অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लव्हेंडर

लव्हेंडर

(इं. ट्रू लव्हेंडर, कॉमन लव्हेंडर; लॅ. लॅव्हेंड्यूला ऑफिसिनॅलिस, लॅ. अंगुस्तिफोलिया; कुल-लॅबिएटी ). फुलझाडांपैकी [→वनस्पती आवृतबीज उपविभाग] ह्या झुडुपवजा वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून दक्षिण फ्रान्स व इटलीतील उंच टेकड्यांवर ती जंगली अवस्थेत आढळते. लॅव्हेंड्यूला प्रजातीत एकूण १८ जाती असून भारतात फक्त तीनच आढळतात. लॅ. ऑफिसिनॅलिस (लॅ. व्हेरा, लॅ. स्पायका, लॅ. अंगुस्तिफोलिया) या जातीची यूरोपात व इतरत्र बरीच लागवड केली जाते. द. फ्रान्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर सु. ४५०-५४० मी. उंचीवर व त्याशिवाय इटली, द. रशिया, हंगेरी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया (टास्मानिया) आणि अमेरिका येथे लहान प्रमाणावर लागवड केली जाते. भारतात जम्मू व काश्मीर येथे यशस्वी लागवड केली असून पंजाब, हिमाचल प्रदेश, उ. प्रदेश व निलगीरी इ. थंड ठिकाणी अधिक लागवड करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. या वनस्पतीचे खोड ०.३-१.२ मी. उंच असून पाने साधी, समोरासमोर, सुगंधी व अरुंद असतात. फुले सुगंधी, लहान, द्विलिंगी व ओष्ठाकृती (दोन ओठ असलेल्या उघड्या तोंडा सारखी ) आणि निळी असून ती फाद्यांच्या टोकांस कणिशासारख्या [→पुष्पबंध ] फुलोऱ्यावर येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लॅबिएटी अथवा तुलसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड कलमे लावून करतात. कलमे लावल्यापासून तीन वर्षानंतर फुलांचा बहर येतो आणि ३-४ वर्षेपर्यंत दरवर्षी येत राहतो.

फुलांपासून सुगंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल (लव्हेंडर तेल) व अत्तर काढतात. द. फ्रान्समध्ये सर्वात अधिक (८५%) तेल काढतात. हे तेल उत्तेजक, वायुसारक आणि आल्हाददायक असून शेकडो वर्षे लोकप्रिय आहे. रोमन लोक ते स्नानगृहात वापरीत. सौंदर्यप्रसाधने, स्नानाचे साबण, सुगंधीद्रव्ये (ओ द कोलोन, लव्हेंडर जल),कित्येक पेये, मिठाई व औषधे यांमध्ये स्वाद व सुगंधाकरिता हे वापरतात. लॅ. लॅटिफोलिया (इं. स्पाइक लव्हेंडर ), लॅ. हायब्रिडा (लव्हँडिन) व लॅ. इंटरमेडिया ह्या जातीही लागवडीत आहेत. हायब्रिडा ही संकरज (मिश्र संतती ) जाती आहे. लॅ. लॅटिफोलिया द. फ्रान्स, स्पेन व इटली येथे जंगली अवस्थेत आढळते; तसेच वरील सर्वच जाती लागवडीतही आहेत. सुगंधी तेलाकरिता त्या उपयोगात आहेत. लॅ. इंटरमेडिया ही जाती सर्वोत्कृष्ट मानतात व तिचे तेल (लव्हँडिन तेल ) व्यापारात महत्त्वाचे ठरले आहे.

लॅ. बायपिनॅटा (म. घोडेघुई, गोरिया; लॅ. बर्मनाय) ही पिच्छाकृती (अंशतः किंवा अर्धवट) विभागलेल्या पानांची व सुवासिक पांढऱ्या, किंवा निळ्या फुलांची बिहार, मध्य प्रदेश, कोकण व दख्खन येथे आणि केरळपर्यंत आढळते. लॅ. ऑफिसिनॅलिस या जातींच्या पानांतून व फुलांपासून भारतात सुगंधी अर्क काढतात. भारतात खरे लव्हेंडर तेल आयात करतात. बाजारात मिळणारे लव्हेंडर-जल हे अल्कोहॉल, पाणी व लव्हेंडर तेल यांचे मिश्रण असते. सुगंधी फुले टिकाऊ व कीटकांना दूर ठेवण्यास उपयुकेत असल्याने कपडे ठेवण्याच्या पेट्या व कपाटे यांमध्ये ती ठेवण्याची पद्धत आहे.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo 1952.

लेखक - परांडेकर शं. आ.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate