অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रॅनेलीझ

रॅनेलीझ

रॅनेलीझ : (मोरवेल गण). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलकित (बियांत दोन दलिका−दले−असलेल्या) वर्गातील वनस्पतींचा हा एक गण असून ह्या गणातील कुलांच्या संख्येबद्दल मतभेद आहेत. ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीत यामध्ये १८ कुले तर जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांच्या पद्धतीत फक्त ८ कुले आहेत. रेंडेल यांनी १२ कुलांचा समावेश केला आहे व ती सर्व कुले एंग्लर यांच्या यादीत समाविष्ट आहेत. जे. एन्. मित्र व एंग्लर यांच्या याद्यांत ट्रोकोडेंड्रेसी व हिमॅन्टॅड्रेसी या कुलांबद्दलचाच फरक आहे. एंग्लर व डील्स यांनी ही दोन्ही कुले समाविष्ट करून एकूण १९ कुलांचा गण बनविला आहे. काही पाठ्यपुस्तकांत रॅनेलीझ (पॉलिकार्पिसी) मध्ये (१) मॅग्नोलिएलीझ व (२) रॅनेलीझ असे दोन गट केले असून एकूण १७ कुले तेथे अंतर्भूत आहेत. रॅनेलीझ गण प्रारंभिक असल्याबद्दल फारसा मतभेद नाही; तसेच त्यातील कुलांचा उगम प्रकटबीज वनस्पतींपैकी बेनेटाइटेलीझ पासून अथवा भूतपूर्व (अतिप्रारंभिक) फुलझाडांपासून (प्रोटँजिओस्पर्म्स) झाला असावा, असे बहुतेक शास्त्रज्ञ मानतात.

जे. हचिन्सन यांच्या मते या भूतपूर्व गृहीत (प्रोअँजिओस्पर्म्स) फुलझाडांपासून लिग्नोसी व हर्बेसी असे दोन गट उदयास आले असून त्यांपैकी हर्बेसी या गटात फक्त लहान आणि नरम वनस्पतींचा ओषधि व लिग्नोसी गटात काष्टयुक्त झाडांझुडपांचा क्षुप; वृक्ष समावेश करणे योग्य ठरते; आज विद्यमान असलेल्या वनस्पतींच्या कुलांची विभागणी या तत्त्वांवर केल्यास रॅनेलीझ गण संकुचित अर्थाने हर्बेसी गटात येतो; परंतु व्यापक अर्थाने, सर्वसाधारणपणे पुढील महत्त्वाची कुले रॅनेलीझमध्ये घातली आहेत मेनिस्पर्मेसी, निंफिएसी, मॅग्नोलिएसी, ॲनोनेसी, लॉरेसी, मिरिस्टिकेसी, रॅनन्क्युलेसी, बर्बेरिडेसी दारुहळद आणि सेरॅटोफायलेसी सेरॅटोफायलम ही एकच प्रजाती असलेले; जलवनस्पति इत्यादी. पोडोफायलेसी पादवेल ह्या कुलाला काहींनी रॅनेलीझमध्ये स्वतंत्र स्थान दिले आहे; तथापि रेंडेल यांनी त्याचा अंतर्भाव बर्बेरिडेसीत उपकुल म्हणून केला आहे; त्याचे स्थान रॅनन्क्युलेसी व बर्बेरिडेसी ह्या दोन्हींमध्ये आहे.

रॅनेलीझमधील सर्व वनस्पती ओषधी, क्षुप (झुडूप), वृक्ष व वेली या प्रकारांतील असून त्यांचा प्रसार सर्वत्र, तथापि उष्ण कटिबंधात बराच कमी आहे. पाने साधी किंवा बरीच खंडित असतात ती एकाआड एक, क्वचित समोरासमोर व अगदी क्वचित सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) असतात. फुले विविध प्रकारची, बहुधा द्वयावृत (साहाय्यक पुष्पदलांची दोन मंडले असलेली) किंवा एकावृत (साहाय्यक पुष्पदलांचे एकच मंडल असलेली) असतात. संवर्त व पुष्पमुकुट स्पष्ट किंवा परस्परांसारखे असतात; फुले अवकिंज ते अपिकिंज (स्त्रीकेसरमंडलाचे अनेक प्रकार असलेली), मंडलित (सर्व पुष्पदलांची मांडणी एकावर एक वर्तुळाप्रमाणे असलेली) किंवा अमंडलित (मंडले नसलेली), पूर्णपणे किंवा काही अंशी सर्पिल (पुष्पदलांची मांडणी एकाआड एक असलेली), अरसमात्र (कोणत्याही उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), क्वचित एकसमात्र (एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) असतात; पुष्पस्थली (फुलातील दलांची बैठक) लांबट, गोलसर आणि आखूड किंवा खोलगट असते.

केसरदले (पुं-केसर) बहुधा अनेक, सुटी आणि किंजदेल (स्त्रीकेसर) एक ते अनेक व बहुधा सुटी असतात फूल. फळे विविध प्रकारची आणि बियांत विपुल पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) आणि कधी कधी परिपुष्क (पुष्काभोवतीचा अन्नसाठा) असते. कवठी चाफा, कमळ, सीताफळ, जायफळ, मोरवेल, दारूहळद, पादवेल, गुळवेल, डेल्फिनियम इ. अनेक उपयुक्त वनस्पती या गणातील जातींत आणि कुलांत येतात त्यांच्यावर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. पहा : वनस्पतींचे वर्गीकरण. संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, Cambridge, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. 2. Cambridge, 1963.

4. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate