অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शोला

शोला

शोला : (हिं. सोला; क. बेंडू; इं. सोला पिथ प्लँट; लॅ. एशिनोमेन ॲस्पेरा; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग पाणथळ जमिनीत वाढणारे हे लहान व शेंगा येणारे बहुवर्षायू झुडूप भारत, म्यानमार, मलाया व पाकिस्तान येथे सर्वत्र आढळते. तळ्यांच्या काठांवर ते सामान्यपणे वाढते. त्याची उंची २-३ मी. व खोडाचा व्यास ६ सेंमी. असतो. खोडात मऊ, हलका, पांढरा भेंड असतो. त्याला फार फांद्या येत नाहीत. पाने बिनदेठाची व लांबट, संयुक्त, पिसासारखी व तळाशी लहान उपांगे असलेली असतात. पानांच्या बगलेत फुलांच्या गुलुच्छासारख्या मंजऱ्या ऑगस्ट-डिसेंबरमध्ये येतात. शेंगा कठीण, सरळ, बारीक व ५-८ सेंमी. लांब असतात. इतर शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

शोलाच्या खोडातील हलक्या व विरळ लाकडाचा उपयोग कोळी लोक आपल्या जाळ्यांसाठी करतात. पोहण्याचे पट्टे, बाटलीची बुचे, खेळणी, कृत्रिम फुले इत्यादींसाठी भेंड उपयुक्त असते. सर्वांत उत्तम प्रतीचे भेंड कोलकात्याच्या बाजारात मिळते.

पश्चिम बंगाल, आसाम व दक्षिण भारतात आढळणाऱ्या ए. इंडिका या जातीच्या वनस्पतीपासूनही भेंड निघते; पण ते कठीण असल्यामुळे टोप्यांसाठी (विशिष्ट प्रकारच्या हलक्या हॅटसाठी) सोयीस्कर नसते, तरीही बाहेरून शोलाच्या भेंडाचे थर लावून टोप्या तयार करतात.

 

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate