অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रिंगणी

रिंगणी

रिंगणी : (१) फुलांफळांसह फांदी, (२) फूल, (३) अर्धे फळ.
रिंगणी : (रानरिंगणी, मोतीरिंगणी, चिचुर्डी, डोर्ली; हि. बऱ्हंता, बऱ्हत्ता, बडी कटेली, बडी कटाई; गु. उभी भोरिंगणी; क. कडुसोंदे; सं. बृहती, कंटकारिका, वन वृंतकी, हिंगुली; इं. पॉयझन बेरी, इंडियन नाइटशेड; लॅ. सोलॅनम इंडिकम, सो. व्हायोलेशियम; कुल-सोलॅनेसी). बटाटा व वांगे यांच्या सोलॅनम या प्रजातीताल हे काटेरी, सु. १·८ मी. उंच झुडूप आहे. सोलॅनम प्रजातील एकूण १,५०० जाती असून भारतात त्यापैंकी ४० आहेत. रिंगणाचा प्रसार चीन, मलाया, श्रीलंका, फिलिपीन्स इ. देशांत व भारतात सु. १,५०० मी. उंच टेकड्यांवर ( विशेषत: दक्षिणेत व कोकणात आणि आसाम व खासी टेकडयांवर) सामान्यपणे झाला आहे. खोड आणि फांद्यांवर मोठे, वाकडे व तीक्ष्ण काटे आणि तारकाकृती केस असतात. पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती (५−१५×२·५−७·५ सेंमी.), काटेरी, केसाळ व भिन्न प्रकारे खंडयुक्त असतात. ऑगस्ट ते ऑक्टोबरात या वनस्पतीला लहान, फिकट जांभळी व द्विलिंगी फुले पांनाच्या बगलेच्या आसपास अकुंठित फुलोऱ्यावर वल्लरींवर; पुष्पबंध येतात. मृदुफळ सु. ८ मिमी. व्यासाचे, गोलसर, प्रथम लालसर व नंतर गर्द पिवळे असून त्यात सु. ४ मिमी. व्यासाच्या गोलसर व खाचायुक्त अनेक बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे सोलॅनेसी कुलात (धोत्रा कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

रिंगणीचे सर्व भाग औषधी आहेत व त्यामुळेच तिला महत्त्व आहे. हिचे मुळ दशमुळांपैकी एक आहे. दशमूळ काढा हे एक आयुर्वेदीय औषध आहे. हे वायुसारी (पोटातील गुबारा काढणारे), कफोत्सारी (कफ पाडून टाकणारे) असून ताप, जंतविकार, घशाचे विकार, पोटदुखी इत्यादींवरती देतात. प्रसूती कठीण आढळल्यास व लघवीची अडचण भासल्यास मुळाचा उपयोग करतात; मुळ कुटून नाकातील जखमांवर लावतात. पांनाचा रस आल्याच्या रसाबरोबर ओकारी थांबविण्यास देतात. फळे व पाने कातडीवर साखरेबरोबर चोळून खाज कमी होते. मॅलॅगॅसीत ही वनस्पती दीपक (भूक वाढविणारी) व ज्वरनाशक म्हणून वापरतात. तसेच येथे फळाचा वापर भूक वाढविण्यास, मेंदूची × कमी करण्यास आणि गुंगी आणण्यास करतात. अर्धपक्व फळांची चटणी करतात व तशी फळे आमटीतही टाकतात. पानांची भाजी करून खातात. पाने बोकडांना चारा म्हणून घालतात. पक्व फळे सारक व पाचक परंतु ती विषारीही असतात.

काटे रिंगणी : (भुईरिंगणी; हिं. कटेरी, कतेली, कताई, रिंगणी; गु. नानी भोरिंगणी; क. चिक्कसोंद; सं. निदिग्धिका, कंटकारी, कंटकिणी; इं. यलो-बेरीड नाइटशेड; लॅ. सो. झँथोकार्पम, सो. सुरतेन्स). रिंगणीप्रमाणे ही अतिशय काटेरी, अनेक शाखायुक्त, बहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारी) गडद हिरवी ओषधी असून भारतात सर्वत्र तणासारखी ओसाड जागी आढळते. श्रीलंका, आग्नेय आफ्रिका, मलाया, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान इ. प्रदेशांतही आढळते. हिची उंची सु. १·२ मी. पर्यंत असते. तथापि हा बहुधा जमिनीवर पसरून वाढते. खोड आणि फांद्या नागमोडी असून त्यांवर सूक्ष्म तारकाकृती केस व चपटे, सरळ, पिवळे, चकचकीत व सु. १·३ सेंमी. लांब काटे असतात. पाने साधी, मध्यम आकाराची (५−१०×२·५−५·७ सेंमी.) किनारीजवळ थोडाफार विभागलेली व केसाळ असतात. पानांतील मुख्य शीर, देठ व इतर शिरा काटेरी असतात. रिंगणीप्रमाणे वल्लरी वर थोडी व सु. २ सेमी. लांब जांभळी फुले जूनमध्ये येतात. मृदुफळे १·२−२ सेंमी. व्यासाची, पिवळी किंवा पांढरट असून त्यांवर हिरवे भिन्न आकारांचे चट्टे असतात; तसेच त्यांभोवती संवर्ताचे (पाकळ्या खालील पुष्पदलांचे) सतत आवरण असते. बिया अनेक, बारीक (२·५ मिमी. व्यासाच्या) व गुळगुळीत असतात.

रिंगणीप्रमाणे हिचे मूळही दशमूळ औषधात समाविष्ट आहे व अनेक औषधी गुण व काही सामान्य शारीरिक लक्षणे रिंगणीप्रमाणेच असतात. फळांचा रस घसादुखीवर गुणकारी असून सर्व भागांचा काढा प्रमेहावर देतात. ताज्या कोवळ्या पाल्याचा रस अनंतमुळाच्या रसाबरोबर लघवी साफ होण्यासाठी देतात. मुळे मुतखड्यावरही देतात. छातीतील वेदना, ताप आणि वेदना, ताप आणि खोकला यांवर मुळांचा गुळवेलीसह देतात. ३−५ सेंमी. लांब व १·५−६ मिमी. जाड तुकडे बाजारात मिळतात; ते फिकट करडे असून नरम पण धागेदार असतात. इतर वनस्पतींच्या मुळांचे व काटे रिंगणीच्याच फांद्यांचे तुकडे यांची भेसळ करून विकले जातात. मुळांप्रमाणे बियांचा वापर दमा व खोकला यांवर करतात. पानांचा उपयोग वेदना कमी करण्यास बाहेरून लावण्यास करतात. पानांचा रस काळ्या मिरीबरोबर संधिवातावर देतात. डेंग्यू ज्वर (हाडमोड्या), तीव्र श्वासनलिकादाह आणि ज्वरयुक्त छातीचे विकार यांवर ही वनस्पती उपयुक्त असते. रिंगणी प्रमाणे हिची फळेही आमटीत घालतात आणि पानांची भाजी करून खातात; पाने बोकडांना चारतात. बिया खाद्य आहेत.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975.

३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४. ४. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्शन, मुंबई, १९१३.

 

लेखक - रा. ना. जोशी  / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate