অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भोरसळ

भोरसळ

भोरसळ : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळांसह फांदी.

भोरसळ

(डोंड्रू, कोलाकडू; हिं. भौलां, भ्रमरछली, भुरकड; गु. अमरछला, डोंड्रो; क. डोती, बंदरयप्णी; सं. भ्रमरछलिका, उग्रगंधा; लॅ. हायमेनोडिक्टिऑन एक्सेल्सम; कुल-रुबिएसी). हा मध्यम आकाराचा (किंवा मोठा) पानझडी वृक्ष रुक्ष व मिश्र पानझडी जंगलात किंवा नद्यांच्या काठाने भारतात बहुतेक सर्वत्र (सु. १,५००-१,७०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. खोड सरळ, गोल, सु. ३० मी. उंच व पर्णसंभार (माथा) घुमटासारखा; साल करडी भुरी, नरम आणि खवल्यांनी सुटून निघून जाते. पाने साधी, समोरासमोर, अंडाकृति-दीर्घवृत्ताकृती व मध्यम आकाराची; सर्वंच भाग थोडे फार लवदार; फुले लहान, हिरवट पांढरी, सुवासिक असून फांद्याच्या टोकांस उभ्या सरळ शाखायुक्त फुलोऱ्यावर (परिमंजरीवर) दाटीने येतात. बोंडे लांबट, लहान परंतु बिया बारीक, असंख्य व सपक्ष (पंखधारी), इतर सामान्य लक्षणे ⇨रुबिएसीमध्ये (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाला खोल व भुसभुशीत जमीन लागते; उपहिमालयाच्या पट्ट्यातील बाहेरच्या टेकड्यांच्या पायथ्याशी खडकाळ व शुष्क आणि भुसभुशीत ढिगाऱ्यांत तो सर्वत्र वाढलेला आढळतो. त्याला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. बिया उन्हाळ्यात विखुरल्या जातात व पाऊस सुरु झाल्यावर रुजून उगवतात. कृत्रिम रीत्याही याची अभिवृद्धी (लागवड) करता येते. रोपांच्या लागवडीपेक्षा जाड फाद्यांच्या तुकड्यांनी लागवड चांगली होते. तोडलेल्या झाडांच्या खुंटांपासून फूट होऊन पुढे वाढ चालू राहते; वृक्ष जलद वाढतो.

याची साल कातडी कमावण्यास वापरतात. ती स्तंभक (आकुंचन करणारी), कडू, तिखट असून रुची व भूक वाढविते; ती ज्वरनाशक आहे. सालीत थोडे विषारी, स्फटिकी, अल्कलॉइड (हायमेनोडिक्टिओनीन) व एस्क्यूलीन आणि स्कोपोलेटीन असते. इंडो-चीनमध्ये लाकडाची पूड कातडीवर पुरळ उठल्यास लावतात. रंगविण्यास व गुरांना चारा म्हणून पाने वापरतात.

लाकूड प्रथम पांढरे व नंतर भुरकट करडे दिसते. ते नरम, हलके, चमकदार व सुतारकामास सोयीचे असते. सावलीत टिकण्यास चांगले. ते शेतीची अवजारे, स्वस्त सजावटी सामान, खेळणी, खोकी, आगकाड्या, फळ्या, चित्रांच्या चौकटी, पेन्सिली, रूळ, पालखी इ. विविध वस्तू बनविण्यास उपयुक्त असते.


लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate