অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सदमंदी

सदमंदी

(हिं. हिरणखुरी, लॅ. एमिलिया साँकिफोलिया, कुल - कंपॉझिटी). सु. १०-२५ सेंमी., क्वचित ३०-४० सेंमी. उंचीचे हे वर्षायू (एक वर्षभर जगणारे), शाखायुक्त, बारीक, ओषधीय [लहान व नरम; ⟶ ओषधि] तण उष्ण व उपोष्ण कटिबंधातील देशांत सामान्यपणे आढळते. श्रीलंका व भारत येथे शेतात व पडसर जागी किंवा बागेतही ते वाढलेले दिसते. हिच्या एमिलिया ह्या शास्त्रीय प्रजातीत सु. ३० जाती असून भारतात ४-७ जाती आढळतात. साधारणपणे स. स. १,२४० मी. उंचीपलीकडील प्रदेशात ते आढळत नाही. याचे सर्वांग दाट, नरम, केसाळ लवीने आच्छादलेले असते, त्यामुळे ते दुरून राखी रंगाचे असावे असे वाटते. खोड बहुधा सरळ वाढते पण अनेकदा फांदया पसरट व जमिनीवर आडव्या वाढून टोकास पुन्हा सरळ उंच जातात. पानांच्या आकार-प्रकारात विविधता आढळते. खोडाच्या तळाशी मूलज (जमिनीतून वर वाढलेल्या) पानांचा गुच्छ असून ती वीणाकृती किंवा व्यस्त अंडाकृती, सवृंत (देठ असलेली), दातेरी किंवा अखंड किनारीची असतात. खोडावरची (स्कंधेय) पाने अवृंत (बिनदेठाची) एकाआड एक, संवेष्टी (खोडास अंशतः वेढणारी) हृदयाकृती, टोकदार किंवा लांबट व गोलसर असतात. फुलोरे (स्तबक) १-३ सेंमी. पानांच्या बगलेत कुंठित वल्ल्रीवर किंवा फांदयांच्या टोकास गुलुच्छाप्रमाणे सप्टेंबर-डिसेंबर या काळात येतात [⟶ पुष्पबंध].

स्तबकाचे छदमंडल, दंडगोलाप्रमाणे व जांभळट फुलांच्या पुष्प- मुकुटाइतके उंच असते. सर्व फुले व्दिलिंगी, पुष्पमुकुट नलिकाकृती, पंच-भागी व संवर्त पिच्छयुक्त (केसाळ), पांढरा व नरम असतात. फळ ३ मिमी. संकृत्स्न (शुष्क, एकबीजी, न तडकणारे), लहान, आयत, पंचधारी व पिंगट असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी कुलात (अथवा सूर्यफूल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

हे तण फुले येण्यापूर्वी कच्च्या भाजीप्रमाणे खातात. ते आंबट व कडसर लागते. पुढे खोड व पाने शिजवूनही खातात. ते स्वेदक (घाम आणणारे) असून त्याचा काढा लहान मुलांच्या कर्णदाहावर, तापावर व शौचाच्या तकारीवर देतात. ताज्या पानांचा रस कर्णदाह, नेत्रदाह व रातांधळेपणा ह्यात वापरतात. त्रावणकोरमध्ये रस डोळ्यात थेंब-थेंब घालतात. डोळ्यात घातल्यास थंडावा येतो. मूळ अतिसारावर उपयुक्त असते. कापणे व जखमा यांवर हे तण गुणकारी असून यकृताच्या रोगां-वरही वापरतात. जावात पानांचे सार करतात. इंडोचायनात पानांचा काढा तापावर देतात.

टॅसल-फ्लॉवर (फ्लोराज पेंट-ब्रश; लॅ. एमिलिया सॅजिटॅटा) हीत्याच प्रजातीतील दुसरी जाती लहान व नाजूक असून बागेत शोभेकरिता लावतात. ती मूळची चीनमधील असावी. तिच्या फुलोऱ्याचे छदमंडल फुलांपेक्षा आखूड, फुले शेंदरी व आकर्षक असतात. तिची लागवड बियांनी करतात. मैदानी प्रदेशात ऑक्टोबरमध्ये व डोंगराळप्रदेशात मार्चमध्ये बी पेरतात. कोणतीही चांगली जमीन तिला मानवते. तिची पाने कच्ची खातात.

 

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medi-cinal Plants, Vol. II. New Delhi, 1975.

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate