অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोखा

मोखा

(म. हिं. मोका; गु. मोखो, घांट; कं. मोक्कमर, गुंटे; सं. मोक्ष, घंटापाटली; इं. वीव्हर्स बीम ट्री; लॅ. शेबेरा स्वाइटेनिऑइडिस; कुल-ओलिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. शेबेरा या प्रजातीतील एकूण २५ जातींपैकी भारतात ही एकच जाती असून ह्या वृक्षाचा प्रसार भारतात (हिमालयात कुमाऊँपासून पूर्वेस, दख्खन, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल) व ब्रह्मदेशात आहे. हा वृक्ष सु. २० मी. उंच असून त्याचा घेर सु. २ मी. असतो. खोड सु. ९ मी. पर्यंत सरळ खांबासारखे असून नंतर त्यास अनेक फांद्या येतात. खोडावरची साल करडी तपकिरी, जाड आणि खरबरीत असून तिचे खवल्यासारखे तुकडे सोलून निघतात. पाने संयुक्त, समोरासमोर व मोठी (२२–३८ सेंमी. लांब) असून त्यावरची दले (स्वतंत्र भाग) ४–८, समोरासमोर,अंडाकृती किंवा अंडाकृति-कुंतसम (भाल्यासारखी), लांबट टोकाची आणि चकचकीत असतात. फुले गुलुच्छ-वल्लरीवर [→ पुष्पबंध] एप्रिल-मेमध्ये येतात.

ती नियमित, द्विलिंगी, लहान, पिवळट तपकिरी व सुगंधी असतात. संवर्त नलिकाकृति-घंटाकृती आणि पंचभागी; पुष्पमुकुट ८–१३ मिमी. लांब; पाकळ्या ५–७, खाली जुळलेल्या व वर सुट्या; केसरदले दोन व लहान; किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा व प्रत्येक कप्प्यात ३ ते ४ बीजके असतात [→ फूल]. शुष्क फळे (बोंडे) कठीण, कुंभाकृती (काहीशी लांबट पेरूसारखी), ५–७·५ सेंमी. लांब असून तडकल्यावर त्यांची दोन शकले होतात; बिया सपक्ष (पंखयुक्त) व प्रत्येक कप्प्यात तीन ते चार असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ओलिएसी अथवा पारिजातक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड भुरकट करडे, कठीण व टिकाऊ असून त्याचा उपयोग होडगी, धोटे, हातमागाच्या दांड्या (त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे), शेतीची अवजारे इ. बनविण्यास तसेच कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी करतात. पाने दीपक (भूक वाढविणारी) असून मूत्रमार्गातील दोष व पानथरीची (प्लीहा) वृद्धी यांवर तिचा उपयोग करतात. गळवे आणि भाजण्यामुळे होणाऱ्या जखमा यांवर साल गुणकारी असते. कच्च्या फळाचा डबीसारखा उपयोग करतात. शोभेकरिता ही झाडे लावतात.

 

 

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials. Vol. IX, New Delhi, 1972.

2. Talbot, W.A. Forest Flora of the Bombay Presidency and Sind, Vol. II, Poona, 1911.

लेखक - ज. वि जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate