অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेलॅस्ट्रेसी

सेलॅस्ट्रेसी

सेलॅस्ट्रेसी

(ज्योतिष्मती कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एक कुल. याचा अंतर्भाव सेलॅस्ट्रेलीझ गणात (ज्योतिष्मती गणात) केला असून (जे. एन. मित्रा यांच्या मताप्रमाणे) त्या कुलाशिवाय आणखी चार कुले (स्टॅफिलिएसी, अ‍ॅक्विफोलिएसी, एंपेटेसी व ⇨ सॅल्व्हॅडोरेसी अथवा पीलू कुल) याच गणात येतात. ए. बी. रेंडल यांनी पाच कुलांपैकी सॅल्व्हॅडोरेसी कुल वगळले आहे. सेलॅस्ट्रेलीझचा उगम सी. ई. बेसी यांच्या मते ⇨ रोझेलीझ या गणापासून झाला असावा. जे. हचिन्सन यांच्या मताप्रमाणे यूफोर्बिएलीझमधून (एरंड गणातून) उगम झाला असावा (१९५९).[⟶ माल्व्हेसी] पासूनही उगम होण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. ए. एंग्लर यांनी सेलॅस्ट्रेलीझचा अंतर्भाव सॅपिंडेलीझमध्ये सेलॅस्ट्रीनी असा केला आहे. ऱ्हॅम्नेलीझ (बदरी) गणाशी [⟶ ऱ्हॅम्नेसी] सेलॅस्ट्रेलीझचे अनेक लक्षणांत साम्य आहे.

सेलॅस्ट्रेसी कुलात सु. ४५ प्रजाती व ४७० जाती (विलिस यांच्या मते ५५ प्रजाती व ८५० जाती) असून त्या बहुतेक वृक्ष, क्षुपे (झुडपे) व काही ⇨ महालता (मोठ्या वेली) आहेत; कधी त्यांना काटे असतात. त्यांचा प्रसार अतिथंड प्रदेशाखेरीज जगात बहुतेक सर्वत्र आहे. भारतात (विशेषतः हिमालयात) व पूर्व आशियात अनेक प्रजातींच्या जाती आढळतात. ⇨ कंगुणी (मालकांगोणी) या सामान्यपणे आढळणाऱ्या जातीवरून सेलॅस्ट्रेसी कुलाला ज्योतिष्मती संस्कृत नाव हे दिले असावे. या कुलाला ‘मालकंगुणी कुल’ असेही म्हणतात. या कुलातील काही जातींत साधी व जाडसर, काहींत सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) आणि संमुख, समोरासमोर किंवा एकांतरित (एकाआड एक) पाने असतात.

फुलोरा बहुधा कुंठित [⟶ पुष्पबंध] असून फुले लहान, हिरवट किंवा पांढरी, नियमित, बहुधा द्विलिंगी, क्वचित एकलिंगी; परंतु दोन्ही प्रकारांची एकाच झाडावर, अवकिंज किंवा काहीशी परिकिंज असतात [⟶ फूल]; त्यातील प्रत्येक मंडलात ४–५ पुष्पदले असून २–५ जुळलेली किंजदले (स्त्री–केसर) असतात. किंजपुटात २–५ कप्पे असून तो ऊर्ध्वस्थ किंवा बिंबात रुतल्यामुळे काहीसा अध:स्थ असतो. प्रत्येक कप्प्यात दोन अधोमुख (बीजक रंध्र खाली वळलेले) व सरळ बीजके (अपूर्ण बीज) असतात. फळ विविध प्रकारचे; बी सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले) व रंगीत अध्यावरणाने वेढलेले असते [ ⟶ बीज]. बिंबातील मधुरसाने आकर्षित झालेले कीटक परपरागण [⟶ परामण] घडवून आणतात. कंगुणी, ⇨ अरण, कुंगकू (योनिमस टिंगेन्स), काजुर्ती (हिपोक्रेटिया इंडिका) इ. भारतीय जाती औषधी आहेत. काही जाती शोभेकरिता बागेत लावतात.

अरबस्तानात ‘खट’ या नावाचे कॉफीसारखे पेय कॅथा इड्यूलिस या क्षुपीय (झुडपासारख्या) जातीच्या पानांपासून बनवितात. तेथे ते चहाकॉफीच्या पूर्वीपासून लागवडीत आहेत. सुकी व ताजी पाने उत्तेजनार्थ चघळतात. बनाती (बलफळे; लोफोपेटॅलम वाइटियानम) या कोकणात व दक्षिणेत आढळणाऱ्या सदापर्णी वृक्षाचे लाकूड हलके व कठीण असून घरबांधणी, कपाटे, सजावटी सामान, प्लायवुड, खोके इ. विविध प्रकारे उपयोगाचे आहे. येकडी (हेकळ, हुर्मचा; जिम्नोस्पोरिया माँटॅना) या लहान काटेरी वृक्षाचे लाकूड कठीण, जड व तपकिरी असून खोक्याकरिता वापरतात. मुळे, खोड, साल व पाने औषधी आहेत. ही झाडे भारतातील रूक्ष भागांत आढळतात. आफ्रिकेतील एलिओडेंड्रॉन क्रोशियम या वृक्षापासून चांगले इमारती लाकूड मिळते.

 

संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

 

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate