অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनस्पतींतील ऊतके

वनस्पतींतील ऊतके

एका कोशिकेच्या (पेशीच्या) बनलेल्या सूक्ष्म वनस्पती वगळल्यास, उरलेल्या बहुसंख्य वनस्पती अनेककोशिक असून कमीजास्त प्रमाणात त्यांची रचना जटिल (गुंतागुंतीची) असते. काही शैवले, कवक (बुरशीसारखी हरितद्रव्यरहित वनस्पती) व शेवाळी यांच्या शरीरांत कोशिकांचे प्रभेदन (विशेष कार्य करण्याकरिता रूपांतर होणे) कमी असते. काही कोशिका शाकीय (वाढ व पोषण या कार्याशी संबंधित असलेल्या) व काही थोड्या प्रजोत्पादक असा फरक आढळतो. अशा कोशिकांचे काही समूह असतात. ज्यावेळी समूहातील कोशिकांचा उगम, संरचना व कार्य सारखे असते त्यावेळी त्याला ऊतक म्हणतात. शाकीय ऊतक व प्रजोत्पादक ऊतक असे प्रकार वनस्पति-शरीरात आढळतात. काही शेवाळी व त्यापेक्षा उच्च दर्जाच्या सर्व दर्जाच्या सर्व अबीजी व बीजी वनस्पतीचे शरीर अधिक जटिल असून त्यांमध्ये भिन्न उगम, संरचना व कार्ये असलेले कोशिकासमूह (ऊतके) आढळतात. यामुळे श्रमविभाग साधला जाऊन कार्यक्षमता वाढलेली आढळते. एका विशिष्ट ऊतकात कोशिकांचे स्वरूप व कार्य भिन्न असू शकले, तरी कोशिकांची संलग्नता असून वनस्पतींच्या संरचनेचा त्या अविभाज्य भाग असणे आवश्यक असते. कवकांमध्ये अनेक स्वतंत्र तंतू एकत्र विणले जाऊन ऊतकाप्रमाणे कार्ये करतात, त्यांना आभासी ऊतक म्हणतात.

खऱ्या ऊतकांचे वर्गीकरण भिन्न आधारावर केले जाते. वनस्पतींच्या शरीरांतील स्थान, घटक कोशिकांची संरचना, कार्य, उगमाचे स्थान व पद्धती किंवा विकासावस्था या गोष्टींपैकी एकावर, मुख्यतः किंवा बव्हंशी, भर देऊन त्यांचे भिन्न प्रकार ओळखले जातात. फक्त कार्याच्या दृष्टीने विचार केल्यास कोशिकांतील संलग्नतेची आवश्यकता नसते. उदा., प्रकाष्ठ या नावाच्या ऊतकात कार्याच्या आधारावर त्याच्याशी संलग्न असलेल्या संचयी कोशिका व आधारभूत कोशिका (प्रकाष्ठ मुख्यतः जलीय विद्राव वाहून नेण्याचे कार्य करीत असल्याने) यांचा समावेश होत नाही; प्रकाष्ठ या संज्ञेत फक्त वाहक भागच येईल. तसेच अपित्वचेपैकी (पाने व कोवळी खोडे यांच्या पृष्ठभागांवरील आवरणासारख्या थरांपैकी) त्वग्रंधे (बारीक छिद्रे) वगळून बहुतेक इतर ऊतक्रांचा समावेश परित्वचेबरोबर (वनस्पतींच्या काही काळ टिकणाऱ्या भागांवर असणाऱ्या संरक्षक थराबरोबर) त्वचा-ऊतक तंत्रात करतात. शरीरक्रियावैज्ञानिकांनी शारीरामध्ये (शरीराच्या अंतर्गत भागामध्ये) एकएकट्या पडलेल्या किंवा विखुरलेल्या कोशिका किंवा त्यांचे समूह यांचा अंतर्भाव एका ऊतकात केलेला आढळतो.

कोशिका किंवा ऊतक यांच्या विकासाची अवस्था ध्यानी घेऊन सतत विभाजन करीत असणाऱ्या घटकांना ‘विभज्या’ व विभाजनाची क्रिया थांबून (निदान तात्पुरती बंद होऊन) प्रमेदन पूर्ण झालेल्या घटकांना ‘स्थायी’ अशा संज्ञा वापरून फरक केला जातो. स्थायी अवस्थेमधून पुन्हा विभज्यावस्थेत असे कधीकधी परिवर्तन होते.

ऊतक साधे किंवा जटिल असते. फक्त एकाच प्रकारच्या कोशिका असलेली ऊतके, ती साधी व एकापेक्षा अधिक प्रकारच्या कोशिका एकत्रित असणारी ऊतके, ती जटिल असा फरक केला जातो. त्यामुळे प्रत्येक ऊतकाचे तपशीलवार वर्णन शक्य होते.  मृदूतक, स्थूलकोनोतक  व  दृढोतक  हे साधे प्रकार असून कोशिकांनाही ही विशेषणे लावतात. यांपैकी मृदूतक व दृढोतक ह्या ऊतकांची लक्षणे असलेल्या कोशिका जटील ऊतकात कधीकधी विखुरलेल्या आढळतात. प्रकाष्ठ व परिकाष्ठ (मुख्यत्वे अन्नपदार्थ वाहून नेण्याचे कार्य करणारे ऊतक) ही प्रमुख जटिल ऊतके होत.

उच्च वनस्पतींच्या शरीरात साधारणतः समान कार्य करणारी अनेक ऊतके, मग ती संलग्न असोत किंवा नसोत तसेच त्यांचे स्थानही कोठेही असो, एकत्र गणल्या जाऊन त्यांचे ‘तंत्र’ (संस्था किंवा व्यूह) मानले जाते; अर्थात वर निर्देशल्याप्रमाणे हा शरीरक्रियावैज्ञानिक दृष्टिकोन असून त्याप्रमाणे आधार ऊतक तंत्र, संचयी ऊतक तंत्र व शोषक ऊतक तंत्र असे प्रकार केले जातात.

शरीररचनेच्या दृष्टीने काही ऊतकांचा ऊतक तंत्रात अंतर्भाव करणे अनेकदा सोयीचे होते. यामध्ये वनस्पतीच्या सर्व शरीरात किंवा शरीराच्या मोठ्या भागात सलगपणे पसरलेल्या एकाच प्रकारच्या कोशिका किंवा ऊतके अथवा दोन किंवा अधिक प्रकारच्या ऊतकांचा समावेश होतो. संरचनेच्या दृष्टीने भिन्न अशी फार थोडी ऊतक तंत्रे ओळखली जातात. पूर्वी फक्त तीनच मानली जात : अपित्वचा तंत्र, तल्प (मौलिक) तंत्र (कोवळ्या खोडातील किंवा मुळातील वाहक तंतूंच्या जुडग्यांच्या बाहेर व मध्ये असणाऱ्या मृदूतकांचे तंत्र) आणि वाहक तंत्र. आज अशी विभागणी सर्वदा उपयोगात आणली जात नाही. यातील अपित्वचा तंत्रात अभित्वचेचा (अपित्वचेच्या लगेच खाली असणाऱ्या व तिला बळकटी आणण्याऱ्या मजबूत कोशिकांच्या थराचा) व कधी परित्वचेचा समावेश केला जातो. मौलिक तंत्रात मध्यत्वाचा [कोवळ्या खोडांत व मुळांत आढळणारा मृदूतकीय कोशिकांचा दंडगोल,  मध्यत्वचा], परिरंभ [खोडाच्या व मुळाच्या मध्यभागातील वाहक ऊतकाच्या परिघावर असणारा व वाहक नसणाऱ्या कोशिकांच्या बनलेला थर,  परिरंभ] व भेंड [भोवताली वाहक ऊतक असलेला व मुख्यत्वे मृदूतकीय कोशिकांचा दंडगोल, भेंड] यांचा अंतर्भाव केला जातो. थोडक्यात, या तंत्राची व्याप्ती फार विस्तृत किंवा अमर्याद तरी होते किंवा शरीररचनेशी विसंगत होते. तथापि, स्थलाकृतिक (भौतिक वा स्वाभाविक लक्षणांच्या) अर्थाने तिला महत्त्व असून विभज्येतील ऊतकांची उपपत्ती लावण्यास ती विशेष उपयुक्त ठरते. कोवळ्या अवयवातील अपित्वचा तंत्र म्हणजे स्वचाजनक (किंवा आद्यत्वचा); वाहक तंत्रात ‘पूर्वोतककर’ (खोडाच्या वा मुळाच्या टोकाशी असणाऱ्या व ज्यापासून प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ तयार होते अशा विभाजन होऊ शकणाऱ्या अप्रभेदित कोशिकांचा समूह) व पहिल्याने बनलेले प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ येतात. मौलिक तंत्रात तल्पविभज्या येते. [विभज्या]. पूर्ण वाढ झालेल्या प्राथमिक शरीरात या तीन तंत्रांपासून अनुक्रमे अपित्वचा, वाहक ऊतके आणि मध्यत्वचा, परिरंभ, भेंड व मध्योतक (पानाच्या खालील व वरील अपित्वचेच्या मध्ये असणारे व मुख्यत्वे अन्न निर्मितीचे कार्य करणारे मृदूतक) बनतात. अपित्वचा व वाहक तंत्र ही तंत्रे वनस्पति-शरीराचे अत्यंत महत्त्वाचे व ढोबळ संरचनाविशेष आहेत, कारण वनस्पतिशरीरात त्यांच्या संरचनेचे सातत्य व एकसारखेपणा आणि कार्यातला कायमपणा सर्वत्र आढळतो. अपित्वचा तंत्र व वाहक तंत्र या संज्ञा महत्त्वाच्या व सोयीच्या असून तल्पोतक तंत्रामध्ये उरलेले विविध भाग येतात.

शरीरक्रियावैज्ञानिकदृष्ट्या स्वतंत्र रीतीने विचारात घेतले जाणारे असे स्रावक ऊतक असून त्यामध्ये गोंद, राळ, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, मधुरस वगैरे स्रावणाऱ्या कोशिकांचा समावेश केला जातो. स्रावक कोशिका व स्रावक ऊतके यांचा उगम सारखा नसून शिवाय त्यात संरचनेचा सलगपणाही नसतो. ह्या कोशिका भेंड़, प्रकाष्ठ, परिकाष्ठ, मध्यत्वचा इ. ऊतकांचा अनेकदा अलगदपणे विखुरलेल्या असतात. तसेच त्यांचे ऊतकही आढळते अथवा त्यापासून प्रपिंड (ग्रंथी) या नावाचे एक निश्चित संरचना असलेले उपांग बनलेले आढळते. स्रावक कोशिकांत दोन प्रकार आढळतात. ज्यांमधून बाहेर स्रवण होते त्यांना उत्सर्जक कोशिका म्हणतात (उदा., प्रपिंडीय केस, उत्सर्जक पृष्ठखंड, मधुरस प्रपिंड, राळ-नलिकेतील किंवा तैल-नलिकेतील अपित्वचा इ.) व ज्या कोशिकांत स्रावलेला पदार्थ साठून राहतो तिला स्रावक कोशिका म्हणतात. यामध्ये परिकलापेक्षा (केंद्रकाव्यतिरिक्त कोशिकेतील जीवद्रव्यापेक्षा) विशिष्ट संचित पदार्थ अधिक ठळकपणे दिसतो. शिवाय ही कोशिका अधिक मोठी असते (उदा., आले, नेचे इ.) उत्सर्जक कोशिकेतील परिकल भरपूर व कणीदार असून प्रकल (केंद्रक) ठळकपणे दिसतो.

ओलसर हवेत वाढणाऱ्या कित्येक वनस्पतींची पाने किंवा तत्सम अवयव ह्यांतून पाण्याचे थेंब बाहेर पडताना आढळतात [निस्यंदन]. विशिष्ट परिस्थितीतच (जमिनीत भरपूर पाणी व बाष्पोच्छ्‌वास कमी असताना) ही क्रिया घडून येते. ज्या विशिष्ट संरचनेतर्फे हा जलोत्सर्ग होतो ती त्वग्रंध्राप्रमाणेच असून तिचे कार्य फक्त ते अधिकतर पाणी बाहेर सोडण्यास मार्ग देणे इतकेच असते; तिला जल-त्वग्रंध म्हणतात. (उदा., गवते, अंज्रनवेल व गार्डन नॅस्टर्शियम).

संदर्भ : 1. Eames, A.J. MacDaniels, L. H. Introduction to Plant Anatomy, New York,            1953.

2. Esau, C. Plant Anatomy, New York, 1960.

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate