অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरंगी

सुरंगी

सुरंगी

(गोडी उंडी, पुन्नाग; हिं. नागकेसर, सुरंगी; गु. रतिनागकेसर; क. गार्दुंडी, पुने; सं. पुन्नाग, नागकेसर; लॅ. ऑक्रोकार्पस लाँगिफोलियस; कुल-गटिफेरी ). सुमारे १२–१८ मी. उंचीचा (घेर साधारण 1·8 मी.) हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत (सस.पासून सु. ६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. तो ओडिशा, बिहार तसेच मादागास्कर, न्यू गिनी, आफ्रिका व फिजी येथील प्रदेशांत लावलेला आढळतो.

साल विटकरी रंगाची, जाड, खवलेदार व काळसर ठिपक्यांची असून त्यातून लालसर डिंक स्रवतो. पाने साधी, मोठी, रुंद, अंडाकृती, संमुख, चिवट, तीक्ष्णाग्र, कडा किंचित तरंगित; फुले (फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारी) कक्षास्थ, बहुयुतिक, पांढरी व त्यावर नारिंगी रेषा, सुगंधी, साधारण१·७ सेंमी. व्यास असलेली व झुबक्यांनी येतात. संदले २, प्रदले ४ व लवकर गळणारी; केसरदले असंख्य; स्त्री-पुष्पात वंध्यकेसरदल; किंजपुटात दोन कप्पे; मृदुफळे पावसाळ्यात पिकतात. ती रसाळ व खाद्य असतात. फळ साधारण गोल व तीक्ष्णाग्र असते; बिया १–४. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरी (कोकम) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

फळाच्या पिवळट सोनेरी रंगावरुन या झाडाचे लॅटिन प्रजातिवाचक नाव (ऑक्रो –पिवळे; कार्पस –फळ) पडले आहे. सुकलेल्या कळ्या रेशमाला लाल रंग देण्यास वापरतात; त्यांना ‘तांबडा नागकेसर’ असे व्यापारी नाव आहे. सुवासिक फुले पूजेसाठी व शरीर सुशोभित करण्यास वापरतात तसेच त्यापासून अत्तर काढतात. लाकूड लाल, कठीण व टिकाऊ असल्याने घरबांधणीस उपयुक्त असते. ताज्या कळ्या सौम्य उत्तेजक, वायुसारक आणि स्तंभक असून अग्निमांद्य व मूळव्याधीवर गुणकारी असतात.

लेखक - मु. महाजन

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate