অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुतकेस

भुतकेस

(लावसट; हिं. सखद, बेदिना; क. हस्तिगिड; सं. श्रीवती; इं. पेपर चेस ट्री; धोबीज ट्री; लॅ. म्युसेंडा फ्राँडोजा; कुल-रूबिएसी). हे दुसऱ्या वनस्पतीवर किंवा अन्य आधारावर चढणारे झुडूप (किंवा लहान वृक्ष) असून भारतात उष्ण कटिबंधीय हिमालयात डेहराडूनपासून पूर्वेस, खासी टेकड्या, आसाम, द्विपकल्पाचा दक्षिण भाग व अंदमान येथे आणि मलाया, ब्रह्मदेश व श्रीलंका ह्या देशांत आढळते. कोठे कोठे हे शोभेकरिता बागेत लावतात. ह्या वनस्पतीच्या वंशात (म्युसेंडा ) एकूण सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात १५ आढळतात. म्यु. फ्राँडोजा ह्या जातीत अनेक प्रकार आढळलेले असून त्यांपैकी कित्येकांना आता जातींचा दर्जा दिला गेला आहे. तथापि त्यांच्या औषधी गुणधर्मांना व इतर उपयोगांना प्रकार व जाती बनविताना महत्त्व दिलेले नाही, असा उल्लेख आढळतो. बागेत विशेषकरून लागवडीत असलेली जाती म्यु. फ्राँडोजाचा ग्‍लॅब्राटा प्रकार (किंवा म्यु. ग्‍लॅब्राटा ही जाती) आहे.

भुतकेसाच्या खोडाची साल करडी व पाने साधी (७.५-१२.५ × ५-९ सेंमी.), समोरासमोर, पातळ, दीर्घवृत्ताकृती-आयत किंवा अंडाकृती आणि फांद्या कोनीय व केसाळ असतात. उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली लहान उपांगे) जुळी (६ × २.५ मिमी.), लांबट, टोकदार व केसाळ; फुलोरे फांद्यांच्या टोकांशी वल्लरीप्रमाणे [⟶ पुष्पबंध]; फुले लहान (२.५ × ३.५ सेंमी.) व द्विलिंगी असून पावसाळ्यात येतात; संवर्ताच्या (पाकळ्यांखालच्या पुष्पदलांच्या) पाच भागांपैकी एक पानासारखे मोठे (६-१० × ३.५-६ सेंमी.), पिवळट पांढरे व आकर्षक; पुष्पमुकुट खाली नळीसारखा पण वर तबकडीसारखा (अपछत्राकृती), बाहेरून हिरवट पिवळा व मध्यावर गर्द पिवळा; केसरदले पाच व त्यांचे तंतू फार आखूड; किंजपुटात दोन कप्पे व बीजके अनेक [⟶ फूल]; मृदुफळ लांबट गोलसर, गुळीगुळीत व सु. १-१.५ सेंमी. लांब; बिया फार बारीक व अनेक, खाचदार आणि सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रुबिएसीत (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

भुतकेसाचे लाकूड नरम, पांढरे व साधारण कठीण असून चमचे, पळ्या इ. किरकोळ वस्तू व काही कातीव कामास उपयुक्त असते; पाने व मोठे संदल खाद्य असून त्यांचे खतही बनते. पाने व फुले जखमांवर लावण्यास चांगली; सुक्या फांद्यांचा काढा मुलांना खोकल्यावर देतात. मुळे कडू, आरोग्यप्रद, शामक (आग कमी करणारी) असून श्वेतकुष्ठ (पांढरे कोड) व डोळ्यांच्या विकारांवर गुणकारी असतात; पांढरी संदले दुधातून काविळीवर देतात. फुले मूत्रल (लघवी साफ करणारी), दमा, पाळीचा ताप, जलशोथ (पाणी साठून आलेली सूज) इत्यादींवर उपयुक्त. बिया व कलमे लावून नवीन लागवड करता येते.

म्यु. फ्राँडोजा च्या ग्‍लॅब्राटा प्रकारात फांद्या, देठ व शिरा लालसर असून फुले शेंदरी व मध्यभागी कंठाजवळ पिवळी असतात. म्यु. ग्‍लॅब्रा ही पिवळ्या फुलाची हिमालयी जाती कुंपणाकरिता व औषधाकरिता लावतात; हिची पाने चटणी व कोशिंबिरीत घालतात. म्यु. एरिथ्रोफिला ही शोभेकरिता बागेत लावतात; हिला पिवळी फुले येतात, पण संदले शेंदरी असतात; ही दीपक (भूक वाढविणारी) आहे. म्यु. ल्यूटिओला ही आफ्रिकी जातीही कुंपणाकरिता लावतात; हिला हिरवी संदले व पिवळी फुले येतात. म्यु. रॉक्सबर्घाय ही नेपाळ व त्याच्या पूर्वेस आणि आसाम, उ. बंगाल ह्या प्रदेशांत कुंपणाकरिता लावतात; हिच्या पानांची भाजी करतात; पानांपासून मिळालेला रंग टोपल्या रंगविण्यास वापरतात. (चित्रपत्र ६०).

 

 

संदर्भ :1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Materials Plats, Vol. II, Delhi, 1975.

लेखक - कमला श्री. हार्डीकर / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate