অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायलोटेलीझ

सायलोटेलीझ

सायलोटेलीझ

शरीरात वाहक घटक असून बीजे नसलेल्या वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागापैकी (टेरिडोफायटा) सर्वांत साध्या व प्रारंभिक वनस्पतींचा (वर्ग-सायलोफायटीनी; विभाग-सायलोफायटा किंवा उपसंघ-सायलोप्सिडा) हा एक गण असून ⇨ सायलोफायटेलीझ हा दुसरा गण आहे. सायलोटेलीझ गणात सायलोटम व मेसिप्टेरिस ह्या दोन जिवंत प्रजातींचा समावेश होतो. सायलोटमाच्या दोन जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. मेसिप्टेरिसाची एकच जाती (मे. टॅनेन्सिस) ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॅसिफिक महासागरातील काही लहान बेटे येथे आढळते. दोन्ही प्रजातींतील जाती बहुधा ⇨ अपिवनस्पतींप्रमाणे म्हणजे अन्य वनस्पतीचा फक्त आधार घेऊन जगतात; तथापि त्या स्थलवासींप्रमाणे जमिनीत किंवा खडकांतही वाढतात. दोन्हींचे मूलहीन खोड अंशतः मूलक्षोड (जमिनीत वाढणारे जाडजूड खोड) व उरलेला भाग वायवी (हवेत वाढणाऱ्या) फांद्यांच्या रूपाने जमिनीवर वाढतो. दोन्ही भागांत द्विशाखाक्रम ⇨ खोड असून भूमिस्थित भागांवर मूलकल्प (मुळाचे फक्त कार्य करणारे केस) असतात; शिवाय मूलक्षोडांच्या अनेक कोशिकांत (पेशींत) कवकतंतू [⟶ कवक] असतात. सायलोटमात वायवी फांद्यांवर खऱ्या पानांऐवजी लहान खवल्यांसारखी निर्गमने (आतून बाहेर वाढणारेराठ केस) असतात. मेसिप्टेरिसात सपाट, मोठी व पानासारखी, परंतु अनित्य उपांगे असतात. बीजुककोश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक निर्मिणारे व साठविणारे पिशवीसारखे घटक) प्रत्यक्ष फांद्यांवर किंवा पानांच्या तळाशी बगलेत असून त्यांच्या जोड्या वा त्रिकुटे असतात. बीजुके (प्रजोत्पादक सूक्ष्म एककोशिक घटक) एकाच प्रकारची व गंतुकधारी (प्रजोत्पादक लैंगिक घटक-कोशिका निर्माण करणारी अवस्था) हरितद्रव्यहीन व भूमिस्थित असून अंदुककलश (स्त्री-जनन कोशिका निर्मिणारे अवयव) व रेतुकाशये (पुं-जनन कोशिका निर्मिणारे अवयव) त्यात कमी-जास्त रुतलेली असतात. बीजुकधारी वगंतुकधारी ह्या दोन पिढ्यांचे एकांतरण (परस्परांची निर्मिती) असते [⟶एकांतरण, पिढ्यांचे]. मूलक्षोडांत आदिरंभ (प्रकाष्ठाभोवती परिकाष्ठ)असून मधे ⇨ भेंड नसते; परंतु भेंड वायवी फांद्यांत आढळते; त्या संरचनेस नलिकारंभ ⇨ रंभ म्हणतात. गंतुकधारीचे स्वरूप काहीसे मूलक्षोडाप्रमाणे असून दोन्हीत संकवक असते.

सायलोटम फ्लोरिडा ही जाती बर्म्यूडा आणि हवाई बेटांमध्ये आढळते. खोड त्रिधारी किंवा सपाट असते. सा.ट्रायक्विट्रम ही सरळ व जमिनीवर वाढणारी जाती (किंवा अपिवनस्पती) भारतात आढळते. बीजुककोशाची त्रिकुटे पार्श्विक (बाजूस); परंतु सूक्ष्म खवल्यांच्या बगलेत असून फांद्या हिरव्या असतात. रेतुकाशय व अंदुककलश ⇨ शेवाळीप्रमाणे असून ती गंतुकधारीवर विखुरलेली आढळतात. हवाई बेटांमध्ये सा.ट्रायक्विट्रमाचा काढा मुलांचे तोंड आल्यास देतात; तो रेचकही आहे. तान्ह्या मुलांना अतिसारात तिची तेलकट बीजुके देतात.

मेसिप्टेरिसाचे खोड फारच कमी विभागलेले व त्यावरची पाने खाली सापेक्षतः लहान खवल्यांसारखी; परंतु वरच्या भागांवर क्रमाने मोठी व अधोगामी असून शेवटी दुभंगलेली व त्यांच्या तळाशी बगलेत बीजुककोशाची जोडी असते.

सायलोटेलीझ हा गण प्राचीन सायलोफायटेलीझपासून अवतरला असावा असे मानतात. ऱ्हास पावलेली पानांसारखी उपांगे, खऱ्या मुळांचा अभाव, खोडाचा ठळकपणा व त्यातील वाहक ऊतकांची मांडणी आणि बीजुककोशाची लक्षणे इत्यादींतील साम्यामुळे या अनुमानाला बळकटी येते.

 

 

संदर्भ : 1. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower Groups, New York, 1936.

2. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate