অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लार्च

(इं. टॅमॅरॅक; लॅ. लॅरिक्स). उघडी बीजे असणाऱ्या वनस्पतींतील. कॉनिफेरेलीझ वा शंकुमंत वृक्षांच्या गणातील व पायनेसी कुलातील लॅरिक्स या सामान्य प्रजातीचे इंग्रजी नाव. या प्रजातीत सु. १०-१२ जाती असून त्या उ. गोलार्धातील थंड, समशीतोष्ण ठिकाणी व उत्तर ध्रुवाच्या दक्षिणेकडील प्रदेशात पसरलेल्या आहेत. त्यापैंकी एक जाती हिमालयात आढळते. हे पानझडी वृक्ष त्रिकोनी आकाराचे व मध्यम आकारमानाचे (सु. १२-२५ मी. उंच) आहेत. यांची पाने सूच्याकृती (सुईसारखी) असून ती आखूड व लांब प्ररोहांवर (फांद्यांवर) येतात. यांची प्रजोत्पादक इंद्रिये (शंकू) लहान असून स्प्रूससारखी उभी वाढतात व त्यांमध्ये पातळ, सतत राहणारे शल्क (प्रजोत्पादक खवले) व लांब प्रकुंचित (लांबट टोके असलेली) छदे (लहान खवल्यासारखी उपांगे) एकाच वेळी पक्व होतात. नर व स्त्री-शंकू स्वतंत्र असून ते लांब प्ररोहावर येतात. ते साधारणपणे २.५ ते ३.८ सेंमी. लांब व लाल असून पुढे जांभळट लाल होतात; ते एका वर्षात पक्व होतात.

पाने गळाल्यानंतरही ते फांद्यावर राहतात. नर शंकूची संख्या अधिक असते. पाइनच्या स्त्री-शंकूशी लार्चच्या स्त्री-शंकूचे बरेच साम्य आहे. छदे व बीजधारक खवले स्वतंत्र असून पाइनमध्ये पक्वावस्थेत बीजधारक खवला बराच मोठा होऊन छदास पूर्णपणे झाकून टाकतो; पंरतु लार्चमध्ये त्यांचे भिन्नत्व व अलगपणा टिकून राहतो. प्रत्येक खवल्यावर दोन बिया असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे पाइन, सीडार आणि कॉनिफेरेलीझमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतात. रेतीयुक्त चिकण जमिनीपासून ते पाणथळ जमिनीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या जमिनींत या वृक्षाची वाढ होते. डों गर व पर्वतांच्या रांगांवर वृक्ष सीमेच्या जवळ वाढणाऱ्या वृक्षांची उंची फार कमी असते. ही झाडे पाहिल्याने जलद पण नंतर मंद गतीने वाढतात. पूर्ण वाढ होऊन प्रौढत्व येण्यास शंभराच्या आसपास तर काहींना ३००-४०० वर्षे लागतात.

हिमालयी लार्च

(लॅरिक्स ग्रिफिथियाना; लॅ. ग्रिफिथाय). हिमालयात पूर्व नेपाळपासून भूतानपर्यंत २,४००-३,६०० मी. उंचीवर हा वृक्ष आढळतो. हा सु. १८ मी. उंच असून खोडावर जाड व करडी साल असते. फांद्या पसरट व लोंबत्या असून पाने दीर्घ प्ररोहावर एकाआड एक पण आखूड प्ररोहावर झुबक्यांनी येतात. शंकू ५-१० सेंमी. लांब व बिया गोलसर व सपक्ष (पंखधारी) असतात. काही जंगले फक्त लार्चची तर काहींत त्याखेरीज इतर शंकुमंत वृक्ष असतात. त्याचे लाकूड टिकाऊ व जड असून कापण्यास सुलभ असते. पेन्सिलीकरिता ते उपयुक्त असते. पश्चिमी लार्च (लॅरिक्स ऑक्सिडेंटॅलिस) : (१)लांब प्ररोह, (२) आखूड प्ररोह, (३) पाने, (४) शंकू, (५) बीजधारी खवला.पश्चिमी लार्च (लॅरिक्स ऑक्सिडेंटॅलिस) : (१)लांब प्ररोह, (२) आखूड प्ररोह, (३) पाने, (४) शंकू, (५) बीजधारी खवला.

पश्चिमी लार्च

(लॅ. ऑक्सिडेंटलिस). हा वृक्ष ऑरेगन, वॉशिंग्टन, माँटॅना, आयडाहो येथे व लगतच्या कॅनडातील पर्वतावर आढळतो. या प्रजातीतील वृक्ष सर्वांत उंच म्हणजे सु. ४६-५४ मी. व जास्तीत जास्त सु. ६२ मी. उंच वाढतो. त्याचा घेर सु. दोन मी. होतो. त्याच्या शंकूतील छदे शल्कांमधून बाहेर डोकावतात आणि त्यांपासून उत्तम इमारती लाकूड मिळते. तो सर्वोत्तम मानतात.

यूरोपीय लार्च

(लॅ. डेसिड्युआ; लॅ. यूरोपिया). हा वृक्ष पश्चिम यूरोपातील असून त्याचे काही प्रकार बागेत लावतात. पूर्व अमेरिकेत यूरोपीय लार्चचा पुनर्वनरोपणासाठी उपयोग करतात. लार्चचे संकरज प्रकार अनेक असून त्यांपैकी डंकेल्ड लार्च (लॅ. यूरोलेपिस) हा फार महत्त्वाचा व अनेक दृष्ट्या चांगला ठरण्याचा संभव आहे. हा जलद वाढतो आणि कीटक व कवक यांना दाद देत नाही.

चीनमधील गोल्डन लार्च

(स्यूडोलॅरिक्स ॲमाबिलिस). हा वृक्ष कोठे कोठे लावलेला आढळतो; त्याचीही पानगळ होते त्या वेळी ती सोनेरी पिवळी दिसतात; शंकूतील खवले एकेक झडून जाऊन फक्त मधला दांडा झाडावर शिल्लक राहतो. एकंदरीत लार्च वृक्षांचे लाकूड भरड, दाणेदार, बळकट, कठीण व जड असून त्याचा बाहेरचा भाग पिवळा व मध्य गाभा नारंगी ते तांबूस असतो. त्यात असंख्य राळयुक्त नाली असतात. लाकूड मुख्यतः जहाजबांधणी, दूरध्वनीचे खांब, लोहमार्गातील शिळेपाट, खाणीत लागणारे आधाराचे तुकडे, इमारती इत्यादींकरिता वापरतात. यूरोपीय लार्चपासून लार्च वल्क (लॅरिसिस कॉर्टेक्स), डिंक, स्टार्च, राळ, टॅनिक अम्ल व लॅरॅक्झिन नावाचे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते. व्हेनेशियन टर्पेंटाइन हे ओलिओरेझीनही मिळते. लाकडाच्या बाहेरच्या भागापासून कॉनिफेरिन हे ग्लुकोसाइड मिळते. अंतर्साल स्तंभक (आंकुचन करणारी) व सौम्य रेचक असल्याने ती मूळव्याध, श्वासनलिकेतील आग (खवखव) व मूत्रमार्गाच्या विकारांवर देतात. काही कवक व कीटकांपासून लार्च वृक्षांना उपद्रव होतो आणि जर झाडांची गर्दी असेल, तर त्यांचे नियंत्रण कठीण असते. फ्रान्स व उ. कॅनडातील तृतीय कल्पातील (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळतील) निक्षेपात लॅरिक्स प्रजातीशी साम्य असणारे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळले आहेत; तसेच मध्य, पश्चिम व पूर्व कॅनडात प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवाश्म सापडले आहेत. लॅरिक्स व सीड्रस ह्या प्रजातीतील पानांशी साम्य दर्शविणारे पिटिओक्लॅडस नावाचे जीवाश्म जुरासिक (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत आढळले आहेत.

 

 

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. II, New York, 1960

2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate