অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बनऱ्हीया

बनऱ्हीया

बनऱ्हीया

(वनऱ्हीया; हिं. बोरिया; इं. रिसा, वाइल्डऱ्हीया; लॅ. ओरिओक्नाइड इंटेग्रिफोलिया, विलेब्रुनिया इंटेग्रिफोलिया; कुल-अर्टिकेसी). हा सदापर्णी लहान वृक्ष पूर्व हिमालय, आसाम, ओरिसा, सह्याद्री (१,३५० मी. उंचीपर्यंत), ते दक्षिणेत कोकणात, तसेच श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश (१,५०० मी. उंचीपर्यंत), अंदमान व निकोबार वेटे, चितगाँग इ. ठिकाणी जंगलात आढळतो. याची साल पातळ, करडी आणि धागेदार असून देठ, पानांची खालची बाजू व शाखा यांवर लव असते. पाने पातळ, मोठी (१५-३५ सेंमी.), साधी, दीर्घवृत्ताकृती-आयत किंवा काहीशी व्यस्त कुंताभ (तळाकडे निमुळती व टोकास गोलसर); उपपर्णे रेशमाप्रमाणे. हिरवट फुलांचे गोलाकृती वल्लरीय लहान गुच्छ [⟶ पुष्पबंध ] केसाळ असून ते पानांच्या खालच्या बाजूने निघणाऱ्या लहान शाखांवर येतात. कृत्स्नफळे (शुष्क एकबीजी फळे) मांसल छदावर असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨अर्टिकेसीत (वावळ कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

या वृक्षाच्या सालीपासून मिळणारा धागा ऱ्हीया [⟶रॅमी] या वनस्पतीच्या धाग्यासारखा असून त्याला ‘बनऱ्हीया’ म्हणतात. तथापि दोन्ही प्रकारांच्या धाग्यांतील फरक लक्षात घेऊन त्याला ‘रिसा’ हे नाव दिले आहे. पूर्व हिमालय व आसाम येथे रिसा भरपूर प्रमाणात असल्याने धाग्याचे स्थानिक उत्पादन बरेच होते. उघड्या ठिकाणी त्याची चांगली वाढ होत नसून ओहोळाच्या बाजूस सावलीत (दमट हवेत) ती (रिसा) वनस्पती उत्तम वाढते. रस्त्यांच्या दुतर्फा, बांध-बंधारे यांच्या बांजूस व चहाच्या मळ्यातील उतरणीवर तिची लागवड करतात. बिया व मुळांचे तुकडे वापरून नवीन लागवड करतात. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात स्कंधकर्तन (खोड ठराविक उंचीवर छाटणे) केल्यास पुढच्या जूनपर्यंत वाढून येणाऱ्या नवीन (आगंतुक) फांद्या धागा काढण्याकरिता उपलब्ध होतात. त्या पाण्यात टाकून कुजवून त्यांपासून धागा काढतात; तथापि तो आधुनिक शास्त्रीय पद्धतीने अधिक चांगला निघतो. तो धागा काहीसा तपकिरी अगर पांढरा व रेशमी तजेलदार असतो. त्याची लांबी २५-३० मिमी. व व्यास ०.०१३ मिमी. असून पोत, बळकटी व संघटन या दृष्टींनी तो ऱ्हीयापेक्षा श्रेष्ठ ठरला आहे. त्याचा उपयोग लहानमोठे दोर व तत्सम वस्तू, जाळी, किंतान, कॅन्‌व्हास, मत्स्योद्योगास लागणाऱ्या दोऱ्या आणि विशिष्ट प्रकारचे जाडेभरडे कापड इत्यांदींसाठी विविध प्रकारे करतात.

पाने व फुले औषधी आहेत. जावामध्ये या वनस्पतीचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा) म्हणून घेतात आणि डोळे धुण्यास व पुरळ नाहीसा करण्यास वापरतात. सुमात्रात पानांचे पोटीस डोकेदुखीवर बांधतात. फुलांपासून चांगले अत्तर मिळते. पानांपासून काढलेले तेल अत्तराकरिता किंवा साबणाकरिता वापरतात.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

2. Dastur, G. F. Useful Plants of India and Pakistan, Bombay, 1964.

3. MacMillar, H. F. Tropical Planting and Gardening, London 1956.

ज्ञानसागर, वि. रा.; परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate