অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकावळी

शेतकावळी

शेतकावळी : (हिं. करांटा; लॅ. किप्टोलेपिस बुखनानी ; कुल-ॲस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उप-विभाग ही चीकयुक्त मोठी वेल भारतात व श्रीलंकेत सर्वत्र आढळते. हिची पाने ७ -१२ सेंमी. लांब, ४ -६ सेंमी. रूंद असून ती साधी, समोरासमोर, तळाशी गोलाकार, शेंड्याला टोकदार, जाडसर, अखंड व भाल्यासारखी असतात. ती वरून हिरवी व खालून पांढरट असतात व त्यांच्या दोन्ही कडांजवळून एक समांतर शीर गेलेली असते.

फुले द्विलिंगी, पिवळसर हिरवी असून फुलोरे कुंठित परिमंजिरीप्रमाणे असतात. पुष्पमुकुट घंटाकृती व लहान असतो. परागकोश त्रिकोणी असून त्यांना जोडणाराभाग परागकोशाच्या बाहेर मांसल व टोकदार उपांगाप्रमाणे वाढलेला दिसतो. पेटीसारखी जोडफळे ५ -१० सेंमी. लांब, सरळ, कठीण व पसरट असून मध्यापासून कमाने निमुळती होतात. ती एका शिवणीवर तडकतात. बिया अनेक व त्यांवरील केसांचा झुपका २.५ सेंमी.पेक्षा जास्त लांब असतो. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ॲस्क्लेपीएडेसी अथवा रूई कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

 

लेखक - कमला श्री. हर्डीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate