অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भद्रदंती

भद्रदंती

भद्रदंती

(चिनी एरंडी क. विलायती हरळू, सिमेअवडाला; सं. बहद्दंती, ज्योतिष्क, विरेचनी, विषभद्र; इं. कोरल प्लँट; लॅ. जट्रोफा मल्टिफिडा; कुल-यूफोर्बिएसी). ह्या सुंदर झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूलस्थान दक्षिण अमेरिका असून हा भारतात व इतरत्र बागेत शोभेकरिता लावतात. याची उंची २-३ मी. असून खोडावर साधी वाटोळी, पण पंजासारखी विभागलेली व ७.५-१२.५ सेंमी. व्यासाची, लांब देठाची पाने असतात. पानाचे सु. ५-११ खंड अरूंद, भाल्यासारखे व लांबट टोकदार असतात; उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली उपांगे) बारीक व विभागलेली; फुलोरा उंच अक्षावर असलेली कुंठित व पसरट वल्लरी [⟶ पुष्पबंध]; फुले एकलिंगी व एकाच झाडावर व पोवळ्यासारखी लाल; नर-पुष्पातील बियांत पाच प्रपिंडे (ग्रंथी); संदले व प्रदले प्रत्येकी पाच; स्त्री-पुष्पे मध्यवर्ती व त्यांतील कुंभाकृती [⟶ फूल]. फळ (बोंड) नरम व खाली निमुळते, वर रूंदट, मोठे (सु. २.५ सेंमी. लांब), त्रिखंडी व पिवळे; बिया २-४, लंबगोल-आयात, सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या). इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ यूफोर्बिएसीत (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

जावा व फिलिपीन्समध्ये कुंपणाऱ्या कडेने ही झाडे लावतात. त्यांची मांसल मुळे भाजून खातात; सर्व वनस्पती मत्स्यविष म्हणून वापरतात. इंडोचायनात सुक्या मुळांचा काढा अजीर्णावर देतात; तो पौष्टिकही असतो. फळ विषारी असून ते वांतिकारक (ओकारी आणणारे) असते; त्यामुळे पोटात तीव्र दाहयुक्त वेदना होतात. मेक्सिकोत पानांची भाजी करतात; कोस्टा रीकात कोवळा पाला खातात. गियानात बिया रेचक व वांतिकारक म्हणून वापरतात. कांपूचियात पानांचा खरजेवर व कंडूवर उपयोग करतात. वनस्पतील चीक जखमांवर लावतात. बियांतील तेल गर्भपातक असते. खोडातील चिकांत ०.३% पिवळट हिरवे बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारे) तेल असते. त्याला कांद्याचा वास येतो व ते प्रथम थंड वाटते; परंतु नेतर त्याची शिसारी येते. बियांतील स्थिर तेल (३०%) दिव्यांकरिता वापरतात. पानांत सॅपोनीन, टॅनीन व रेझीन ही द्रव्ये असतात.

 

संदर्भः Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indion Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975.

लेखक: ज. वि. जमदाडे

शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate