অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लायकोपोडिएलीझ

लायकोपोडिएलीझ

लायकोपोडिएलीझ : (इं. क्लब मॉसेस; सं. गदाहरिता गण). वाहिनीवंत अबीजी वनस्पतींपैकी (टेरिडोफायटांपैकी) लायकोपोडिएलीझ हा एक लहान गण असून आधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार याचा अंतर्भाव लायकोप्सिडा (लेपिडोफायटा) नावाच्या उपसंघात (संघ-ट्रॅकिओफायटा) इतर चार गणांबरोबर (सिलाजिनेलेलीझ, लेपिडोडेंड्रेलीझ, आयसॉएटेलीझ व प्ल्यूरोमिएलीझ) केला जातो. काहींच्या मते (जी. एम्. स्मिथ) ह्या गणात प्रोटोलेपिडोडेंड्रेसी व लायकोपोडिएसी अशी दोनच कुले असून पहिल्यात बाराग्वानाथिया व प्रोटोलेपिडोडेंड्रॉन ह्या दोन विलुप्त प्रजातींचा समावेश होतो; ह्यांपैकी पहिली प्रजाती ऑस्ट्रेलियात मध्य सिल्युरियन (सु. ४३ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकात जीवाश्मरूपाने (शिलारूप अवशेषांच्या स्थितीत) आढळते व सर्वच लायकोप्सिडांत ती अतिप्राचीन समजतात. दुसरी प्रजाती मध्य व पूर्व डेव्होनियन कल्पात (सु. ४०-३८ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) जर्मनी, स्कॉटलंड, बोहीमिया व अमेरिकेच्या पूर्व भागात सापडते. लायकोपोडिएसी कुलात लायकोपोडियम व फायलोग्लॉसम ह्या दोन विद्यमान प्रजातींचा (आ. १) समावेश असून शिवाय उत्तर डेव्होनियन (सु. ३६•५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळापासून अलीकडच्या खडकांत विद्यमान प्रजातींशी नाते सांगणारी एक विलुप्त प्रजाती लायकोपोडाइट्स आढळते; त्यावरून ह्या कुलांचा क्रमविकास (उत्क्रांती) किती प्राचीन काळापासून (सु. ४३ कोटी वर्षांपूर्वीपासून) होत आला आहे, याची कल्पना येते.

लायकोपोडिएलीझ गणातील सर्वच जातींत बीजुकधारी (कोशिकांत दुप्पट रंगसूत्रे असलेली व बीजुके निर्माण करणारी) ही प्रमुख पिढी ओषधीय लहान व नरम शरीराची; ओषधी असून मूळ व खोड यांमध्ये द्वितीयक वृद्धी (वनस्पतीच्या प्रौढावस्थेत नंतर बनणाऱ्या कोशिकांसमूहामुळे घडून येणारी विशेष प्रकारची वाढ) नसते; पाने लहान, जिव्हिकाहीन (बगलेत तळाशी उपांग नसलेली) व सर्पिल असून बीजुके (लिंगहीन प्रजोत्पादक कोशिका) सर्व सारखी (समबीजुक) असतात. बीजुकपर्णे (बीजुके धारण करणारी पाने) एकत्र शंकूसारख्या विशिष्ट इंद्रियावर फांद्यांच्या टोकांस अथवा स्वतंत्रपणे फांद्यांवर विखुरलेली असतात. गंतुकधारी (लैंगिक अवयव धारण करणारी पिढी) अंशतः किंवा पूर्णपणे भूमिस्थित (जमिनीत) असून रेतुकाशये (नर कोशिकांच्या पिशव्या) त्यात रुतलेली आणि रेतुके (नर कोशिका) द्विकेसली (दोन सूक्ष्म केसासारखे अवयव असलेली) असतात. पुढे दिलेल्या लायकोपोडियम ह्या सामान्य व प्रमुख प्रजातीच्या माहितीवरून लायकोपोडिएलीझ गण व लायकोपोडिएसी कुल यांच्या लक्षणांची कल्पना येईल.

लायकोपोडियमाच्या सु. १८० जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत विशेषकरून आढळतात. काही समशीतोष्ण हवामानात किंवा आर्क्टिक प्रदेशात परंतु त्यातल्या त्यात अग्लयुक्त भूमीत वाढतात. काही अपिवनस्पती (दुसऱ्या झाडावर आधार घेऊन) आहेत. भारतात ३२ जाती असून लायकोपोडियम सर्नम ही जाती अधिक सामान्यपणे आढळते. ला क्लॅव्हेटम (लुशाई टेकड्यांतील नाव थिंग्रिबक; नेपाळमधील नाव-नागवेली) ही सामान्य आहे. फायलोग्लॉसम प्रजातीतील एकमेव जाती ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि टास्मानिया येथे आढळते.

आ. १. (अ) लायकोपोडियम : (१) मुळे, पाने, खोड, फांद्या व शंकू यांसह वनस्पती, (२)पान, (३)शंकू, (४)बीजुककोशासह बीजुकपर्ण, (५)बीजुक (अतिविस्तारित); (आ) फायलोग्लॉसम : (१)मुळे, पाने, खोड व शंकूसह वनस्पती, (३)पान, (३) शंकू.लायकोपोडियम (इं. स्टॅगहॉर्नमॉस) प्रजातीतील सर्वच जाती लहान, ओषधीय किंवा क्षुपीय (झुडपासारख्या) असून अपिवनस्पतींपैकी काही सरळ किंवा लोंबत्या असतात. इतरांचे खोड सरळ किवा आडवे, जमिनीवर किंवा जमिनीच्या पृष्ठाखाली असून त्यावर लहान पानांची गर्दी असते. खोड द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोन दोन फांद्या निर्मिणारे), कधी एकपद खोड असते. आडव्या खोडावर तंतूसारखी, आगंतुक व द्विशाखाक्रमी मुळे येतात. पाने दोन प्रकारची : (१) अन्नोत्पादक, हिरवी, सु. १ सेंमी.पर्यंत (काही थोड्या जातींत २-३ सेंमी.पर्यंत) लांब, सर्पिल किंवा मंडलित (प्रत्येक पेऱ्यावर अनेक) व तीक्ष्ण टोकांची. (२) बहुधा फांद्यांच्या टोकांस शंकूसारख्या इंद्रियात येणारी, पानांपेक्षा कधी लहान, फिकट व दातेरी, कधी त्यांसारखी परंतु बगलेत (आ. १) बीजुककोश (अलैंगिक प्रजोत्पादक कोशिकांची पिशवी) धारण करणारी, बीजुकपर्णे. शंकू शाखित (फांद्या असलेले) किंवा अशाखित. काही प्रारंभिक जातींत ही बीजुकपर्णे फांद्यावर विखुरलेली असतात. दोन प्रकारच्या पानांची मंडले अशा वेळी एकाआड एक येतात (उदा., ला. सिलॅगो ). मुळावर येणाऱ्या गाठी व मुकुलिका (बारीक व साध्या कळ्या) खोडावर येणाऱ्या कंदिका, गंतुकधारी व मूलक्षोड (जमिनीत वाढत जाऊन जमिनीवर फांद्या निर्मिणारे खोड) ही सर्व शाकीय प्रजोत्पादनात भाग घेतात.

संरचना

खोडाच्या टोकास असणाऱ्या अनेक विभाजी (सतत विभागणीमुळे वाढ करणाऱ्या) कोशिकांमुळे वाढ चालू राहते. परिपक्व खोडात (आ. २) पटयुक्त (अनेक उभ्या पडद्यांच्या स्वरूपात विभागलेले) किंवा तारकाकृती आद्यरंभ प्रारंभिक जलवाहक व अन्नरसवाहक घटकांचा संच; रंभ असतो. त्याभोवती नित्याप्रमाणे परिरंभ व अंतस्त्वचा ही ऊतके (समान कार्य व रचना असणारे कोशिकांचे समूह) आणि त्यांना वेढणारा मध्यत्वचेचा मोठा भाग असतो; त्यावर सर्वांत बाहेरच्या बाजूस अपित्वचा असते. मध्यत्वचेचा सर्वांत बाहेरचा भाग दृढोतक (घन आवरणाच्या कोशिकांचा) असून त्यामुळे खोडाला बळकटी येते; आतील मध्यत्वचेत पानाशी संबंध ठेवणारे लहान वाहक संच (पर्णलेश) असतात; परंतु पर्णविवरे (संबंधित रंभावरील पोकळ्या) नसतात. रंभामध्ये प्रकाष्ठ (जलवाहक भाग) व परिकाष्ठ (अन्नरसवाहक भाग) यांचे एकाआड एक पट्टे असल्यास प्रकाष्ठाच्या बाहेरच्या बाजूस आदिप्रकाष्ठ व आतील बाजूस अनुप्रकाष्ठ असते; तारकाकृती रंभातही आदिप्रकाष्ठ व अनुप्रकाष्ठ याप्रमाणेच पण एका त्रिज्येवर असून त्या त्रिज्यांमधील पोकळ्या परिकाष्ठाने व्यापलेल्या असतात (आ. २). मुळात बहिर्वर्धी आद्यरंभ किंवा खोडातल्याप्रमाणे पटयुक्त रंभ असतो. दोन्हींत अंतर्रचनेच्या बाबतींत विविधता असते. पानांच्या दोन्ही बाजूंस बारीक छिद्रे व मध्योतकात पोकळ्या असतात शारीर, वनस्पतींचे.

आ. २ लायकोपोडियमाच्या खोडाचा आडवा छेद : (१) अपित्वचा, (२) दृढोतक (बाहेरील मध्यत्वचा), (३) पर्णलेश, (४) मृदूतक (आतील त्वचा), (५) परिरंभ, (६) अंतस्त्वचा, (७) अनुप्रकाष्ठ, (८) परिकाष्ठ, (९) आदिप्रकाष्ठ; (आ) रंभातील वाहक संरचना : (१) तारकाकृती आद्यरंभ (लायकोपोडियम सेरटॅम); (२) पटयुक्त आद्यरंभ (ला. व्हाल्व्युबाइल).जीवनचक्र : प्रत्येक बीजुकपर्णाच्या बगलेत, तळाशी यूस्पोरँजिएट पद्धतीने वनस्पति, वाहिनीवंत अबीजी उपविभाग बनलेला एक मूत्रपिंडाकृती बीजुकाकोश (आ. १) असतो; त्याचे आवरण जाड असून ते आडवी चीर पडून टोकास तडकते व अनेक बीजुके बाहेर उधळली जातात. काही जातींत ही बीजुके लवकर रुजतात; परंतु काहींची मात्र ३-८ वर्षांनी रुजतात. त्यांपासून गंतुकधारी पिढीची निर्मिती व पूर्ण विकास होण्यास काही जातींत ८ महिने पुरतात; तर काही जातींना जास्तीत जास्त ६-१५ वर्षे लागतात. त्यांचे आकारमान २-८ मिमी. व भिन्न जातींत भिन्न असते. गंतुकधारी बहुधा (आ. ३) सरळ व शंकूसारखा असून त्याच्या वरच्या टोकास मृदू व लहान खंड असतात; हा भाग फक्त जमिनीवर राहून हिरवा असतो.

काही जातींत गंतुकधारी प्रधान मुळासारखा शाखित असून कवक तंतूच्या साहाय्याने संकवक; कवक त्याचे भूमिस्थित शवोपजीवन (मृत व कुजक्या पदार्थावर उपजीविका) असते. हे सर्व द्विलिंगी असून त्यावर गंतुकाशये (लैंगिक अवयव) विखुरलेली असतात; रेतुकाशय त्यात रुतलेले असते. अंदुककलशात (स्त्री-कोशिकांच्या) पिशवीत अंदुक (अंडे), ग्रीवा मार्ग-कोशिका, ग्रीवा-कोशिका व उदर-मार्ग-कोशिका इ. नित्याचे भाग असतात नेचे. रेतुकाशयांचे आवरण अनेक कोशिक असून अनेक द्विकेसली रेतुके निर्मिली जातात. पाण्याच्या सान्निध्यात अंदुकाचे फलन (नर व स्त्री कोशिका यांचा संगम) झाल्यानंतर बनलेल्या रंदुकाचा (संयुक्त कोशिकेचा) विकास होऊन गर्भ बनतो (आ. ४).

आ. ३. लायकोपोडियमाची गंतुकधारी पिढी : (अ) रेतुकाशय; (आ) पक्व अंदुक कलश : (१) अंदुक, (२) विघटित ग्रीवामार्गकोशिका व उदरमार्ग-कोशिका, (३) ग्रीवा-कोशिका; (इ) रेतुक. (अ) व (आ) हे भाग विवर्धित करून दाखविले आहेत.आलंबक, पद, प्राथमिक मूळ व खोड आणि एक दलिका (पान) हे गर्भाचे भाग असतात. हीच बीजुकधारी पिढीची सुरुवात असते. ह्याप्रमाणे जीवनचक्रात पिढ्यांचे एकांतरण गंतुकधारी व बीजुकधारी एकमेकानंतर क्रमाने बनणे; एकांतरण, पिढ्यांचे आढळते. पान प्रकाशात वाढून येईपर्यंत गंतुकधारीपासून गर्भ अन्न शोषण करीत राहतो; परंतु मूळ व पान सुस्थित व कार्यक्षम झाल्यावर गंतुकधारीचा ऱ्हास होत जातो. एकाच वेळी त्यावर अनेक गर्भ वाढू शकतात व अनेक वर्षे त्यांवर नवीन बीजुकधारी निर्माण होत असलेले आढळतात व त्यांचा विकासकालही दीर्घ असतो. काही जातींत (उदा., ला. सर्नम ) गर्भाची पूर्ण वाढ होऊन नवीन बीजुकधारी बनण्यापूर्वी पद फारसा विकसित न होता त्याच्या जवळ गाठीसारखा अवयव (आद्यदृढकंद) बनतो व त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत नाजूक अपरिपक्व गर्भ काही काळ टिकून राहतो. ह्या आद्यदृढकंदाला अनेक टोकदार अरुंद पाने असतात; पुढे आद्यदृढकंदापासून खोड व पाने तयार होऊन नवीन वनस्पती (बीजुकधारी पिढी) वाढते. ह्या आद्यदृढकंदाबद्दल अनेक मते आहेत. तो एक पुरातन अवयव असून खोडाचा पूर्वगामी असावा असे एम्. ट्रप (१८९०) यांचे मत होते; परंतु एफ्. ओ. बॉवर (१९०८) यांच्या मते, आद्यदृढकंद हे उच्च दर्जाच्या वनस्पतीच्या (बीजुकधारी पिढीच्या) जातिविकासातील विलंबित विशेषीकरण असून ते बीजुकधारी पिढीच्या आरंभीच्या व्यक्तिविकासात एका मध्यस्थाच्या रूपाने व्यक्त केले जाते.

आ. ४. लायकोपोडियम : (अ) गंतुकधारीवरच्या विकसित गर्भाचा उभा छेद : (१) आलंबक, (२) पद, (३) दलिका, (४) खोड, (५) गंतुकधारी; (आ) आद्यदृढकंद (१) व गंतुकधारी (२) यांचा उभा छेद.

 

 

उपयुक्तता

लायकोपोडियमाच्या काही जाती औषधी आहेत. ला. सर्नम याचा उपयोग उशा भरण्यास करतात. मलायात तिचा काढा बेरीबरोबर धावन म्हणून आणि खोकला व छातीतील अस्वस्थपणावर देतात. व्हिनेगरमध्ये हिची राख मिसळून कातडीवर येणाऱ्या पुरळावर चोळण्यास वापरतात. ला क्लॅव्हेटम याची बीजुके लायकोपोडियम या नावे भुकटीच्या स्वरूपात बाजारात मिळतात. रशिया, पोलंड, जपान, अमेरिका, कॅनडा, जर्मनी व स्वित्झर्लंड इ. देशांत आणि भारतात (हिमालयातून) ती जमा करतात. ती भुकटी कातडीच्या रोगांवर लावतात. छाती व मूत्रमार्गाच्या विकारांवर व संधिवात, पेटके इत्यादींवर होमिओपॅथिक औषधांत ती वापरतात. शोभेचे दारूकाम व प्रखर प्रकाश देणाऱ्या भुकट्यांत ती घालतात. लायकोपोडिएसीला इंग्रजीत ‘क्लब मॉसेस’ म्हणतात, त्यावरून त्या वनस्पतींना मराठीत गदा हरिता कुलातील वनस्पती असे नाव सुचविले आहे; तसचे लायकोपोडिएलीझला गदा हरिता गण म्हणण्यास हरकत दिसत नाही.


संदर्भ :  1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. Dittmer, H. J. Phylogeny and Form in the Plant Kingdom, London, 1964.

3. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower Groups, New York, 1964.

4. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

लेखक -   शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate