অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बॉनसाई

बॉनसाई (बॉनसाय; लघुवृक्ष). नेहमीच्या (परिचित) मोठ्या झुडपांना किंवा वृक्षांना कृत्रिम उपायांनी त्यांची वाढ खुंटवून दिलेल्या फार लहान पण सौंदर्यपूर्ण आकाराच्या झाडाला हे नाव दिलेले आढळते. या नवलपूर्ण आकारामुळे घरात ही वस्तू कोठेही ठेवली, तरी तेथील सौंदर्यात भर पडते. असे आकार देण्याचे तंत्र व कला जपानमध्ये विशेष प्रगत झाली आहेत. ‘बॉनसाई’ हा शब्द दोन जपानी शब्दांपासून बनलेला आहे. ‘बॉन’ म्हणजे उथळ पात्र व ‘साई’ म्हणजे लघुवृक्ष; तथापि बॉनसाई हा शब्दच ‘पेंट्साई’ या चिनी शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ तबकातील (ट्रेमधील) लघुवृक्ष असा आहे.

इतिहास

बुद्ध मंदिराभोवती हे वृक्ष लावीत असावेत असा दहाव्या शतकातील उल्लेख सापडतो. जपानमध्ये पंधराव्या शतकात सामुराई योद्ध्यांचे एक प्रमुख अशिकागा (आठवे शोगून) यांनी एक बुद्ध मंदिर बांधले होते व त्यांनी या मंदिराभोवती पांढऱ्या वाळूत पाइन वृक्ष लावले पण ते खुजेच राहिले. खुजे वृक्ष असलेले ते निसर्गदृश्य पांढऱ्या वाळूमुळे अतिशय सुंदर दिसत असे व लोकांना ते फार आवडू लागले. लघुवृक्षाची कल्पना अशा तऱ्हेने अस्तित्वात आली असावी. ‘टोकोनोमा’ म्हणजे बुद्धमूर्ती ठेवण्याचे घरातील पवित्र स्थान आणि या ठिकाणी फुलांची सजावट करण्याची व उदबत्ती लावण्याची पद्धत होती. तेथे तबकांमधून पाइन वृक्ष लावण्याची पद्धत सुरू झाली, तीच पद्धत म्हणजे बॉनसाई होय. हे शांततेचे व आनंदाचे तसेच दीर्घायुष्याचे प्रतीक मानतात. ‘हा प्रत्येक वृक्ष आपले व्यक्तिमत्व प्रगट करतो’ असे निहानशोकी या जपानी गृहस्थांनी म्हटले आहे आणि पाइन वृक्षांत काही तरी गूढ असावे, अशी पूर्वी समजूत असल्यामुळे जपानमध्ये श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांच्या घरात एक तरी बॉनसाई-लघुवृक्ष असतोच. कुंड्यांतील लघुवृक्षांचा पहिला खात्रीलायक जपानी पुरावा टाकाकाने टाकाशिना यांच्या १३०९ मधील (भिंतीला टांगावयाच्या) एका गुंडाळी-चित्रात दिसून येतो. १३५१ मधील ‘बोकी-ई-कोटोबा’ या नावाच्या गुंडाळी–चित्रात ‘बॉनसान’ म्हणजे लघु-उद्यान दाखविले असून त्यात पाईन आणि कॅमेलिया हे वृक्ष लघुवृक्षरूपात आढळतात

फार पूर्वी जपानमध्ये एखाद्या लाकडी उथळ खोक्यात लहानसे निसर्गदृश्य बनवीत असत, त्याला ‘हाको-निवा’ असे नाव होते; ही कला विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तेथे प्रचलित होती. १९००च्या सुमारास इशुमी-चिसेन यांनी पूर्वीच्या पद्धतीतील मातीऐवजी केटो-त्सुची नावाच्या पिटाचा [⟶ पीट ] उपयोग ही निसर्गदृश्ये बनविण्यास केला. ह्यातूनच पुढे बॉनकेई ही कला पुढे आली; यामध्ये एखाद्या लहानशा थाळीत चिमुकले निसर्गदृश्य रंगीत वाळू, रंगीत दगड, पाण्यात भिजवून नरम झालेला कागद इत्यादींच्या साहाय्याने बनवीत. जुन्या हाको-निवाचा हा नवा अवतार फारच लोकप्रिय झाला; परंतु कालांतराने हे निसर्गदृश्य नाश पावते असे आढळले. ते टिकून राहावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यातून खरे वृक्ष व झुडपे-तेही फार लहान (लघू) स्वरूपात-नैसर्गिक माध्यमात (माती व दगडधोंडे यांमध्ये) वाढविणे ह्या कल्पनेचा-‘साईकेई’चा –उगम झाला. ह्या पद्धतील जपानमध्ये टोरिकी म्हणत. वाळू व चित्रविचित्र आकार-प्रकाराचे दगड यांचा उपयोग करू निसर्गदृश्य बनविण्याची एक कला अस्तित्वात होती; पण त्यात वनस्पतींचा समावेश नसे. तिला ‘बॉनसेकी’ म्हणत. तिचा उगम महाराणी सुइको (५९३-६२८) यांच्या काळात झाला होता; त्या वेळी जपान दरबारला चीनमधून भिन्न आकाराचे दुर्मिळ दगडधोंडे देणगी म्हणून पाठविले जात. जपानमध्ये उथळ पात्रातील वृक्षांना ‘हाची-नो-की’ म्हणत व ते कुंड्यांतील वृक्षांपेक्षा (‘हाचीयुयी’पेक्षा) वेगळे होते. ‘हाची-निवा’ म्हणजे बशीतील बाग व ‘बॉनकेई’ यांच्यापासून लघुवृक्ष वाढविणाऱ्यांना आपले वेगळेपण प्रस्थापित करावयाचे होते म्हणून त्यांनी वृक्ष लघुकरणाचे वेगळे तंत्र विकसित केले व त्यालाच बॉनसाई असे नाव पडले.

वैशिष्ट्य

बॉनसाई या प्रकारात कृत्रिम रीत्या बनविलेल्या लहान झाडाचे वय महत्त्वाचे नसून त्यांचा सौंदर्यपूर्ण आकार व स्वरूप (अनेकदा नैसर्गिक स्वरूपाशी तुल्य) आकर्षक करणे हे ध्येय असते. ह्या कलेची जपानमध्ये इतकी प्रगती झाली की, १९०९ मध्ये लंडनमध्ये भरलेल्या लघुवृक्षांच्या प्रदर्शनामुळे साऱ्या जगाचे लक्ष या कलेने वेधून घेतले व अनेक उच्चभ्रू मातबर लोकांची ह्या वृक्षांच्या खरेदीसाठी अहमहमिका लागली. जपानमध्ये काही लघुवृक्ष ६००-८०० वर्षे वयाचे आहेत; त्यावरून असा ग्रह होतो की, लघुवृक्ष-कला तत्पूर्वीपासून व्यवहारात असावी; पण तसे नाही. ज्यांचे लघुत्व निसर्गाने त्यांच्यावर लादलेले होते अशा काहींची निवड करून त्यांची वाढ कुंडीत केली जाऊन लघुत्वाचे काही संस्कार त्यांच्यावर केले गेले व आज ते वृक्ष लघुवृक्षांच्या मालिकेत बसविले गेले आहेत. त्यांच्या निसर्गातील वयासंबंधी खात्रीलायक पुरावा मिळवून नंतरच त्यांचे अंतिम वय ठरविले गेले. निसर्गातील खुजे वृक्ष शोधून काढून त्यांना कुंडीत स्थान देऊन ठेवणे हा जपानी लोकांचा छंद होता व त्या वृक्षांना ते ‘कुंड्यांतील वृक्ष’ म्हणत. जपानातील मुरोमाची काळाच्या (१३३५-१५७३) शेवटी ‘कुंड्यांतील वृक्षां’च्या आकारात सुधारणा घडवून आणण्याची कल्पना पुढे आली; आजही तशाच पद्धतीने सुधारणा चालू राहून ‘बॉनसाई’ झालेली काही झाडे येथे आहेत. त्यानंतर मेजी काळात (१८६८-१९१२) याच कलेचा जास्त विकास झाला व तो आजच्या लघुवृक्ष-कलेशी तुल्य आहे. नैसर्गिक रीत्या खुजे झालेले आणि ज्यांचे लघुत्व जतन केलेले आहे असे काही वृक्ष आज जपानमधील (टोकिओतील) शाही उद्यानात आहेत.

अधिक वयाचा लघुवृक्ष कौतुकास्पद होतो हे खरे; पण लघुवृक्ष लहान वयाचाही असू शकतो व तो संस्कारांनी आपले लघुत्व टिकवतो व वयाने वाढत राहतो. साधारणपणे लघुत्वाचे संस्कार झालेला वृक्ष बराच अधिक काळ जगतो असे आढळले आहे; त्यांना पक्वता मंदपणे येते, काही फुलझाडे लवकर फुलतात व त्यांना फळेही लवकर येतात.

लघुवृक्षांकरिता वापरण्यात येणारे विविध वृक्ष

जपानमध्ये लघुवृक्ष तयार करण्यासाठी पुढील सदापर्णी वृक्ष वापरण्यात येतात : सार्जंट जूनिपर (जूनिपेरस चायनेन्सिस सार्जेंटी), येद्दो स्प्रूस (पिसीया जेझोएन्सिस), जपानी पांढरा पाईन (पायनस पार्व्हिफ्लोरा), जपानी सीडार (क्रिप्टोमेरिया जॅपोनिका), जपानी हॉली (इलेक्स क्रेनॅटा) व ॲझेलियाचे विविध प्रकार. लघुवृक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या पानझडी वृक्षांपैकी भारी किंमतीचे वृक्ष म्हणजे करड्या सालीचा एल्म (झेल्कोव्हा सेरॅटा), त्रिशूल मॅपल (ॲसर बर्जेरियॅनम), जपानी मॅपलचे पुष्कळ प्रकार (उदा. ॲसर पामेटम), फ्लॉवरिंग क्विन्स (कीनोमेलिस जॅपोनिका), हॉथॉर्न (क्रिटिगस वंशातील जाती), जपानी जरदाळू (प्रुनस ममे), बुटके डाळिंब (प्युनिका ग्रॅनॅटम नाणा)व असंख्य प्रकारची लहान पानांची व लहान फुलांची जंगली सफरचंदे (क्रॅब ॲपल्स).

यांखेरीज जपान व अमेरिकेत लघुवृक्ष करण्यात आलेल्या जाती पुढीलप्रमाणे आहेत : सोनेरी लार्च (स्यूडोलॅरिक्स ॲमाबिलिस), जपानी लार्च (लॅरिक्स लेप्टोलेपिस), ॲटलास सीडार (सीड्रस ॲटलांटिका), पसरट वाढणारा जूनिपर-पुष्कळ प्रकार; तथापि विशेषतःजूनिपेरस स्क्वॅमेटा प्रोस्ट्रेटा, जपानी बीच (फॅगस जॅपोनिका), अमेरिकन व जपानी हॉर्नबीम (कार्पिनस कॅरोलायनियॅना व का. जॅपोनिका), चिनी हॅकबरी (सेल्टीस सायनेन्सिस), रॉकस्प्रे (फोटोनिॲस्टर हॉरिझाँटॅलिस), रेडवुड (सेक्वोया सेंपर्व्हिरेन्स), व डॉन रेडवूड (मेटासेक्वोया ग्लिप्टोस्ट्रोबॉयडीस).

बाहेर बागेकरिता जागा नसलेल्या शहरवासीयांकरिता वर्षभर घरात ठेवता येतील असे लघुवृक्ष पुढीलप्रमाणे आहेत : गार्डेनिया (लहान पानांची, गार्डेंनिया रॅडिकॅन्स), बॉक्सवुड (बक्सस मायक्रोफायला), पांढरा सीडार (कॅमिसायपॅरिस थायॉयडीस ), माँटेरी व ॲरिझोना सायप्रस ( क्युप्रेसस मॅक्रोकार्पा व क्यु. ऍरिझोनिका ), हिनोकी सायप्रस (केमिसायपॅरिस ऑब्च्यूसा ), फायर थॉर्न (पायराकँथा कॉक्सिनीया ) व जूनिपर, डाळिंब, डॉन रेडवुड, रॉकस्प्रे व फ्लॉवरिंग क्विन्स.

भारतात वड, आंबा, पिंपळ, बांबू, रबर, आकाशनिंब, कागदी लिंबू, चिंच, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रे, बोगनवेलीचे विविध प्रकार, जास्वंद, सोनचाफा इ. वनस्पतींचे लघुवृक्ष करण्यात आलेले आहेत.

अभिवृद्धी ‘लघुवृक्ष’ इतर नैसर्गिक वृक्षांप्रमाणेच वाढतात; त्यांच्या जीवनातील वाढ, त्यांना फुले येणे, फळे येणे, इ. सर्व गोष्टी इतरांप्रमाणेच घडून येतात; परंतु कृत्रिम रीत्या त्यांची वाढ रोखून त्यांना त्यांचे नित्याचे मोठे स्वरूप न मिळू देता लहानात लहान स्वरूप दिलेले असते. मात्र फुले व फळे यांचा आकार सामान्यपणे त्या जातीच्या मोठ्या वृक्षाच्या त्या अवयवांसारखाच असतो. लघुवृक्ष बनविण्याच्या साधारणतः पाच पद्धती आहेत :

(१) नैसर्गिक रीत्या वाढ खुंटलेल्या झाडांपासून,

(२) बी रुजवून आलेल्या रोपापासून,

(३) छाट कलमापासून,

(४) दुसऱ्या झाडावर कलम करून,

(५) दाब कलम व विभागणी करून (विभाजन पद्धती ).

निसर्गतः वाढ खुंटलेल्या वृक्षापासून

हे वृक्ष साधारणपणे डोंगरावर उंच जागी किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. अशा ठिकाणी निकृष्ट जमीन व जोरदार वारा यांमुळे झाडांची वाढ नैसर्गिक रीत्या खुंटलेली असते. अशी झाडे शोधून काढून ती अत्यंत काळजीपूर्वक तेथून आणून लागलीच पन्हेरीत लावतात. पहिले दोन-तीन महिने त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते; त्यांना सतत पाणी घालणे, सूर्यप्रकाश (ऊन) व वारा यांपासून संरक्षण करणे, पाने गुंडाळली गेली असल्यास दिवसातून तीन-चार वेळा तरी ती सरळ करणे ह्या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. एकदा त्या झाडाला नवीन मुळे फुटली म्हणजे त्याला पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवून थोडे खतही घालतात. एक वर्षानंतर त्याचे पन्हेरीतून योग्य अशा कुंडीत किंवा जमिनीत प्रतिरोपण करतात व झाडाची वाढ सुरू झाली की, त्याला आकार देतात.

बी रुजवून आलेल्या रोपापासून

बी रुजत घातल्यावर थोड्या दिवसांनी लहान रोप येते; त्याचा उपयोग लघुवृक्ष करण्याकरिता होतो.

परंतु त्याला फार काळ खर्च होतो. नवीन बी मिळविण्यासाठी साधारणपणे हिवाळ्यात बी गोळा करतात आणि लागलीच पेरतात. ते लागलीच वापरावयाचे नसल्यास कोरड्या व वातानुकूलित जागी काळजीपूर्वक जतन करून ठेवावे लागते. वापरताना आधी त्यासाठी तयार करून ठेवलेल्या कुंडीत अथवा जमिनीत बी पेरतात; पेरण्यापूर्वी रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवतात. बीजाचे कवच फार जाड असल्यास त्या बिया काहीशा चिंबवून नंतर पेरतात. बिया एकमेकींपासून काही अंतर ठेवून पेरतात व पुन्हा त्यांवर मातीचा थर व त्यावर शेवाळे व भुस्सा यांचा थर ठेवतात आणि पाणी देतात. दोन-तीन दिवसांनी हा वरचा थर उचलून खालची माती पुरेशी ओली आहे किंवा नाही हे पहावे लागते. बी रुजल्यावर हा थर काढून रोपे उन्हात उघड्या जागी ठेवतात. पुढे निदान सहा महिन्यांपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते; त्यानंतर पुन्हा योग्य जागी लागण करतात. सुमारे एक वर्षाने त्यांना आकार देता येतो.

छाट कलमापासून छाट कलमे करून नंतर त्यांपासून लघुवृक्ष करता येतात; याला अपवाद ⇨पाईन वृक्षांचा. कोणत्याही पूर्ण वाढ झालेल्या झाडांची कलमे नेहमीप्रमाणे घेऊन पुढे त्यांपासून लघुवृक्षात रूपांतर करता येते. उन्हाळा किंवा हिवाळा या ऋतूच्या सुरुवातीला धारदार कात्रीने छाटणी करतात. प्रत्येक कलमावर तीन ते पाच पेरी ठेवून तळाशी सु. २.५ सेंमी. पर्यंतची पाने व कळ्या काढून टाकतात. कलम फार जाड असल्यास तळाशी खाच पाडून त्यात एखादी पाचर किंवा लहान खडा बसवावा लागतो; त्यामुळे खाच बुजली जात नाही. इतर पाने कलमाच्या वाढीकरिता ठेवावी लागतात. पाने पाण्यात न बुडविता कलमे पाण्यात ठेवतात व नंतर सु. २.५ सेंमी. खोलीपर्यंत खोक्यात, कुंडीत वा जमिनीत पुरतात. त्यातील माती पुरेशी ओली ठेवावी लागते. सहा ते बारा महिन्यात कलमांना चांगली मुळे फुटून आली म्हणजे इष्ट ठिकाणी प्रतिरोपण करतात. तीन ते चार महिने विशेष प्रकारे काळजी घेऊन नवीन पाने व कळ्या आल्यावर झाडाला आकार देतात.

दुसऱ्या झाडावर (खुंटावर) कलम करून

या पद्धतीने लघुवृक्ष करता येतात; परंतु ही पद्धत गौण मानतात, कारण कलमांची खाच लघुवृक्षावर दिसते; तथापि वेळेची बचत होते म्हणून व्यापारी दृष्ट्या ही पद्धती पसंत करतात. आदल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या शेवटी मुख्य झाडांपासून साधारण एक मीटर लांबीच्या व भरपूर कळ्या असलेल्या लहान फांद्या (कलमे) कापतात व त्यांचा दोन तृतियांश भाग जमिनीत पुरून ठेवतात. पुढच्या वर्षी फांदीचा शेंड्याकडेचा थोडा भाग व खालचा थोडा भाग सोडून, मधल्या भागाचे सु. २.५ ते ४ सेंमी. लांबीचे तुकडे करतात. प्रत्येक तुकड्यावर एक ते दोन कळ्या असणे आवश्यक असते. खुंटाचे खोड दोन ते तीन वर्षे वाढलेले व जोमदार असावे लागते. त्याच्या शेंड्यावर किंवा बाजूस कलम लावता येते.[⟶ कलमे].

दाब कलमे व विभाजन पद्धती

या पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे पूर्ण वाढ झालेले लघुवृश्र सापेक्षतः कमी वेळात बनविता येतात. मुख्य झाडाच्या फांदीवर, जेथे नवीन मुळे फुटावी अशी अपेक्षा असते त्याच्या थोडे खाली तांब्याची तार (दाबपट्टीप्रमाणे) घट्ट गुंडाळतात.

ही प्रक्रिया झाडाच्या वाढीच्या आरंभी म्हणजे वसंत ऋतूच्या सुरुवातीस करतात. तार बांधतात त्याच्या थोडे वरच्या बाजूस ओलसर शेवाळे घालून कृषीत वापरतात त्या विशिष्ट प्लॅस्टीकने घट्ट बांधून टाकतात. लवकर मुळे न फुटल्यास पुनःपुन्हा त्यावर पाणी मारावे लागते. तीन ते सहा महिन्यांनी बांधून ठेवलेल्या फांदीला मुळे फुटतात; त्यानंतर ती फांदी मूळच्या खुंटापासून अलग करून स्वतंत्र ठिकाणी लावतात. काही वेळा तार न बांधता फांदीभोवतील सालीचा भाग काढून तेथे ओलसर माती व शेवाळे घालून बांधून ठेवतात; अथवा जमिनीलगतची फांदी निवडून तिला खाच पाडतात व त्यात पाचर किंवा लहान खडा घालून ठेवतात; नंतर ती फांदी वाकवून ठेवतात व त्यावर ओलसर माती घालतात; काही काळानंतर तेथे मुळे फुटतात; त्यानंतर ती फांदी अलग करून स्वतंत्रपणे लावतात. विभाजन पद्धतीने काही झाडे वाढवून त्यांचे लघुवृक्ष बनविता येतात. (१) मुळाजवळ फांद्या फुटतात अशा वृक्षापासून त्या फांद्या काही मुळांसह अलग करून स्वतंत्रपणे दुसरीकडे लावतात. (२) काही झाडांना धुमारे (प्ररोह) मुळांपासून फुटतात, ते (मुळासह) अलग करताना ४-५ सेंमी. उंचीचे खोड राखून काढतात व इतर ठिकाणी लावतात. उदा., डाळिंब, शेवंती, (३) सिलाजिनेला जॅपोनिका या जातीबाबत कळ्या व मूलदंड (फक्त मुळे धारण करणारा व जमिनीसरपट वाढणारा फांदीसारखा अवयव) यांसह फांदी कापून ती स्वतंत्रपणे लावतात. (४) प्रत्यक्ष मुळांचेच तुकडे लावून प्रथम नवीन रोपे तयार करतात; उदा., ⇨विस्टारिया. (५) मुळे, कंद किंवा कोंबासकट (कळ्यांसह मूलक्षोड; उदा., बांबू ) लावून प्रथम रोपे बनवितात.

लघुवृक्ष बनविण्याचे तंत्र ( कृती )

ज्यांचे लघुवृक्ष बनवितात त्यांची स्वतंत्र स्थापना प्रथम कशी करतात याचे वर्णन वर दिले आहे. शेवटी ते नेहमी कुंडीत, थाळीत किंवा तत्सम उथळ पात्रात वाढविले जातात. दर एक ते तीन वर्षांनी किंवा कधी एक वर्षाने सुद्धा प्रतिरोपण करतात.

साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला कुंडी किंवा पात्र बदलणे व मुळे कापणे हेच महत्त्वाचे असते. या वेळी उपयोगात आणावयाच्या मातीचा पोत व प्रकार त्या त्या लघुवृक्षावर अवलंबून असतो; तथापि ती माती प्रथम चाळूनच घेतात व कुंडीत भरतात; त्या वेळी पहिली माती मुळापासून सोडवून घेतात आणि नंतर मुख्य मुळाचा व बाजूकडच्या मुळांचा बराचसा भाग कापून टाकतात. तळाशी पोहोचणाऱ्या मुळांची छाटणी करताना तो लघुवृक्ष पानझडी आहे की सदापर्णी आहे हे समजून घेऊन मग मुळे कमी-जास्त लांब ठेवतात. नंतर ते झाड नवीन कुंडीत ठेवतात; लघुवृक्षाचे सौंदर्य वाढविण्यासाठी कधीकधी मुळे जमिनीवर दिसतील अशा प्रकारे कुंडीतील मातीत ठेवतात. त्यानंतर काही दिवस त्या झाडाची विशेष प्रकारे काळजी घेतात.

लघुवृक्षांच्या फांद्यांना इच्छित आकार देण्यासाठी तांब्याची तार वापरतात. ही तार प्रथम गव्हाचा किंवा भाताचा पिंजर जाळून त्या फुफाट्यात मंदाग्नीवर तापवून व नंतर निववून घेतात. लोखंडी तार कधीच वापरीत नाहीत. नवीन कळ्या येत असताना तार बांधीत नाहीत. फांदीला वेटोळे घालून तार बांधताना तिचा दाब फांदी मोडण्याइतपत नसावा; फांदी जास्त वाकवावयाची असल्यास तारेचे एक टोक जमिनीत घट्ट बसवावे लागते. एकदा बांधलेल्या तारा काढल्यावर पुन्हा एक वर्षपर्यंत बांधीत नाहीत. लघुवृक्षाला आकार देताना अनावश्यक व वेड्यावाकड्या फांद्या छाटून टाकतात. द्यावयाचा आकार एकदा निश्चित झाला की, दरवर्षी नवीन येणाऱ्या सर्व फांद्या छाटतात.

प्रकार

जपानमध्ये लघुवृक्षांच्या आकाराचे फांद्यांच्या स्वरूपावरून अनेक प्रकार मानले आहेत. त्यांतील पाच अधिक लोकप्रिय आहेत : (१) सरल (रीतसर ताठ),

(२) सरलाभ (औपचारिक किंवा काहीसा ताठ),

(३) झुकता,

(४) तिरपा (वा अर्धप्रपाती),

(५) प्रपाती (किंवा लोंबता).

यातील पहिल्या तिन्हींत लघुवृक्षाच्या पहिल्या तीन फांद्या एकत्र समुहाने वाढविलेल्या असतात; त्यांपैकी पुढच्या बाजूच्या दोन पुढे झुकलेल्या व मागच्या बाजूची एक ह्या दोन्ही फांद्यांच्या मध्यावर व मागे झुकलेली असते. पुढच्या फांद्यांच्या विस्तारावरूनच लघुवृक्षाची पुढची व मागची बाजू ठरविली जाते. पुढची बाजू अधिक दर्शनीय असते. ह्या सर्व फांद्या वाढविताना वरच्या फांदीमुळे खालची फांदी झाकली जाऊ देत नाहीत. शेवटच्या दोन पद्धतींत खोड काहीसे जमिनीच्या पृष्ठभागावर उभे असून नंतर लागलीच खाली वळलेले असते; क्र. ५ मधील लघुवृक्षाच्या फांद्या कुंडीच्या काठाखाली लोंबतात म्हणून त्यांना धबधब्याप्रमाणे (खाली पडणाऱ्या पाण्याच्या झोताप्रमाणे) अथवा ‘प्रपाती’ हे नाव दिलेले आहे; यातही फांद्या समूहाने वाढवितात. हा प्रकार टेबलाच्या कडेवर ठेवतात. क्र. ४ मधील लघुवृक्ष कुंडीच्या पृष्ठभागाशी फार लहान लघुकोन करून असतो. म्हणून त्यास त्याच्या तिरक्या अक्षरावरून ‘तिरपा’ (किंवा अर्धप्रपाती) हे नाव वापरले आहे. क्र. २. मधील लघुवृक्षाचा अक्ष सरळ झुकता यांच्यांमधल्या स्थितीचा असल्याने त्याला ‘सरलाभ’ (सरळ असल्याप्रमाणे, पण सरळ नव्हे) हे नाव दिले आहे. ह्या पाच मूळ प्रकारांवर आधारलेले इतर काही आकारही जपानी पद्धतीत आढळतात.

फांद्यांच्या आकाराबरोबरच इतर बाबींवर आधारलेले लघुवृक्षांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येते :

(अ) पात्रातील वृक्षांची संख्या,

(आ) खोडांची संख्या,

(इ) फांद्यांचा आकार

(ई) वृक्षाची उंची,

(उ) वृक्षाचा पाया.

(अ) आणि (इ) वृक्षांची संख्या-एका पात्रात एकच वृक्ष या प्रकाराला जपानी भाषेत ‘इपॉनयुई’ म्हणतात. याच प्रकारात फांद्यांचे निरनिराळे आकार असलेले उपप्रकार येतात.

(१) सरल (चॉकन),

(२) तिरपा (शाकन),

(३) वाकडे खोड असलेला (बंकन),

(४) प्रपाती (केनगाय),

(५) पीळयुक्त खोड असलेला (हंकन),

(६) खडकात किंवा खडकावर मूळ असलेला एक यातूनच अरण्य-वाटिका प्रकार तयार करता येतो.

(२) नेत्सुरानी : यात पाच-सात मुळे जोडलेले व कमीजास्त उंचीचे वृक्ष असतात. हा प्रकार एखाद्या कुटुंबासारखा वाटतो. सगळ्यात मोठा वडील, त्याच्यापेक्षा लहान आई, व इतर मुले असे प्रतीक मानतात.

(३) निसर्गदृश्य : एक मुख्य झाड व बाकीची छोटी झुडपे, डोंगर, दऱ्या असे मिळून निसर्गदृश्याचा आभास निर्माण करतात. (४) लादीवर तीन किंवा पाच वृक्ष लावून पठाराचा आभास उत्पन्न करता येतो.

(आ) खोडांची संख्या-यातील खोडांची संख्या दोन (म्हणजे वृक्ष एकच पण दोन खोडे फुटलेला) असलेल्या प्रकाराला जुळ्या खोडांचा प्रकार (‘सोकान’) म्हणतात. यात एक झाड मोठे व त्यामानाने दुसरे लहान असते म्हणून हे आई व मूल किंवा वडील व मुलगा असे प्रतीक मानतात. तीन खोडे असलेल्या प्रकाराला ‘संकन’ असे नाव आहे.

(ई) वृक्षाची उंची-लघुवृक्षाची उंची ६० सेंमी.पर्यंत असून कमी उंची म्हणजे ५ ते १५ सेंमी. उंची असलेल्या वृक्षांना ‘मेम बॉनसाई’ म्हणतात. या वृक्षांना ३ सेंमी. व्यासाचे पात्र वापरतात व ते लहान खोल्यांतून बरे दिसते. त्यांना पाणी जास्त (दिवसातून तीन वेळा) लागते. त्यांना आकार फारसे देता येत नाहीत. सरल, तिरपा प्रपाती एवढेच उपप्रकार यात असतात. (उ) वृक्षाचा पाया-याकरिता माती, खडक, लादी, बाहेर आलेले मूळ वगैरे वापरतात. सर्व वृक्षांना सर्वसाधारणपणे मातीच वापरतात. खडक व लादी हे प्रकार वर वर्णन केलेले आहेतच. बाहेर आलेल्या मुळाच्या प्रकाराला ‘निएगरी’ असे म्हणतात.

पोषण

लघुवृक्षांच्या वाढीच्या सर्व काळात त्यांना खताचा पुरवठा करावा लागतो. ह्या झाडांना सोयीस्कर अशी खते हलकी व नैसर्गिक असतात :

(१) सरकी, सरसू, किंवा सोयाबीन यांची पेंड;

(२) हाडांचा चुरा, सुकी मासळी, कोंबड्यांची विष्ठा यांपासून बनविलेले कार्बनी खत. यामध्ये थोडी राखही मिसळतात, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व तिची अम्लता कमी होते. कोणत्याही नैसर्गिक खतात साधारणपणे १०% राख मिसळणे फायद्याचे असल्याचे आढळते. फुले व फळे येण्याकरिता भरपूर फॉस्फरसयुक्त खत देतात. शोभा : लघुवृक्ष ठेवण्यासाठी लागणारी पात्रे (भांडी) अथवा कुंड्या त्यांचे सौंदर्य वाढवील असा आकार व रंगसंगती पाहून निवडावी लागतात. कधीकधी एकाच जातीचे किंवा वेगवेगळ्या जातींचे लघुवृक्ष एकत्र वाढवतात व त्यांचे सौंदर्य वाढविण्यास भिन्न आकार-प्रकारचे लहान-मोठे दगडही ठेवतात. यामध्ये कला व शास्त्र यांचा खरा एकत्रित आविष्कार आढळतो. जपानमध्ये ही कला पराकोटीला जाण्याचे कारण अनेकांनी आपले जीवन ही कला साध्य करून तो यशस्वी व्यवसाय म्हणून चालविण्यात खर्च केले आहे; इतकेच नव्हे, तर काहींनी त्यात एक पिढीजात परंपरा निर्माण केली आहे. लघुवृक्षांची सतत काळजी घ्यावी लागते व आवडत्या पाळीव प्राण्यांप्रमाणे त्यांच्याकडे कायम लक्ष पुरवावे लागते. वरचेवर पाणी देणे, काटछाट करणे, खत देणे, सूर्यप्रकाशात ठेवणे, रोगनिवारण इत्यादींसंबंधी जागरूक रहावे लागते. आयते तयार वृक्ष तात्कालिक प्रभावित झालेल्या अनेक शौकिनांनी पूर्वी विकत घेतले; परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे ते मेले. तथापि त्यांची भावना अशी झाली की, त्या नवलपूर्ण वस्तूभोवती जादूचे किंवा गूढत्वाचे वलय असावे; त्यांचे संगोपन व त्यांना सौंदर्यपूर्ण आकारात अनेक वर्षे सतत जिवंत ठेवणे ही एक गूढविद्या असावी व ती साधारण मनुष्याच्या आवाक्याबाहेरची आहे. सुदैवाने हा गैरसमज आता बराच कमी झाला आहे. जपानात आतापर्यंत सु. पाचशे भिन्न वनस्पतींवर त्यांना लघुरूप देण्याचे प्रयत्न होऊन ते कमीजास्त यशस्वी झाल्याचे नमूद केलेले आढळते. जपानात या लघुवृक्षांची प्रदर्शने भरतात, लिलाव होतात व तेथे या विषयावर उपयुक्त चर्चा करणारी मंडळेही आहेत. भारतात मुंबई येथे इंडो-जॅपनीज ॲसोसिएशन या संस्थेच्या बॉनसाई अभ्यास मंडळातर्फे लघुवृक्षांच्या कलेचा प्रसार करण्यात येत आहे. (चित्रपत्र ३१).

 

संदर्भ : 1. Parekh, Jyoti, Tropical Bonsai, Bombay, 1977. 2. Walker, Linda, Bonsai, New York, 1972. 3. Yoshimura, Yuji; Halford, G. M. The Japanese Art of Miniature Trees and Landscapes, Tokyo, 1957.

लेखक: वासंती रा. चिन्मुळगुंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate