অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सॅसॉफ्रस

सॅसॉफ्रस

(सॅसफ्रस; इं. एग्यू ट्री, गीन स्टिक; लॅ. सॅसॉफ्रस अल्बिडम, सॅ. ऑफिसिनेल; कुल-लॉ रेसी). हे फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति,आवृतबीज उपविभाग] एका प्रजातीचे शास्त्रीय नाव असून या प्रजातीतील दोन जाती चीन व फॉर्मो सा येथे आणि एक जाती उत्तर अमेरिकेत कॅनडा ते फ्लॉरिडा या प्रदेशांत आढळते. सॅ. अल्बिडम हा ७–१५ मी. (क्वचित २४ मी.) उंचीचा एक पानझडी वृक्ष असून याचे मूलस्थान ईशान्य अमेरिका ते दक्षिणेस टेक्सस व फ्लॉरिडापर्यंतच्या रेताड जमिनीत आहे. ओएन्सबरो (केंटुकी) येथील एक (सॅ. अल्बिडम) वृक्ष सु. ३० मी. उंच असून त्याचा घेर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत सु. ५ मी. आहे. भारतात हा वृक्ष आढळत नाही. त्याची सुकी मुळे आयात करतात. बदलणाऱ्या रंगांची पाने, पिवळट फुलोरे आणि जांभळी फळे यां मुळे आकर्षक दिसणाऱ्या या वृक्षाची लागवड उद्यानांत कुंपणाकरिता व रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता करतात. खोडाची साल करडी-तपकिरी, भेगाळ खवलेदार व सुगंधी असते. पाने सुगंधी, साधी, एकाआड एक, अंडाकृती, चकचकीत हिरवी, अखंड द्विखंडित किंवा त्रिखंडित असतात;कधीकधी तिन्ही प्रकारची पाने एकाच डहाळीवर आढळतात. लहानलहान फांद्या चकचकीत व हिरव्या असतात. हिरवट पिवळी, लहान व एकलिंगी फुले मंजरीत येतात. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे भिन्न झाडांवर येतात. पुं-पुष्पात नऊ केसरदले (पुं-केसर) असतात. मृदुफळे सु. १.५ सेंमी. लांब, लंबगोल, गर्द जांभळी, एकबीजी व तळाशी शेंदरी संवर्ताने वेढलेली असतात. शरद ऋतूत पानांचा रंग नारिंगी व लाल होतो. याची इतर शारीरिक लक्षणे ⇨ लॉरेसीअगर तमाल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. हे वृक्ष उघड्या शेतातील चांगल्या, निचरा असलेल्या व अम्लीय जमिनीत चांगले वाढतात.

उपयोग

या वृक्षाचे लाकूड नरम, ठिसूळ व नारिंगी; टिकाऊ व तपकिरी असते, परंतु बळकट नसते. जोखडे, पिपे, नावा, लहान कुंपणाचे खांब,पेट्या व हलक्या वस्तूंकरिता हे वापरतात. खोडाची साल, मुळे व पाने यांमध्ये सुगंधी तेल असते. मुळे उत्तेजक, स्वेदकारी (घाम आणणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी) व शुद्घिकारक असतात. त्यांचा वापर चर्मरोग, संधिवात, गाऊट, द्वितीय उपदंश व रक्तपित्त व्याधी (स्कर्व्ही) इ. रोगांत करतात. डोळे धुण्यास मुळे व भेंड यांचा काढा वापरल्यास आग कमी होते.

या वृक्षाच्या मुळांची ताजी साल पांढरट असते; परंतु उघडी पडल्यानंतर ती काळसर होते. बाहेरील ⇨ त्वक्षा पदर काढून टाकतात व साल सुकवून नंतर बाजारात सॅसॉफ्रस या नावाने विकतात. त्याला सुगंध येतो आणि त्याची काहीशी गिळगिळीत व तिखट चव असते. मुळांच्या सालीत ६-९% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असून ते वाफेचा उपयोग करून ऊर्ध्वपातनाने काढतात. ते सुगंधी आणि पिवळे किंवा लालसर पिवळे असते व त्यात प्रमुख घटक ‘सॅफ्रॉल’ सु. ८०% असतो. ‘सॅसॉफ्रस तेल’ अल्पांशाने घेतल्यास उत्तेजक व वायुनाशीअसते; ते वमन (ओकारी), निपात, डोळ्यातील बाहुलीचा विस्तार व झापड इत्यादींवर परिणाम करणारे असते; याची मात्रा जास्त घेतल्यास मृत्यू संभवतो. तेल पूतिरोधक असल्याने उवांवर, दंतवैद्यकात व नाकातील शल्य विकृतीव्रर वापरले जाते. सॅसॉफ्रस तेलाचा वापर सुगंधी व स्वस्त साबण बनविण्यासाठी करतात. सौंदर्यप्रसाधनांत व अत्तरांत वापरल्या जाणाऱ्या ‘हेलिओट्रोपीन’ ह्या सुगंधी द्रव्याच्या निर्मितीत हे तेल वापरतात; तसेच कीटकनाशके व पॉलिशकरिता वापरली जाणारी तेले यांतही याचा उपयोग करतात. मुंग्या व डास या तेलापासून दूर जातात. तेलातील सॅफॉल या पुख घटकांमुळे प्रायोगिक प्राण्यांना कर्करोग झाल्याचे आढळले; त्यानंतर सॅफॉलहीन तेलच फक्त पेयांत व अन्नपदार्थात वापरणे इष्ट ठरले आहे. तेलाशिवाय सालीत टॅनीन सु. ६%, सॅसॉफाइड हा लाल घटक सु. ९%,राळ, मेण, गोंद, स्टार्च इ. पदार्थ असतात. तेलाचा वापर तंबाखू , घरगुती नित्याची औषधे, ‘रुट-बीर’ व इतर पेये, दंतमंजने, साबण, चघळण्याचा गोंद इ. वस्तूंत स्वादाकरिता करतात. हे तेल चर्मरक्तकर (कातडी लाल करणारे), दाहनाशक व वेदनाहारक आहे. नैसर्गिक सुगंधित अर्क ⇨ चेरी पाय (हेलिओट्रो-पियम पेरुव्हियानम) ह्या वनस्पतीच्या फुलांपासून काढतात. सॅसॉफ्रस ला ‘गंधवल्क’ हे संस्कृत नाव सुचविलेले आढळते, ते याच्या सुगंधी सालीच्या संदर्भात सार्थ दिसते; सुगंधी कृत्रिम अर्काला ‘हेलिओट्रोप’म्हणतात. कॉक्सिडिओडस इमिटिस या कवकाच्या नाशाला हे तेल उपयोगी असते.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

3. Uphof, J. C. Dictionary of Economic Plants, New York, 1968.

4. Zim, H. S. Martin, A. C. Trees, New York, 1956.

परांडेकर शं. आ.; जमदाडे, ज. वि.

स्त्रोत - मराठी विश्‍वकोष

 

अंतिम सुधारित : 8/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate