অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सॅपिंडेसी

सॅपिंडेसी

(अरिष्ट कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वनस्पतींचे हे एक कुल असून त्याचा ⇨सॅपिंडेलीझ (अरिष्ट) गणात समावेश केलेला आहे. यात झुडपे [⟶ क्षुप], वृक्ष व काही प्रतानारोही (तणाव्यांच्या मदतीने वर चढणाऱ्या) वेली आहेत; मुख्यत्वेकरून या वनस्पती उष्णकटिबंधात आढळतात. यांची पाने एकाआड एक, क्वचित समोरासमोर, साधी किंवा संयुक्त, क्वचित सोपपर्ण (तळाशी उपांगयुक्त) असतात. फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी; संदले ४- ५,सुटी व परिहित (परस्परांना अंशतः झाकणारी); प्रदले ३–५, सुटी, परिहित व त्यांवर खवले अथवा केसाळ उपांगे असतात;केसरदले (पुं-केसर) सुटी व दोन मंडलांत आढळतात; तीन किंजदले (स्त्री-केसर)जुळून त्यांचा तीन कप्प्यांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट बनतो. प्रत्येक कप्प्यात बीजके (अपक्व बीजे) १-२; फळ विविध प्रकारचे; बी अध्यावरणयुक्त (नित्याच्या बीजावरणावर वाढलेला विशेष प्रकार) व बहुधा पुष्कहीन (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेले) असते. या कुलात सु. १२० प्रजाती व १,००० जाती असून पुढील उपयुक्त वनस्पती यात अंतर्भूत आहेत : उंब,कपाळफोडी, जखमी, मेंद्री, रिठा, लिची इत्यादी. यूफोर्बिएसी (एरंड) कुलाशी या कुलाचे जवळचे नाते आहे.

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate