অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिची

लिची

लिची : फळांसह फांदी
लिची : (लॅ. लिची चायनेन्सिस; नेफेलियम लिची; कुल-सॅपिंडेसी). फुलझाडांपैकी वनस्पती, आवृत्तबीज उपविभाग हा सु. १०-१२ मी. उंच, डेरेदार, सदापर्णी वृक्ष मूळचा द. चीनमधला असून भारतात अठराव्या शतकाच्या शेवटी आणला गेला. तो चीनच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात द. आफ्रिकेत आणि भारतात लागवडीत आहे. शिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ब्रह्मदेश (म्यानमार), ऑस्ट्रेलिया, इंडोचायना, थायलंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज इ. अनेक देशांतही लागवड केली जाते. पाने एकाआड एक, संयुक्त, पिच्छाकृती, दलाच्या जोड्या २-४; प्रत्येक दल लंबगोल, वर चकमकीत व गुळगुळीत आणि खाली निळसर हिरवे; फुले बहुयुतिक (काही एकलिंगी व काही द्विलिंगी), नियमित, लहान, हिरवट पांढरी किंवा पिवळट असून उन्हाळ्यात शाखायुक्त फुलोरे परिमंजऱ्या; पुष्पबंध फांद्यांच्या टोकांशी येतात; नंतर फळांचे घोस येतात. पक्व फळे गोल किंवा लंबगोल, कपाली प्रकारचे (कवची) सु. २.५ सेंमी. लांब, लाल किंवा गर्द तपकिरी असून त्यांची साल ठिसूळ, खरबरीत, पातळ व बोथट काटेरी असते. बियांभोवती पांढरे स्वच्छ मांसल आंबट-गोड व खाद्य अध्यावरण असून प्रत्येक फळात एकच गर्द तपकिरी बी असते. ताजी पक्व रसाळ फळे खातात किंवा हवाबंद डब्यात पाकात भरून ठेवतात व आयात-निर्यात करतात. ती शक्तिवर्धक असतात. इंडोचायनात बिया आतड्याचा विकारांवर देतात व हिरव्या फळांचा मुलांच्या देवीच्या आजारात उपयोग करीत. मूळ, साल व फुलांचा काढा घशाच्या विकारांवर गुळण्यांसाठी वापरतात. सालीत टॅनीन असते. मलेशियात बियांचा वापर तंत्रिका शूल (मज्‍जातंतूंच्या तीव्र झटकेयुक्त वेदना) व वृषणदाह (पुंजनन ग्रंथीचा दाह) यांवर वेदनाहारक म्हणून करतात. सॅपिडेसी.

भारतात लिचीवरील क्षेत्र सु. १४,००० हेक्टर असून ते देशातील एकूण फळझाडांच्या क्षेत्राच्या सु. ०.७५ टक्के एवढेच आहे. त्यातील सु. ९८ टक्के क्षेत्र उत्तर बिहारमधील मुझफरपूर व दरभंगा या जिल्ह्यांत आहे आणि बाकीचे क्षेत्र उत्तर प्रदेशाच्या हिमालय पर्वताच्या पायथ्यापाशी असलेल्या सहानपूर, डेहराडून,मुझफरनगर या जिल्ह्यांत आहे. निलगिरी पर्वताच्या डोंगराच्या उतारावरील समुद्रसपाटीपासून १,००० मी. उंचीपर्यंतच्या दमट प्रदेशात व पश्चिम बंगालमध्ये शेताच्या बांधावर थोड्या प्रमाणात लिचीची लागवड होते. ठाणे जिल्ह्यातील घोलवड भागात लिचीची लागवड यशस्वी होते असे दिसून आले आहे.

लिचीचे लागवडीतील प्रकार अनेक आहेत. पूर्वी, कसबा, बेदाणा, देशी, चायना, रोझ, डेहरा रोझ व शाही हे बिहारमधील महत्त्वाचे प्रकार आहेत. उत्तर प्रदेशात कलकत्तिया व मॅक्‍लिन या प्रकारांत फळांचे उत्पन्न पुष्कळ येते. रोझ सेंटेड, अर्ली लार्ज रेड आणि लेट सीडलेस हेही महत्त्वाचे प्रकार आहेत. यांपैकी शाही, चायना, पूर्वी, रोझ सेंटेड व कसबा यांची प्रामुख्याने लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. बेदाणा प्रकारचे बी फार लहान असते. व्यावसायिक दृष्ट्या कलकत्तिया हा प्रकार सगळ्यांत उत्तम आहे कारण या प्रकारात फळे दरवर्षी लागतात व फळाची साल फाटत नाही.

हे फळझाड हवामानाच्या बाबतीत काटेकोर आहे. हिवाळ्यातील कडाक्याची थंडी (हिमतुषार) आणि उन्हाळ्यातील कोरडे व उष्ण वारे त्याला मानवत नाही. आर्द्र हवा, जमिनीतील भरपूर ओलावा व खोल त्याला दुमट जमीन या बाबी उपलब्ध असतील तेथे लिचीची लागवड यशस्वी होते. जेथे पिकाला पाणी देत नाहीत तेथे सु. १५० सेंमी. पाऊस व ७० ते ८५ टक्के हवेतील आर्द्रता या फळझाडाला पोषक असतात.

खोल व चांगल्या निचऱ्याची कोणतीही जमीन चालते. बिहारमधील लिचीखालील जमीनीत चुन्याचे प्रमाण पुष्कळ असते.

या फळझाडाची अभिवद्धी पद्धतीने (एरवी पोषणाचे कार्य करणाऱ्या खोड, फांदी इ. भागांपासून) करतात कारण ती सुलभ असते. शिवाय बियांपासून वाढविलेल्या झाडांना आठ वर्षानंतर फळे धरतात. भारतात दाब कलमाची पद्धत सर्वसाधारणपणे जास्त प्रचारात आहे. गुटी कलमे यशस्वी होतात व ही पद्धत सोपी असून मुळे लवकर फूटुन येत असल्यामुळे तिचा जास्त प्रसार होत आहे; परंतु फूटून येणारी मुळे जाड असून लवकर मोडतात त्यामुळे कलमे कायम जागी लावल्यावर त्यांतील पुष्कळशी मरतात. दाब कलमाच्या पद्धतीत मुळे फूटून येण्यास वेळ लागतो; परंतु कलमे कायम जागी लावल्यावर त्यांतील जगणाऱ्या कलमांचे प्रमाण पुष्कळ असते. कलमे प्रथम रोपवाटिकेत लावतात आणि सु. एक वर्षांनंतर ती कायम जागी १० मी. अंतरावर लावतात. लावण्यापुर्वी १ मी. x १ मी. x १ मी, मापाचा खड्डा खणून त्यात शेणखत, कुजलेला पालापाचोळा व गाळाची माती घालतात. कडाक्याची थंडी व गरम वारे यांपासून संरक्षणासाठी लहान वयाची झाडे बरीच वर्षे गवतात गुंडाळून ठेवतात.

बिहारमधील लिचीखालील जमिनी जात्याच सुपीक व ओल धरुन ठेवणाऱ्या असल्यामुळे तेथे झाडांना पाणी देण्याची अथवा खत देण्याची जरूरी नसते. इतरत्र कोरड्या हवामानात (फेब्रुवारी ते जून महिन्यांत) पाणी देण्याची जरूरी असते व जमिनीतील ओल कायम ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास मुळांवरील संकवकांची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या तंतूंच्या जाळ्याची सहजीवी) वाढ नीट होत नाही. ही वाढ झाडाला पोषक असते. सुपीक नसलेल्या जमिनीत झाडांना शेणखत, कुजलेला पालापाचोळा, एरंडी अथवा कडू लिंबाची पेंड, हाडाची भुकटी व राख देतात.

या फळझाडाला रोगांचा विशेष उपद्रव होत नाही. मात्र अनेक किंडीचा उपद्रव होतो. त्यांपैकी माइट या किडीमुळे विशेषकरून कोवळी पाने वेकडीवाकडी होतात. यांवर उपाय म्हणून झाडांना डांबर लावतात अथवा खनिज तेलाच्या द्रावणात कपडा भिजवून तो झाडाभोवती गुंडाळतात. त्यामुळे कीड झाडावर चढत नाही. शिवाय ०.५ टक्के डी.डी.टी अथवा ०.५ टक्के पॅराथिऑन पाण्यात मिसळून फवारतात. पिकणाऱ्या फळांचे पक्षी फार नुकसान करतात आणि या फळझाडाच्या बाबतीत ही मोठी समस्या आहे. झाडावर जाळी घातल्यास हे नुकसान वाचते; परंतु ही खर्चाची बाब आहे.

कलमी झाडांना ती कायम जागी लावल्यापासून ३ ते ६ वर्षांनंतर फळे धरतात. झाडाची वाढ हळू होत असल्यामुळे पुढील २० वर्षांपर्यंत फळांचे उत्पादन हलके हलके वाढत जाते. फळे पिकल्यावर फक्त ३-५ दिवस टिकतात. मोरचुदाच्या ०.५ टक्के द्रावणात बुडवून पॉलिथिनाच्या पिशव्यांत ठेवल्यास फळे जास्त टिकतात; स्थानिक बाजारात विक्रीसाठी पूर्णपणे पिकलेली फळे काढतात; परंतु दूरच्या बाजारात पाठविण्यासाठी त्यांना गुलाबी रंग प्राप्त झाल्यावर ती झाडांवरून टोकाकडील फांदीसह काढतात. - १० ते ७० से. तापमानात शीतगृहात ही फळे ३ महिन्यांपर्यंत ठेवता येतात.

झाडांना फेब्रुवारी महिन्यात फुले येतात. फळांची काढणी उत्तर भारतात मेच्या मध्यापासून जूनच्या अखेरपर्यंत आणि निलगिरी टेकड्यांत एप्रिल ते मेपर्यंत करतात.

दर वर्षी दर झाडाला सर्वसाधारणपणे ८० ते १५० किग्रॅ. फळे धरतात. लहान वयाच्या झाडाला प्रतिवर्षी ५०० आणि पूर्ण वाढलेल्या झाडांना प्रत्येकी ४,००० ते ५,००० फळे धरतात.

भारतात लिचीची फळे खाण्यात येतात. यासाठी दूरच्या बाजारात फळे पाठविण्यामध्ये विशेष काळजी घेतात. चीनमध्ये फळे वाळवून खाण्याची पद्धत आहे. त्यांना लिची-नट असे नाव आहे. ती युरोप व अमेरिकेत निर्यात केली जातात. जगातील सर्व चिनी लोक ती आवडीने खातात.

फळात १२-१५ % शर्करा, ०.५-१% अम्‍ल आणि १-१.५ % प्रथिने असतात. यांशिवाय त्यात फॉस्फरस, लोह व क जीवनसत्त्व असतात.

लेखक -   ज. वि. जमदाडे/  शं. आ. परांडेकर /  वा. पु. गोखले  /  रा. मो. चौधरी

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. ll, New York, 1960.

2. C. S. l. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.Vl, New Delhi. 1961.

3. Sham Singh; Krishnamurti, S.; Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

4. Singh, R. Fruits, New Delhi, 1969.

लिची : पक्व फळांचे घोस

 

 

 

 

 

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate