অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातवीण

सातवीण

सातवीण

(हिं. सात्‌विन, छितवन, चॅटियन, शैतान; गु. सातवीन, सप्तपर्णी; क. मद्दले, कडुहळ्ळे, कोडले; सं. राजादन,सप्तपर्णा; इं. डेव्हिल्स ‘ट्री, डिटा-बार्क ट्री; लॅ. ॲल्स्टोनिया स्कोलॅरिस; कुल-ॲपोसायनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा १२–१८ मी. उंच व सु. २·५० मी. घेर असलेला सदापर्णी वृक्ष आहे. याचा प्रसार भारतीय द्वीपकल्प विभागात (विशेषतः पूर्व व पश्चिम घाटांवरच्या ओलसर दाट जंगलांत सस. पासून सु.१,००० मी. पर्यंतच्या उंचीवर), म्यानमार, श्रीलंका, मलाया, फिलिपीन्स व ऑस्ट्रेलिया येथे आहे. एडिंबरोतील वनस्पतिविज्ञ आल्स्टन यांचे नाव सातविणीच्या प्रजातीस (ॲल्स्टोनिया) दिले असून स्कोलॅरिस हे गुणनाम याच्या पूर्वी लाकडाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या पाट्यांकरिता केला जात असल्याने दिले आहे. मराठी व संस्कृत नावे ह्या वृक्षाच्या फांद्यांवर प्रत्येक पेरावर सात (क्वचित कमी) पाने आढळल्याने दिली आहेत. ॲल्स्टोनिया प्रजातीत सु. ५० जाती असून त्यांपैकी फक्त सहा भारतात आढळतात. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बृहत्‌संहिता, रघुवंश, किरातार्जुनीय इ.संस्कृत ग्रंथांत याचा उल्लेख आढळतो; यांचे ‘सप्तच्छदा’ असेही नाव आढळते.

चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत याचे औषधी गुणवर्णन आढळते. सातवीण वृक्षाच्या खोडाची साल खरबरीत व करडी असते. तिच्यावर फांद्यांचे झुबके असतात. पाने साधी व ४– ७ च्या झुबक्यांनी येतात. ती चिवट, साधारणपणे आंब्याच्या पानांसारखी, वर गर्द हिरवी व खाली पांढरट असतात. फांद्यांच्या शेंड्याजवळ पांढऱ्या किंवा हिरवट पांढऱ्या, सुगंधी, अवृंत (बिनदेठाच्या) फुलांचे चवरीसारखे झुबके[ वल्लऱ्या; ⟶पुष्पबंध] डिसेंबर ते मार्चमध्ये येतात. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲपोसायनेसी (करवीर) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

फळे लांबट, पेटिकासम (पेटीसारखी उघडणारी), ३०–६० सेंमी. X ३-४ मिमी. असून झुबक्याने लोंबतात. बिया लहान, लांबट व सपाट असून दोन्ही टोकांस केसांचे झुबके असतात; वाऱ्याने दूर उडून जाण्यास हे झुबके उपयुक्त असतात. याचे लाकूड मऊ, प्रथम पांढरे नंतर पिवळट तपकिरी, चकचकीत, गुळगुळीत व हलके असते; परंतु ते टिकाऊ नसते; खोकी, फळे (ब्लॅकबोर्ड); कमी प्रतीचे सजावटी सामान, प्लायवूड, आगकाड्या, पेन्सिली इत्यादींकरिता ते वापरतात.

साल (व्यापारी नाव : डिटा-बार्क) कडू, स्तंभक (आकुंचन करणारी) व शक्तिवर्धक असून ती हिवताप, आमांश व अतिसार यांवर देतात. कातडीच्या रोगांवर साल वापरतात. सालीतील अर्काचा उपयोग रक्तदाब कमी करण्यास करतात. या वृक्षापासून मिळणारा पांढरा व कडू ⇨ चीक जखमांवर लावतात. चिकात काउचुक १२·९–२६·५% व रेझिने ६९–७८·७% असतात. सातवीण शोभेची वनस्पती म्हणून बागेत व रस्त्यांच्या दुतर्फा लावतात.

भारतीय द्वीपकल्पात ॲल्स्टोनिया व्हिनेटॅटा ही लहान आणि झुडूपवजा जाती विशेषेकरून कोकण व कारवारातील सदापर्णी जंगलांत आढळते. हिची पातळ पाने प्रत्येक पेरावर ३–६ असतात. फुले पांढरी, परंतु सुगंधी नसतात; ती लांबट असतात. पेटिका फळे दोन्हीकडे निमुळती, सापेक्षतः लहान, ७–१२ सेंमी. दात्राकृती (कोयत्यासारखी वाकडी) व टोकदार असतात. पक्व फळांचा औषधी उपयोग उपदंश, चित्रभ्रम, अपस्मार, कृमी व ज्वर यांमध्ये करतात; ती पौष्टिकही आहेत.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948.

2. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968.

3. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.

४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

५. देसाई, वा. ग. ओषधी संग्रह, मुंबई, १९७५.

लेखक: जमदाडे, ज. वि., परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate