অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सँटॅलेसी

सँटॅलेसी

(चंदनकुल). फुलझाडांचे [⟶ वनस्पति, आवृत-बीज उपविभाग] एक कुल; यात सु. ३० प्रजाती व ४०० जाती (आल्फ्रे ड बार्टन रेंडेल यांच्या मते २६ प्रजाती) आहेत. यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांतआहे. बहुतेक सर्व वनस्पती सदापर्णी लहान वृक्ष, ⇨ क्षुप (झुडपे) व ⇨ ओषधी असून इतर वनस्पतींवर त्या खनिजे व पाणी यांकरिता अंशतः अवलंबून असतात [अर्धजीवोपजीवी; ⟶ जीवोपजीवन]. ⇨ लोरँथेसी कुल (बंदाक कुल) ह्या अर्धजीवोपजीवी कुलाशी सँटॅलेसीचे जवळचे नाते असून दोन्हींचा अंतर्भाव इतर तशाच तीन कुलांबरोबर सँटॅलेलीझ ह्या गणात (चंदन गणात) व सँटॅलिनी या उपगणात ⇨ आडोल्फ (हाइन्रिकगुस्टाफ) एंग्लर आणि ए. बी. रेंडेल यांच्या मतानुसार केला जातो. बॅलॅनोफोरेसी, ऑपिलेसी आणि ओलॅकेसी ही ती तीन कुले होत. चार्ल्स एडविन बेसी यांनी लोरँथेसी व सँटॅलेसी यांचा अंतर्भाव सेलॅस्ट्रेलीझमध्ये [ ज्योतिष्मती गणात; ⟶ सेलॅस्ट्रेसी (ज्योतिष्मती कुल)] करून त्यांचा उगम व विकास ⇨रोझेलीझ गणातील (गुलाबगणातील) पूर्वजांपासून झाला असावा, असे मानले आहे.

रेंडेल यांनी सँटॅलेलीझ व प्रोटिएलीझ यांतील निकटचे नाते ओळखून त्यांचा उगम रोझेलीझ पासून झाला असावा असे मानले आहे. ⇨जॉन हचिन्सन व बेसी यांचे याबाबतीत एकमत आहे; त्यांनी सँटॅलेलीझ व सेलॅस्ट्रेलीझ यांचे निकटवर्ती स्थान मान्य केले आहे. सँटॅलेसी ह्या कुलातील वनस्पतींची पाने साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, अखंड किनारीची, चिवट व काही जातींत खवल्यांसारखी असतात. फुलोरे विविध, पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांना, तर कधी एकाकी व कक्षास्थ (पानांच्या बगलेत) असतात.फुले लहान, द्विलिंगी किंवा एकलिंगी, नियमित, अपिकिंज किंवा अवकिंज, सामान्यतः मधुरस-प्रपिंडयुक्त; परिदले ३—६, साधी, खाली जुळून नलिकेसारखी व धारास्पर्शी; केसरदले तितकीच, त्यांच्यासमोर व त्यांच्याशी अंशतः जुळलेली व मागील बाजूस केसाळ; किंजदले ३—५ क्वचित २; किंजपुट अर्धवट किंवा पूर्णतः अधः स्थ असते [⟶ फूल]. एकाच कप्प्यात प्रथम अनेक व शेवटी एकच पूर्ण, परंतु नग्न बीजक; फळ कपाली (कवचयुक्त) किंवा अश्मगर्भी (आठळीयुक्त); बीजावरणाचा अभाव असून पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) भरपूर असते. ह्या कुलातील ⇨चंदन हा महत्त्वाचा वृक्ष असून पायरुलॅरिया इडुलिस हा आसामात व हिमालयात आढळणारा पानझडी वृक्ष खाद्यफळे, बियांचे तेल व लाकूड ह्या दृष्टींनी उपयुक्त आहे. पोपळी (लोटल; ऑसिरिस वाइटियाना) या सदापर्णी झुडपाच्या फांद्यांपासून वापरावयाच्या काठ्या बनवितात व त्याच्या सुगंधी लाकडाची चंदनात भेसळ करतात.

 

 

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Cambridge, 1963.

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate