অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भोला

भोला

भोला : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) कळी, (३) फूल, (४) फळे.

भोला

(लॅ. क्लीनोव्हिया हॉस्पिटाकुल-स्टर्क्युलिएसी). हा सुंदर, सु. १२-१६ मी. उंच व मध्यम आकाराचा वृक्ष मूळचा मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशातील असून हा मलायाच्या द्वीपसमूहाच्या किनारी प्रदेशात सामान्यपणे आढळतो; उष्ण कटिबंधीय पूर्व आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागातही तो सापडतो. १८२० मध्ये त्याचा श्रीलंकेत प्रवेश झाला असून पश्चिम भारतात याची लागवड करतात. भारतात १७९८ मध्ये मोलकाझहून तो आणला असावा, असाही उल्लेख आढळतो.क्लीनोव्हिया ह्या वंशात ही एकच जाती आहे. ह्या वंशनामाचा संबंध खिस्तीआन क्लीनोव्ह (वनस्पतिविज्ञ व वैद्य) ह्या ⇨कार्ल लिनीअस यांनी त्यांच्या भारतातील प्रतिनिधीशी जोडून यांच्या विषयीचा आदर व्यक्त केला आहे; तसेच हॉस्पिटा या गुणनामामुळे (जातिवाचक नावामुळे) क्लीनोव्ह यांच्या व ‘भोला’ या वनस्पतीच्या आतिथ्यशील (हॉस्पिटेबल) वृत्तीचाही गौरव केला आहे. अनेक ⇨अपिवनस्पती (उदा., नेचे, शेवाळी इ.) आणि साप, सरडे, मुंग्या इत्यादींना हा वृक्ष आसरा देतो. ह्या वृक्षाच्या सौंदर्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा व बागेत याची लागवड केलेली आढळते. सरळ खोड व पसरट फांद्यांमुळे तो डेरेदार दिसतो. पाने साधी, पातळ, गुळगुळीत, अखंड, मोठी, एकाआड एक, अंडाकृति-हृदयाकृती, सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली), १०-१५ x ८-१२ सेंमी. असून ती बहुधा सर्व वर्षभर हिरवीगार असतात. किंचित सुगंधी, लहान गुलाबी फुले मोठ्या संख्येने फांद्यांच्या टोकांस आकर्षक फुलोऱ्यावर [कुंठित परिमंजरीवर; ⟶ पुष्पबंध] मे ते नोव्हेंबरमध्ये अधूनमधून व विशेषतः हिवाळ्यात येतात. पाच संदले लवकर गळून पडतात; पाच सुट्या गुलाबी पाकळ्या सारख्या नसतात; एका पाकळीचे टोक लांबट असते. सर्व केसरदलांचा एक स्तंभ बनतो व त्याच्या पेल्यासारख्या टोकावर किंजपुट आधारलेला असतो; किंजल बारीक व लांब पण किंजल्काचे पाच विभाग असतात. किंजपुटात पाच कप्पे व प्रत्येकात १-२ बीजके असतात [⟶ फूल]. फळे (बोंडे) पातळ, फुगीर आवरणाची व पंचखंडी असून तडकल्यावर पाच शकले होतात व या प्रत्येकात पिटिकायुक्त (सूक्ष्म उंचवटे असलेल्या) १-२ बिया असतात; याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨स्टर्क्युलिएसीत (मुचकुंद कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

फिलिपीन्समध्ये या वृक्षाची कोवळी पाने व फुले भाजीकरिता वापरतात. कोचीन-चायनात (व्हिएटनाम) पानांचा काढा कातडीवर येणाऱ्या पुरळ, खरूज इत्यादींवर लावतात. पानांचा रस डोळे धुण्यासाठी वापरतात. साल व पाने हायड्रोसायानिक अम्लामुळे विषारी असून ती अहीर माशाच्या शिकारीकरिता वापरतात. डोक्यातील उवा मारण्याकरिताही ते भाग उपयुक्त आहेत. या वृक्षाचे लाकूड पांढरे, मऊ आणि हलके असते. जावामध्ये चाकू व सुऱ्या यांच्या मुठींसाठी ते अधिक उपयोगात आहे. सालीच्या आतील भागापासून[⟶ परिकाष्ठ] मिळणारा धागा बळकट असून तो दोरांकरिता उपयुक्त असतो. ह्या वृक्षांची अभिवृद्धी (लागवड) बिया, दाब कलमे किंवा छाट कलमे लावून करतात; शोभेकरिता लावण्यास त्यांची विशेष ख्याती आहे.


संदर्भ 1. Blatter, E.; Millard, W. S. Some Beautiful Indian Tress, Bombay, 1954.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V. New Delhi, 1959.

3. McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.

लेखक: ज. वि. जमदाडे

शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate