অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लव्हाळा

लव्हाळा : (१) वनस्पतीचा तळभाग, (२) फुलोरा, (३) कणिश, (४) फूल, (५) अंब्रेला प्लँट.

लव्हाळा : ( हिं. नागरमोथा; सं. नागरमुस्तक; इं. नटग्रास; लॅ. सायपेरस स्कॅरिओसस; कुल-सायपेरेसी). ह्या सु. ४०-९० सेंमी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) गवतासारख्या एकदलिकित ओषधीचा प्रसार बंगाल, उ. प्रदेश, पू. व द. भारतात आणि ऑस्ट्रेलियात ओलसर जागी (दलदलीत) आहे. खोडाच्या तळाशी असलेल्या आखूड व बारिक (०.८-५ सेंमी. × १.६ मीमी.) तिरश्चरावर (जमिनीसरपट वाढणाऱ्या व टोकास नवीन वनस्पती निर्माण करणाऱ्या फांद्यांवर) विरळ व लांबट खवले असतात. वायवी खोड सरळ, उंच, भरीव व टोकास त्रिकोणी असते. पाने साधी, विविध आकारांची,आखूड, नाजूक कधी लांब तर कधी त्यांचा अभाव असतो. फुलांचे चवऱ्यांसारखे मोठे फुलोरे बारीक असून त्यांवरचे लहान फुलोरे (कणिशे) रेखाकृती व फिकट गवती रंगाचे असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे सायपेरेसी किंवा मुस्तक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ग्रंथिक्षोड गर्द तपकिरी व सुगंधी असून त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती व औषधे यांकरिता मोथा या जातीच्या वर्णनात दिल्याप्रमाणे करतात. वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनने ०.०७५-०.०८०% उडून जाणारे सुगंधी तेल मिळते. लव्हाळ्याच्या ग्रंथिक्षोडाचा काढा परमा व उपदंशावर देतात.

अंब्रेला प्लँट

(अंब्रेला पाम; लॅ. सा. आल्टर्निफोलियस). या नावाची लव्हाळ्याच्या प्रजातीतील दुसरी जाती मूळची ऑस्ट्रेलियातील असून शोभेसाठी बागेत लावतात. शैलोद्यानात (खडकाळ जमिनीच्या बागेत), नेचागृहात पादपगृहात व (विशिष्ट प्रकारे वनस्पती-संवर्धन करणाऱ्या कोठीत) लावण्यास ही चांगली असते. ती झुबकेदार व सु. ३०-१२० सेंमी. उंच असून वायवी खोड धारदार व शूलाकृती (लांब काट्याप्रमाणे) असते. छदमंडलातील गर्द हिरवी पाने सु. २०, पसरट किंवा थोडी लोंबती, रेखाकृती, १०-२० सेंमी. लांब असतात; कणिशे विपुल असतात. व्हॅरिगेटस व ग्रॅसिलिस हे दोन शोभिवंत प्रकार आहेत. लव्हाळ्याच्या सायपेरस या प्रजातीत एकूण सु. ६०० जाती असून त्यांपैकी सु. १०० जाती भारतात आढळतात.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

2. kirtikar, K. R. ; Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol. IV, New Delhi, 1975.

लेखक -  ज. वि. जमदाडे  / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate