অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुकाणू

सुकाणू

सुकाणू : (क. तंडे; लॅ. सेर्बेरा ओडोलम; कुल-ॲपोसायनेसी). या मोठ्या सदापर्णी क्षुपाचा किंवा लहान वृक्षाचा प्रसार भारतात (विशेषतः द. कोकण, उ. कारवार व मलबार या ठिकाणी) सामान्यपणे खाऱ्या दलदलीमध्ये सर्वत्र आहे. शिवाय चीन, मलाया, ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक बेटे येथेही तो आढळतो. याची साल पांढरी असते. याची सामान्य शारीरिक लक्षणे ॲपोसायनेसी (करवीर) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फांद्या लहान मंडलित असून त्यावर पर्णव्रण असतात. पाने लांबट-कुंतसम, प्रकुंचित, अखंड, चकाकीयुक्त व देठाकडे निमुळती होत जातात. फुलोरा-अग्रस्थ, गुलुच्छ-वल्लरी आणि फुले पांढरी, सुवासिक, क्वचित पिवळसर असून जून–जानेवारीपर्यंत येतात. फळ अश्मगर्भी असून त्यात एकच साधारण चपटे व रुंद बी असते.

सुकाणूची साल रेचक असते. कपाली (फळातील बाठा) मादक व विषारी असून फळ जलसंत्रास रोगावर उपयुक्त असते. वाळलेल्या बियांच्या मगजात सु. ४३·१% तेल, सेर्बेरिन ग्लुकोसाइड व कडू ओडोलिन असते. तेल दिव्यासाठी व केसांसाठी वापरतात. सालीपासून धागा काढतात.

 

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate