१,४०० किग्रॅ. उत्पन्न येते.

सुकी फळे (बडीशेप) उष्ण, सारक, दीपक, (भूक वाढविणारी), रूचिकार, सुगंधी, उत्तेजक, वाजीकार (कामोत्तेजक), कृत्रिम असून डोळ्यांचे विकार, जळजळ, ताप, तहान, पित्ताधिक्य, आमांश इत्यादी वर गुणकारी असतात. पाने मूत्रल (लघवी साफ करणारी). पाचक असून त्यांपासून दृष्टी सुधारते. मूळे रेचक; बडीशेप मासिक पाळी नियमित करते. लहान मुलांचा उदरवायू व मुरडा यांवर गुणकारी असते. छाती, प्लीहा (पानथरी) व मूत्रपिंड यांच्या विकारांत ती उपयुक्त असते; बडीशेपेचा गरम काढा दुग्धवृध्दीकरिता व घाम येण्यास देतात. पानांची भाजी करतात व फळे मसाल्यात, मिठाईत, स्वयंपाकात व तांबुलात वापरतात. लोणची व मद्ये यांतही ती वापरतात. बियांतील (फळींतील) बाष्पनशील तेल फिट पिवळट असून त्याला विशिष्ट चव व रूची असते. याचे शेकडा प्रमाण भारतीय फळात ०.७-१.२, परंतु यूरोपीय फळात ४-६ असते. याशिवाय ९-१३% स्निग्ध तेल असते. तेलाशिवाय फळात पेंटोसॅन,पेक्टीन, स्टार्च, ट्रायगोनेलीन, कोलीन व राख (१२%) तसेच आयोडीन, अ जीवनसत्त्व, थायामीन, रिबोफ्लाविन, निॲसीन, क जीवनसत्तव इ. असतात. वर सांगितल्याप्रमाणे कडू तेल व गोडे तेल असा फरक त्यात आढळतो. वास आणि रूची यांबाबत गोडे तेल असा फरक त्यात आढळतो. वास आणि रूची यांबाबत गोडे तेल नावाप्रमाणे असते. दोन्हीच्या रासायनिक संघटनांत फरक असतो. गोड्या तेलाचा उपयोगही स्वयंपाक, मिठाई, मद्ये, उत्तेजक पेय व ओषधे यांत करतात. हे तेल सुगंधी, बलवर्धक, वायुनाशी असून रेतकामुळे होणारा मुरडा या तेलाने कमी होतो; हे अंकुशकृमिनाशक असते; ते साबणातही वापरतात. तेल काढून घेतलेला चोथा गुरांना खाऊ घालतात. त्यात प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश इ. ठिकाणी पिकविलेल्या प्रकारांच्या फळांत फरक आढळतात. लखनौतील प्रकार सर्वश्रेष्ठ असतो. भारतातील उत्पादनापैकी फार थोड्या भागाची निर्यात होते. १९७५-७६ साली ६५३ टन बडीशेप निर्यात करण्यात आली. पाकिस्तान, श्रीलंका, ब्रम्हदेश, मलाया, केन्या, स्वीडन, ग्रेटब्रिटन, फ्रान्स, अमेरिका,इ. देशातून हिची भारतात आयात होते.

बडीशेपेच्या पिकावर करपा (सर्कोस्पोरा फीनिक्युली) व भुरी (लेव्हिल्यूला टॉरिया) असे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींनी म्हणजे कवकांनी होणारे) रोग पडतात. त्यांच्या नियंत्रणार्थ अनुक्रमे ताम्रयुक्त कवकनाशक व गंधकाची भुकटी याची फवाणी करतात. गुजरातेत हिला एका फुलकिड्याचाही उपद्रव होतो, त्यावर डीडीटी (०.२%) व निकोटीन सल्फेट मिसळून फवारतात.

 

संदर्भ : C.S.I.R. The Wealth of India ,Raw Materials, Vol. IV. New Delhi, 1956.

लेखक: ज. वि जमदाडे

शं. आ.परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate