অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बला

बला

(क. बळगिड, चित्तमुट्टी गिड; लॅ. पॅव्होनिया झेलॅनिका; कुल-माल्व्हेसी). सु. ०.०६ — १.२५ मी. उंचीचे हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप (झुडूप) आफ्रिकेतील उष्ण भाग, मॉरिशस, श्रीलंका, सिंध व भारत ह्या प्रदेसात सामान्यपणे आढळते. भारतात दख्खन, गुजरात व सौराष्ट्र येथे हे विशेषेकरून सापडते. याची पाने साधी, गोलसर, हृदयाकृती, त्रिखंडी, दातेरी व केसाळ असून देठावर चिकट केस असतात. फांद्या बारीक व शूलाकृती; फुले गुलाबी, पानांच्या बगलेत, एकाकी व नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. संवर्त पेल्यासारखा, संदले भाल्यासारखी; पुष्पमुकुट अपिसंवर्तापेक्षा (संवर्ताच्या खाली असलेल्या उपांगापेक्षा) लांब आणि छेदक (फुलाच्या तळास असलेली उपांगे) ८-१२; किंजदले पाच, सपक्ष, सुर- कुतलेली व बाहेरून गोलसर [→फूल]. शुष्क फळ दीर्घस्थायी अपिसंवर्ताने वेढलेले असते; बिया लहान व पिंगट काळ्या. याची इतर सामान्य शारीरित लक्षणे माल्व्हेसी कुलात (भेंडी कुलात) व वर्णिल्याप्रमाणे

असतात. ह्या झाडापासून उत्तम प्रतीचा धागा मिळतो; तो नरम पांढरा शुभ्र व बारीक पोताचा व अंबाडी व ताग (ज्यूट) यांच्यासारखा असतो. ही वनस्पती कृमिघ्न (कृमिनाशक) व रेचक म्हणून वापरतात.

सुगंधी बला

(काळा वाळा; गु. काळो वाळो; क. मुदिवला; सं. उदीच्य; लॅ. पॅ. ओडोरॅटा). वलाच्याच वंशातील ही दुसरी जाती श्रीलंका, सिंध, बलुचिस्तान व भारत येथे सामान्यपणे सर्वत्र आढळते. हे ४५-९० सेंमी. उंच, केसाळ, वर्षायू (जीवनक्रम एका वर्षात पूर्ण करणारे) व शाखित क्षुप असून याची काही लक्षणे बलाप्रमाणेच आहेत. फुले गुलाबी परंतु अधिक लांब व सुगंधी; छदके १०-१२; किंजदले पंखहीन; धागे व त्यांचे उपयोग वरीलप्रमाणे असून दोन्ही जातींतील धागे आखूड असल्याने व्यापारी दृष्टया महत्त्वाचे नाहीत. सुगंधी बलाची मुळे सुंगधी, स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तिवर्धक, दीपक (भूक वाढविणारी), शा-मक (शांतता देणारी), वायुनाशी व ज्वरहर (तापनाशी) असून आमांशा-वर गुणकारी असतात. पाने खाद्य; सर्वच वनस्पतीला कस्तुरीसारखा सु-वास येतो. ही बागेत लावतात. मुळांतील सुवासिक अर्क ‘हिना’ या अत्तरात घालतात. बला व अतिबला ही नावे माल्व्हेसी कुलातील दुसऱ्या वंशातील (सिडा) दोन जातींना लावलेली आढळतात [→चिकणा].

 

लेखक: गो. वि. जोशी

शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate