অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बिली

बिली

बिली

(क. बिलिबुदलिगे, बिलीदेवदारी; इं. व्हाइट सीडार; लॅ. डायसोझायलम मलबॅरिकम, डा. ग्लॅन्ड्युलोजम; कुल-मेलिएसी). हा भव्य वृक्ष पश्चिम घाटात कारवारपासून दक्षिणेकडे आढळतो. ह्याच्या वंशात एकूण सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. १० आहेत. आग्नेय आशिया ते ऑस्ट्रेलिया या प्रदेशात बहुतेक जाती आढळतात व ते सर्व वृक्ष आहेत. भारतातील जाती विशेषतः बंगाल, आसाम, दक्षिण भारत व अंदमान येथे आहेत. बिली वृक्ष सु. ९०० मी. उंचीपर्यंत आढळतो. बहुधा त्याचे अनेक वृक्ष एका ठिकाणी असतात व त्यांच्याबरोबर रानफणसाचेही वृक्ष [⟶ फणस] असतात. बिलीची उंची सु. ३६ मी. असून कोवळ्या भागांवर किंचित लव असते. साल फिकट रंगाची असून तिचे मोठे खवले सुटून जातात. पाने मोठी सु. ४८ सेंमी. लांब, संयुक्त व पिसासारखी; दले ४-५ जोड्या; प्रत्येक दल १०-२३ सेंमी. लांब, फिकट हिरवे, लंबगोल व लांबट टोकाचे; फुले लहान असून पानांच्या बगलेत शाखायुक्त फुलोऱ्यांवर (परिमंजरीवर) जानेवारी ते फेब्रुवारीत येतात. संदले लहान व चार; पाकळ्या चार, लांबट व टोकास काहीशा गोलसर; केसरदलांची नलिका कुंभाकृती; तिच्या टोकास आठ दाते व एकाआड एक परागकोश; चषकाकृती (पेल्यासारखे) बिंब; किंजपुट लवदार, ऊर्ध्वस्थ, चार कप्प्यांचा व किंजल्क चार खंडांत विभागलेला [⟶ फूल]. बोंड फळ सु. ५ सेंमी. व्यासाचे व गोलसर; पिकल्यावर गर्द पिवळे होते (मे ते जून) व तडकून त्याची ४ शकले होतात; बिया ३-४, तपकिरी व त्रिधारी असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे मेलिएसीत (निंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

बिया मोठ्या व जड असतात; त्यामुळे त्यांच्याद्वारे वृक्षाचा प्रसार फार होत नाही. पन्हेरीत बी रुजवून ६-८ महिन्यांची रोपे जूनमध्ये इच्छित स्थळी लावतात. प्रथम वाढ जलद होते; परंतु पुढे ती मंदच राहते.

याचे बाह्यकाष्ठ (बाहेरचे कार्यक्षम व वाहक लाकूड) पिवळट पांढरे व मध्यकाष्ठ (गाभ्यातील लाकूड) करडे तपकिरी असून त्यावर प्रथम पिवळट झाक असते; परंतु नंतर ते काळपट होते. लाकूड कठीण, मजबूत, लवचिक आणि जड असते; ते टिकाऊ असून त्याला वाळवीचा उपद्रव फारसा होत नाही. ते कापून व रंधून गुळगुळीत करता येते; त्याची सागवानाशी तुलना करता येते. पश्चिम किनारपट्टीत त्याचा प्रमुख उपयोग पिंपे तयार करण्याच्या उद्योगात करतात. खोबरेल तेल साठविण्यास लागणारी पिंपे बनविण्यास ते उत्तम असते. कारण त्याचा तेलाच्या रंगावर अनिष्ट परिणाम होत नाही व त्यातून तेल बाहेर पाझरत नाही. बांधकाम, फळ्या, सजावटी सामान, गाड्या, आगगाडीचे डबे, खाणीतील खांब, चौकटी, प्लायवुड. सिगारच्या पेट्या, आगपेट्या, इ. विविध वस्तूंकरिता ते वापरात आहे. लाकडाचा काढा संधिवातावर देतात; लाकडातील तेलाचा कान व डोळे यांच्या विकारांवर उपयोग करतात.

डा. हॅमिल्टोनी हा आसाम व पूर्व हिमालयातील सदापर्णी वृक्ष, देवदारू किंवा येरिंडी (डा. बायनेक्टरिफेरम; क. अगिलू, कडुगंधा) हा बंगाल, आसाम, सिक्किम व पश्चिम घाट येथील सदापर्णी वृक्ष आणि आसामातील डा. प्रोसीरम व डा. ग्रँडे हे याच्या वंशातील वृक्ष चांगल्या इमारती लाकडांकरिता कमीअधिक उपयुक्त आहेत.

 

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III. New Delhi, 1952.

2. Dastur, J. F. Useful Plants of India and Pakistan, Bombay, 1964.

लेखक: कुलकर्णी, सतीश वि.

परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate