অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सताप

सताप : (हिं. सिताब, सतरी; गु. सताब; क. सदापु , नागदाळ्ळी सोप्पू ; सं. सदापहा, विषापहा; इं. कॉमन रू, गार्डन रू; लॅ. रूटा गॅव्हिओलेन्स, रू. चालेपेन्सिस ; कुल - रूटेसी). सुवासिक पानांची ही ओषधी (लहान व नरम वनस्पती) फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग] असून तिच्या रूटा या प्रजातीत एकूण सु. ६० जाती आढळतात व भारतात त्यांपैकी फक्त दोनच आहेत. भूमध्यसामुद्रिक प्रदेश व समशीतोष्ण आशिया ही त्यांची (सर्व जातींची) मूलस्थाने आहेत. भारतातील जाती बागेत लावलेल्या आढळतात. रू. चालेपेन्सिस ही जाती द. यूरोप आणि उ. आफ्रिका येथील असल्याचे मानतात. भारतात सर्वसाधारण बागेत आढळणारी व वर उल्लेखिलेल्या इंग्रजी नावांनी ओळखली जाणारी जाती ती हीच आहे, रू. गॅव्हिओलेन्स नव्हे, असे मानतात, तथापि हरमेनगिल्ड सांतापाव यांच्या मते ती रू. गॅव्हिओलेन्स असावी. दोनही जातींत बरेच साम्य असल्याने त्यांची नावे व फारकत वादगस्त झाली आहेत. खाली दोन्हींची वर्णने स्वतंत्रपणे दिली आहेत. मराठी व इतर नावे भिन्न नाहीत.

रूटा चालेपेन्सिस

(रू. गॅव्हिओलेन्स प्रकार अंगुस्तिफोलिया). या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधीची उंची सु. २५ -७५ सेंमी. असून तिच्या विभागलेल्या संयुक्त पानांचे देठ फार लहान असतात व लहानात लहान विभाग (दलके) व्यस्त अंडाकृती- भालाकृती ते अरूंद व आयत असतात. फुलोरे विरळ, फुले नियमित, द्विलिंगी व पिवळी, पाकळ्या सुटया व त्यावर सूक्ष्म केस असतात. शुष्क फळ (बोंड) गुळगुळीत व त्याची शकले टोकदार असतात; काळ्या, लहान, सपुष्क बिया अनेक व कोनयुक्त असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे  रूटेसी कुलात (अथवा सताप कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सताप (रू. गॅव्हिओलेन्स) : (१) पाने व फुलोरे यांसह फांदी,(२) फूल, (३) बोंड, (४) बी.या वनस्पतीची लागवड सुगंधी पानांकरिता केली जाते. रसभाजी, कोशिंबीर व रस्से यांत ती पाने घालतात. उंच प्रदेशांत ती झाडे चांगली वाढतात. तथापि मध्यम उंच प्रदेशांतही लागवड करतात. लागवडीत चांगली वाढ होण्यास चुनखडी आणि चिकणमाती असलेली व चांगल्या निचृयाची जमीन आवश्यक असते. पावसाळ्यात ती फार जपावी लागते, थंडीत वाढ उत्तम होते. अभिवृद्धी बी, छाट कलमे, दाब कलमे इत्यादींनी करतात, ऑक्टोबरात प्रथम रोपे कुंडयात तयार करून नंतर ती बाहेर वाफ्यात स्वतंत्रपणे लावतात, पुढे जून झाडांपासून पुन्हा छाट कलमांनी अधिक लागवड करता येते.

औषधी उपयोग

ही वनस्पती तंत्रिका तंत्रास उत्तेजित करते, ती आकडीरोधक व स्वेद (घाम आणणारी) असते. ताप व आचके यांवर तिचा काढा देतात किंवा पाल्याचा रस बाहेरून अंगास लावतात, लहान मुलांच्या श्र्लेष्मल विकारावर धुरी देण्यास वापरतात. वनस्पतीत उडून जाणारे तेल असते, तसेच रूटिन (अल्कलॉइड) व कौमारीन सारखा सुगंधी पदार्थ असतो, तेलाचा अधिक प्रमाणात गर्भपातक परिणाम होतो. तेलात मुख्यत: मिथिल हेप्टाइल कीटोन असते. इतर उपयोग खाली रू. गॅव्हिओलेन्स मध्ये नमूद केल्याप्रमाणे असतात.

रूटा गॅव्हिओलेन्स

ह्या जातीलाही ‘ गार्डन रू ’ हे इंग्रजी नाव आहे. ही भूमध्यसामुद्रिक जाती असून भारतातील उद्यानांत लावलेली आढळते. पाने व्दि-त्रिगुण पिच्छाकृती (दोनदा किंवा तीनदा विभाग- लेली) असून दलके आयत ते चमसाकृती असून त्यांवर मेणाचा सूक्ष्म थर असतो व त्यांना उग वास (दर्प) येतो. फुलोरे गुलुच्छ पुष्पबंध प्रकारचे व त्यांवर लहान पिवळट फुले येतात. पाकळ्यांच्या कडा दातेरी किंवा काहीशा नागमोडी (तरंगित) असतात. बोंडांची शकले टोकास गोलाकार असतात आणि बिया कोनयुक्त असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे रूटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. हिची लागवड सर्वसाधारणपणे वर वर्णिल्याप्रमाणे असते.

रूतेल

हे फिकट पिवळे किंवा हिरवट असून ते ताज्या वनस्पतीतून वाफेचा उपयोग करून उर्ध्वपातनाने काढतात. त्याचे प्रमाण ०.०६% असते. बियांतील तेलाचे प्रमाण इतर भागांपेक्षा जास्त असते. तेलाला कडू, तिखट चव व उग वास असतो. जुने तेल तपकिरी दिसते. तेलात मिथिल नॉनील कीटोन (८० -९०%) असते. मिथिल हेप्टाइल कीटोन फार थोडे असते. तेलात कधी कधी टर्पेंटाइन व पेट्रोलियम यांची भेसळ करतात. तेल आकडीरोधक, कृमिनाशक, अपस्माररोधक, कातडी लाल करणारे (चर्मरक्तकर), आर्तवजनक (विटाळ सुरू करणारे) असून विशेषत: पशुवैदयकात महत्त्वाचे असते; अधिक प्रमाणात त्याचे परिणाम अतिमादकाप्रमाणे असतात. ते वांतिकारक असून त्यामुळे शक्तिपात, मंद नाडी व हातपाय थंड होतात, शिवाय जीभ सुजून लाळ गळणे व जठरांत्रदाह (पोट व आतडे यांत आग होणे) ही लक्षणे दिसतात. स्वादाकरिता आणि सुगंधी द्रव्ये व साबणे यांत घालण्याची अत्तरे यांकरिता ‘ रू तेल ’ उपयोगात आहे. कृत्रिम सुगंधी द्रव्ये बनविण्यास मिथिल नॉनील कीटोनयुक्त रू तेले वापरतात.

उपयोग

ही वनस्पती मूत्रल (लघवी साफ करणारी), आर्तवजनक, शोथशामक (आग शांत करणारी), उत्तेजक आणि आकडीरोधक असून उन्माद व अनार्तव (विटाळ बंद होणे) यांवर उपयुक्त असते. दातदुखी व कानदुखी यांवर तिचा रस गुणकारी असतो. दातदुखीत पाला चुरगळून दाताच्या पोकळीत भरतात व कानदुखीत तो पाला कानात ठेवतात. संधिवातावर पाला वाटून बाहेरून लावतात. अल्कोहॉलामध्ये काढलेला वनस्पतीचा रस काही सूक्ष्मजंतुविरोधक (मायकोकॉकस पायोजेनिस व एश्चेरिक्रिया कोलाय) असतो. पानांचा उपयोग मसाल्यात घालण्यास व शोभेकरिता बश्यांमध्ये ठेवण्यास करतात. त्याचे लोणचे करून स्वादाकरिता अन्नात व पेयात घालतात. द. आफ्रिकेत तापात पानांचा काढा देतात. पानांचा फांट [⟶ औषधिकल्प] संमोहक असून पानांपासून कातडीची आग होते. बियांत प्रतिशत २१.६ नायट्रोजनयुक्त पदार्थ, स्थिर तेल ३६.८ आणि राख १३.८ असतात. तेलात प्रतिशत २१.८ पामिटिक, ९.१ स्टिअरिक, २२.० ओलेइक आणि ४४.५ लिनोलीइक इ. मेदी तेले असतात.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, New Delhi, 1975.

3. Santapav, H.; Henry, A. N. A Dictionary of the Flowering Plants in India, New Delhi, 1973.

४. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

 

लेखक - गो. वि. जोशी / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate