অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोनटक्का

सोनटक्का

सोनटक्का : (इं. गार्लंड फ्लॉवर, कॉमन जिंजर लिली; हिं. दोलन चम्पा; सुरूली सुगंधी; सं. करचुरा; लॅ. हेडीशियम कॉरोनॅरियम; कुल-झिंजिबरेसी). कर्दख, वेलदोडा व हळद यांसारखे दिसणारे हे लहान व नरम फुलझाड वनस्पति, आवृतबीज उपविभाग; एकदलिकित वर्ग] १-२ मी. उंच व ओषधीय असते. ते मूळचे आशियाच्या उष्ण प्रदेशांतील असून अमेरिकेच्या उष्ण प्रदेशांत त्याचे देशीयभवन झाले आहे. हेडीशियम या प्रजातीत सु. ५० जातींचा समावेश होत असून त्यांपैकी भारतात सु. २५ जाती आढळतात.

भारतात ते विशेषतः खासी टेकड्या व दक्षिण भाग (कोकण, कारवार, सह्याद्री इ.) या ठिकाणी आणि श्रीलंका व मलाया येथेही आढळते. शोभा व सुगंधित फुले यांकरिता ते व इतर काही जाती उद्यानांतून लावतात. सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम) : पानाफुलांसहित फांदी.सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम) : पानाफुलांसहित फांदी. सोनटक्क्याचे जमिनीतील खोड मूलक्षोड; खोड बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), आडवे वाढणारे, जाडजूड, मांसल, २·५-५ सेंमी. व्यासाचे असून त्यापासून जमिनीत तशाच काही फांद्या व मुळे वाढतात आणि जमिनीवर सरळ उभे पर्णधारी, बारीक परंतु मजबूत कर्दळीप्रमाणे खोड येते. या खोडावर लांबीच्या मानाने आणि कर्दळी व हळदीपेक्षा अरुंद, बिनदेठाची, साधी, टोकदार, एकाआड एक, जिव्हिकावंत (बगलेत पातळ जिभेसारखे उपांग असलेली) व मोठी पाने दोन रांगांत असतात; ती आयतकुंतसम (भाल्यासारखी), वर गुळगुळीत आणि खाली काहीशी तुरळकपणे लवदार असतात.

खोडाच्या व फांद्यांच्या टोकास ठळकपणे दिसणारे पांढऱ्या, स्वच्छ, मोठ्या सच्छद (तळाशी जाड उपांगाचे) फुलांचे कणिश पुष्पबंध प्रकारचे फुलोरे पावसाळ्यात येतात. फुले पांढरी किंवा फिकट पिवळी, सौम्य, मधुर, सुगंधी असून खाली नळीसारखी आणि वर पसरट असतात; त्यातून एकच केसरदल (पुं-केसर) व काही वंध्य केसरदले (पाकळ्यासारखी दिसणारी) असतात. किंजदले जुळलेली व तीन असून केसरदलाच्या तंतूवरील खोबणीतून किंजल व किंजल्क वाढतो व परागकोशातून त्यावर येतो. फळ (बोंड) लंबगोल व केशहीन असून त्यात अनेक अध्यावरणयुक्त (बीजावरणावर एक उपांग असलेली) बीजे असतात. फळ फुटून तीन शकले होतात. फुलाची संरचना व वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे सिटॅमिनी गणातील (अगर कदली गणातील) झिंजिबरेसी कुलात (अगर शुण्डी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सोनटक्क्याच्या सुकलेल्या खोडांचा कागदनिर्मितीत उपयोग होतो. त्यामध्ये ४३% सेल्युलोज असून हिरव्या खोडांत ते ४८% असते. त्यांतील तंतूंची लांबी सु. २·६१ मिमी. आणि र भेंडातील कोशिकांचा व्यास सु. ०·११ मिमी. असतो. हिरव्या खोडांतील उत्तम स्वच्छ केलेल्या तंतूचे ताणबल (ताणले असताना न तुटता राहण्याची शक्ती) उत्तम मॅनिलाच्या दोऱ्याइतके असते. सुकण्यापूर्वी खोडे चरकातून काढून चूर्ण केल्यास त्याचा वापर कागदाच्या लगद्यासाठी सोडा वापरून केलेल्या प्रक्रियेने चांगला होतो. भेंडाचा घटक न काढता तसाच राखल्यास कागदात ताठरपणा, मजबुती, लवचिकपणा इ. आवश्यक गुण येतात. जमिनीतील खोडांत आरारुट वनस्पतीसारखा स्टार्च असतो.

फिलिपीन्स येथील सोनटक्क्याच्या खोडांत पुढीलप्रमाणे घटक (प्रतिशत प्रमाणात) : स्टार्च ३, ग्लुकोज ४·५८, अ‍ॅल्बुमीन १·६५, मेद ०·३३, रेसिनस अम्ल ३·६६, रेझीन ५·९३, निष्कर्षित पदार्थ ०·९१, डिंक १३·७५, कार्बनी अम्ल ५·५ आणि तूलीर २९·६ आढळतात. सुक्या मूलक्षोडांतून वाफेच्या साहाय्याने काढलेले तेल सु. ०·१२४% असते; त्यात १६% अल्डिहाइडे व इतर काही संयुगे असतात. हवाई बेटे येथे फुलातील अत्तर काढतात; त्यात बाष्पनशील तेल ०·०२३-०·०२९ असते. त्याला सौम्य सुखद वास येतो. रांची (झारखंड) येथील मुंडा लोक मूलक्षोडाचे चूर्ण तापावर देतात. मूलक्षोडाचा काढा संधिवातारोधक, पौष्टिक व क्षुब्ध करणारा असतो. इंडोनेशियातील मोलूकू बेटांत त्यांचा गुळण्यांसाठी उपयोग करतात.

कापूरकाचरी : (सं. गंधशटी; हिं. कापूरकचरी; लॅ. हे. स्पायकॅटम). ही सोनटक्क्याच्या प्रजातीतील ओषधी जाती असून पश्चिम व मध्य हिमालयात आढळते. तिच्या मूलक्षोडाला उग्र वास व कापराप्रमाणे कडू चव असते. कापूरकचरा. पिवळा सोनटक्का : (इं. यलो जिंजर लिली; लॅ. हे. फ्लॅवम). ही सोनटक्क्याच्याच प्रजातीतील पिवळ्या सुगंधी फुलांची परिचित जाती आहे. बागेत तिची लागवड करतात. तिच्याही सुगंधी फुलातील बाष्पनशील तेलाचा उपयोग सोनटक्क्याप्रमाणे करतात. जमदाडे, ज. वि.; परांडेकर, शं. आ. लागवड, मशागत व संवर्धन : ही वनस्पती सुपीक व खोल जमीन आणि भरपूर पाणी असल्यास उत्तम वाढते. मैलापाणी मिळाल्यास किंवा गटारीच्या दोन्ही बाजूच्या अर्धवट सावली असलेल्या ओलसर जमिनी तिला फारच योग्य असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस तिच्या मूलक्षोडाला कोंब फुटतात. नंतर ती उष्ण व दमट हवेमुळे वाढून तिला ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पांढरी अगर पिवळी सुवासिक फुले येऊ लागतात. ऑक्टोबरमध्ये बहार असतो. त्यानंतर पाने पिवळी पडतात.

लेखक - रा. मो. चौधरी

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

2. Mitra, I. N. An Introduction to Systematic Botony and Ecology, Kolkata, 1964. सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम)सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम)

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate