অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामेठा

रामेठा

(रामी; क. मुकुते, एण्णुजरिगा; इं. वूली हेडेड निडिया; लॅ. लॅसिओसायफन एरिओसेफॅलस; कुल थायमेलेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति,आवृतबीज उपविभाग] सु. १·८–३ मी. उंच व अनेक फांद्यांचे झुडूप अथवा लहान वृक्ष. याचा प्रसार भारतात दक्षिण पठारावरील उंच टेकड्या, कारवार, कोकण, सह्याद्री, केरळ, निलगिरी, पळणी व तिनेवेल्ली टेकड्या इ. ठिकाणी सु. १,२०० –२,१०० मी. उंचीपर्यंत आहे; शिवाय श्रीलंकेतही हे आढळते. ही एकच जाती भारतात असून हिच्या प्रजातीतील जगात एकूण सु. ५० जाती आहेत. खोडावरची साल करडी व किंचित गुळगुळीत असून अंतर्साल सूत्रल (धागेदार) असते. पाने साधी, समोरासमोर वा विखुरलेली, वरच्या बाजूस निळसर हिरवी व खालच्या बाजूस लवदार, लहान देठाची, लांबट, आयत, भाल्यासारखी व टोकदार, ५–८ X २·५ –३ सेंमी. असतात. फुले द्विलिंगी, बिनदेठाची, लहान पिवळी असून ती खोडावर अग्रस्थ (टोकाकडे) किंवा फांद्यांच्या शेवटी गोलसर गुच्छासारख्या फुलोऱ्यात [स्तबक; ⟶ पुष्पबंध] डिसेंबर ते मेमध्ये येतात.

छदमंडलावर रेशमी केसांचे आवरण असून त्यात पाच परिदले जुळून बनलेली नलिका सु. १ सेंमी. लांब व केसाळ असते. ही नलिका वरच्या बाजूस पसरट व सुट्या पाकळ्यांची असते; स्वतंत्र संदले नसतात. केसरदले दहा परंतु त्यांचे तंतू लुप्त असून फक्त परागकोशाची दोन वर्तुळे असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एकच बीजक असते [⟶ फूल]. फळ शुष्क, लहान, १ – १·३ सेंमी. लांब, दीर्घवृत्ताकृती, टोकदार असून परिदलांनी वेढलेले असते. फळांची साल पातळ असून त्यात एकच बी असते; बीजाचे आवरण कवचासारखे असते.खोडाच्या सालीपासून काढलेल्या वाखाचा उपयोग कागदनिर्मितीत कच्चा माल म्हणून करतात. साल व पाने विषारी आणि जहाल असून मत्स्यविषाकरिता वापरतात. सालीतील राळेमुळे कातडीवर फोड येतात. पाने सुजेवर व मुक्या मारावर लावण्यासाठी वापरतात.

 

 

संदर्भ : 1. Chopra, R. N. and others, Poisonous Plants of India, Vol. II, New Delhi,1965.

2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

लेखक - जमदाडे ज. वि. ,परांडेकर शं. आ.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate