অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरी

(इं. ब्रँबल; कुल-रोझेसी). फुलझाडांपैकी [वनस्पति, आवृत्तबीज; उपविभाग] रूबस या शास्त्रीय वंशातील काही काटेरी, काष्ठयुक्त झुडपांना किंवा त्यांच्या फळांना हे नाव देतात. (ब्लॅकबेरीला ‘कृष्ण बदरी’ हे नाव सुचविलेले आढळते). ही झुडपे मुख्यतः उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधातील असून त्यांची लागवड कुंपणांकरिता आणि फळांकरिता करतात. साधारणपणे ती द्विवर्षायू (दोन हंगामांत जीवनक्रम पूर्ण होणारी) असून त्यांची खोडे किंवा फांद्या उभ्या, आडव्या वाढतात किंवा आधाराने चढतात. पाने लहान, साधी किंवा संयुक्त असून दले ३ किंवा ५, क्वचित अधिक, अनियमित व दातेरी असतात. त्यांना पांढरी, गुलाबी किंवा लाल फुले, कधी एकेकटी व कधी अनेक फांद्यांच्या टोकांस मंजरीत किंवा चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात [⟶ पुष्पबंध]. घोसफळे काळी असून त्यांतील प्रत्येक फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) व पुष्पासन मांसल असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे रोझेसीमध्ये (गुलाब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात [⟶ रोझेलीस].

 

 

 

 

 

 

विलायती आंचू : (१) फुलांसह शाखा, (२) फूल,

(३) फुलाचा उभा छेद, (४) घोसफळ, (५) बीज.

विलायती आंचू

(लॅ. रूबस फ्रुटिकोसस). या जातीला इंग्रजीत ‘यूरोपीय ब्लॅकबेरी’ म्हणतात. तिला अंकुशासारखे काटे असून ती भोवतालच्या झाडांवर भार टाकून वाढते, काही फांद्या जमिनीवर पडून त्यांपासून पुन्हा मुळे फुटून नवीन झाडे येतात. या जातीत विविधता फार आढळते. हिचे अनेक प्रकार मानले असून कित्येक संकरज आहेत. त्यांची काश्मीर, आसाम व कुन्नूर (तमिळनाडू) येथे लागवड करतात. फळे खाद्य असून ब्रिटनमध्ये लोक ती आवडीने खातात. फळांचे मुरंबे व बलदायक रस करतात; तसेच ती डबाबंद करून ठेवतात व त्यांचे मद्य (ब्रँडी) बनवितात. आतड्याचे शैथिल्य, आमांश व माकड (डांग्या) खोकला यांवर मुळांचा काढा उपयुक्त; अतिसार थांबविण्यास पानांचा फांट (विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा;⟶ औषधिकल्प) देतात.

रू. फ्रुटिकोससचा डिस्कलर हा प्रकार पश्चिम हिमालयाच्या समशीतोष्ण भागात (काश्मिरात १,००० – २,००० मी. उंचीवर) आढळतो. हे मोठे सरळ शाखायुक्त व काटेरी झुडूप असून त्याच्या पानांच्या खालच्या बाजूस पांढरी लव असते. फुले लालसर व घोसफळे काळी असतात. फळे खाद्य असून त्यांपासून मद्य बनवितात व इतर मद्यांना रंग आणण्यास ती वापरतात. ब्लॅकबेरी व रासबेरी यांच्या बाबतीत लागवड, मशागत इ. सारख्याच असतात [⟶ रासबेरी].

पार्स्ले-पानी नावाची बिनकाटेरी जाती बागेत लावण्यास चांगली असून तिची फळे रुचकर असतात. लाल आंचू (रू. एलिप्टिकस)ही जाती हिमालयात, खासी टेकड्यांत व पश्चिम घाटात आढळते  तिची फळे खाद्य आहेत. कटसोल (इं. ब्लॅक चेरी; लॅ. रू. मोलुकॅनस) ही जाती आसामातील टेकड्या, त्रावणकोर व निलगिरी येथे आढळते व तिचीही फळे खाद्य आहेत.

संदर्भ : C.S.I. R. The Wealth of India, Raw Materials,Vol.IX, New Delhi, 1972.

 

लेखक - ज. वि. जमदाडे /  शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate